Bookstruck

श्याम 120

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुढे पंधरा दिवस झाले तरी आमचे गेलेले कागद परत येत नाही. आम्ही आमच्या वर्गनायकाला म्हटले, 'जा त्यांच्याकडे व आमचे कागद मागून आण.' कधी माघार न घेणारा आमचा वर्गनायक गेला व म्हणाला, 'मुले त्या दिवशीचे कागद मागताहेत.' 'उद्या आणीन' ते शिक्षक म्हणाले. दुस-या दिवशी पुन्हा वर्गनायक गेला. पुन्हा त्यांनी 'उद्या आणीन' असेच सांगितले. त्या शिक्षकांचे 'उद्या आणीन' संपेना. शेवटी एके दिवशी आमचा वर्गनायक म्हणाला, 'रोज मला मुले तुमच्याकडे पाठवतात तरी तुम्ही 'उद्या आणीन' सांगता. मी खेपा तरी किती घालू ? मला आता तुम्हाला विचारावयाची लाज वाटू लागली. देत नाही असे सांगा, हरवले सांगा, किंवा तुमच्या इंग्लिशचे ते नमुने मला पाहिजेत असे सांगा. काही करा; परंतु माझी फजिती थांबवा. माझे हेलपाटे थांबवा.' शेवटी ते शिक्षक म्हणाले, 'हे पहा, ते कागद हरवले. हेडमास्तरांकडे काही तुम्ही जाऊ नका. तुमच्या वर्गातील मुले नाही तर वरपर्यंत प्रकरण न्यावयाची. तुमच्या वर्गाने सर्वांना हातटेकीस आणले बोवा !'

वर्गनायकाने ही शरणचिठ्ठी आणली तेव्हा मुलांचे समाधान झाले. या सा-या गोष्टींनी हे ड्रील शिक्षक आमच्या वर्गावर जळफळावयाचे. 'या वरच्या वर्गांनाही ड्रील कंपल्सरी करा. म्हणजे या सर्वांना ताळयावर आणतो, रेशमासारखे मऊ करतो,' असे हडेलहप्प शिक्षक बोलावयाचे.

आमचा वर्ग म्हणजे अजिंक्य मानला जाई. प्रत्येक विषयातील रथी, अतिरथी, महारथी आमच्या वर्गात होते. गोपाळ म्हणून एक मुलगा होता. त्याचे इंग्रजी चांगले होते. राम व बाबा यांचे गणित फारच तयार असे. संस्कृत व मराठी यांत माझा हातखंडा होता. परशुराम सर्व विषयांत तज्ज्ञ असे. राम, यशवंत व शिवराम हे उत्कृष्ट चित्रकार होते. केशव हा उत्कृष्ट पाटया खेळणारा होता. देवचंद लंगडीच्या खेळात कोणाला बघत नसे. राजाराम उत्कृष्ट बोलर होता. गंगाराम चांगला बॅटस् मन होता. राम, शिवराम व मंडपे उत्कृष्ट अभिनय करणारे होते. कृष्णा पाठशक्तीत कोणाला हार गेला नसता. कोणी चांगली कुस्ती खेळणारे होते. जालगावच्या सर्व तळयाला फेरी घालतील, सहा पुरुष खोल असलेल्या त्या तळयाचा ठाव आणतील असे पट्टीचे पोहणारे आमच्या वर्गात होते. माझ्यासारखे कवी व वक्ते होते. परशुरामासारखे मुत्सद्दी होते. शिवरामसारखे साहसी होते. आमच्या वर्गात नाना गुणांचे मुलगे होते. आमच्या वर्गात स्पृहणीय असे ऐक्य होते. एखादी गोष्ट करावयाची असे प्रमुख मुलांनी ठरविले की, इतर सर्व मुले बहुधा त्याप्रमाणे वागावयाचीच.

चौथ्या इयत्तेत असताना आम्ही सर्व मुलांनी ड्रॉइंगच्या परीक्षेस असण्याचे ठरविले. २५ मुले आमच्या वर्गातील पहिल्या परीक्षेस बसली. त्यांतील २३ मुले पास झाली. ड्रॉईंगची परीक्षा पास झालेला मुलगा चित्रकलेच्या तासाला न बसला तरी चालत असे. मग आम्ही तेवीसच्या तेवीस मुले चित्रकलेच्या तासाला बुट्टी देत असू. बाहेर जाऊन कोणी खेळत. कोणी झाडावर झोके घेत. कोणी आवडेल ते वाचीत.

चौथ्या इयत्तेत आम्हांस सायन्स शिकवावयास कोणी शिक्षकच नव्हता, मराठी सहावी सातवीच्या पुस्तकात शेवटी शास्त्रीय धडे आहेत. तेच धडे एक शिक्षक आमच्या वर्गात आमच्या समोर पुराणाप्रमाणे वाचीत. ना प्रयोग. ना समजावून सांगणे. या अशा कंटाळवाण्या तासाला का बसावे हे आम्हास समजेना. एके दिवशी त्या तासाला हजर न राहण्याचे आम्ही ठरविले. वर्गात दोन का तीन मुले फक्त हजर राहिली. बाकी तीस मुले निघून गेली. वर्गनायकही वर्गात नव्हता. वर्गातील पेटीची किल्ली त्याच्या खिशात होती. आम्ही बाहेर चिंचा खाल्ल्या. बोरे खाल्ली. सृष्टिनिरीक्षण केले. लता-वेली पाहिल्या. निरनिराळी झाडे पाहिली. त्यांची नावे एकमेकांस विचारली. वनस्पतिशास्त्र आम्ही एकमेकांपासून शिकत होतो.

त्या शिक्षकांनी हेडमास्तरांकडे वार्ता दिली. हेडमास्तरांनी वर्ग शिक्षकांना या प्रकरणाची चौकशी करुन काय करावयाचे असेल ते करा, अशी सत्ता दिली. वर्गशिक्षकांना आमच्याबद्दल सहानुभूती होती. त्यांनी प्रत्येकाला विचारले, 'तू रे कोठे होतास ? तू रे कोठे होतास ?' 'माझे पोट दुखत होते म्हणून मी झाडाखाली जाऊन पडलो होतो.' कोणी म्हणे, 'माझे कपाळ फार दुखत होते म्हणून मी रस्त्याजवळच्या पडक्या बंगल्यात मी झोपलो होतो.' तिसरा म्हणाला, 'माझ्या घरचा गावाहून गडी आला होता. त्याच्याबरोबर मी बाहेर गेलो होतो.' वर्गशिक्षक प्रत्येकाची नवनवीन कारणे पाहून हसू लागले. आपल्या मुलांच्या प्रतिभा पाहून त्यांना आनंदाच्या उकळया फुटत होत्या; परंतु सर्वांत कमाल आमच्या वर्गनायकाने केली. त्याला वर्गशिक्षक म्हणाले, 'तू तर वर्गनायक ! तू तरी गाढवा वर्गात नको का    रहावयास ? आणि बरोबर म्हणे पेटीची किल्ली घेऊन गेलास !

« PreviousChapter ListNext »