Bookstruck

श्याम 133

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तिस-या यत्तेत असताना माझ्या शेजारी एक मुलगा बसे. हळूहळू न कळत आम्ही दोघे एकमेकांच्या जीवनात शिरत होतो. एकमेकांचा त्रास एकमेकांच्या श्वासोश्वासाबरोबर एकमेकांना लागत होता. एकमेक एकमेकांकडे सहज पहात असू. सहज हसत असू. परंतु त्या सहज पाहण्यात व सहज हसण्यात शतजन्मांची जणू ओळख होती. डोळे डोळयांना ओळखीत होते. हृदयाची हृदयाला ओळख पटत होती. सहज त्याच्या वहीला मी हात लावावा. सहज त्याने माझे पुस्तक हातात घ्यावे. ते आमचे हात वहीला व पुस्तकाला लागत नव्हते. ते हात एकमेकांच्या आत्म्याला लागत होते. एकमेकांच्या अंतरंगाला लागत होते. मी क्षणभर त्याची वही माझ्या हातात ठेवी. जणू मला तो लपवून ठेवीत होता. जगाची दृष्टी पडू नये, म्हणून तो मला लपवीत होता.

त्या मुलाचे नाव होते राम. लहानपणापासून जे नाव मला आवडते तेच मुलाचे नाव होते. मी   माझ्या आईला लहानपणी म्हणत असे, 'माझे नाव राम ग का नाही ठेवलंत ? राम काय, श्याम काय ? एकच नाही का ? परंतु एकेक भावना असते. हा राम दापोलीच्या छात्रालयात रहात असे. या रामकडे मी ओढला जाऊ लागतो. प्रेमासाठी, सहानुभूतीसाठी तहानलेला श्याम रामसाठी वेडा होऊ लागला. श्यामला रामचे वेड लागले.


शाळा सुटली की, मी रामच्या बरोबर जावयाचा. हातात हात घालून हसत आम्ही जावयाचे. रामला बोर्डिंगात पोचवून मग मी माझ्या घरी जात असे. बोर्डिंग काही वाटेवर नव्हते. तेवढा वळसा रामसाठी मी घेत असे. आनंदाने वोसंडलेल्या हृदयाने मी त्याच्या बरोबर जाई. शतजन्मांचे आपले ठेवणे सापडले, असे खरोखर मला त्या वेळेस वाटे.

छात्रालयातील रामच्या खोलीत मी क्षणभर बसत असे. तेथे त्या वेळेस दुसरे कोणी येऊ नये असे मला वाटे. दुसरे कोणी येताच जणू पावित्र्यभंग झाला, समाधिभंग झाला, असे मला होईल. रामची खोली म्हणजे ते या श्यामचे मंदिर होते. देवाच्या दारात क्षणभर बसावे, असा नियम आहे. पूजानियम मी पाळीत असे. जेथे निर्मळ प्रेम आहे तेथे परमेश्वर आहे. श्री.नारदांच्या भक्तिसूत्रात, 'स तु निरतिशय प्रेममय:' असे भगवंताचे वर्णन केलेले आहे.

एकदा रामने मला आंब्याचे साठे दिले. रामला कोणी तरी ते दिले होते. परंतु माझ्या रामने ते     माझ्यासाठी ठेवले होते. प्रेमाला प्रत्येक वस्तू महत्त्वाची वाटत असते. काय देऊ, काय न देऊ असे प्रेमाला होत असते. रामने मला साठे दिले; परंतु ते माझ्याने खाववेना. मी ते खिशात ठेविले. तो साठाचा तुकडा घेऊन मी घरी गेलो. तो तुकडा हातात घेऊन मी त्याकडे पहात राहिलो. त्या तुकडयात काय होते ! कदाचित तो तुकडा आंबटही असेल. एकदोन आंब्यांचा रसही त्यात वाळलेला नसेल. परंतु वस्तूची किंमत अंतरंगावर असते. त्या साठाच्या अंतरंगात काय होते ? तेथे त्रिभुवनातील सारी माधुरी श्याम अनुभवीत होता. अनंत जन्मीचा प्रेमरस तेथे सामावलेला होता. आंब्याच्या रसाचा तो सुकलेला तुकडा ! परंतु श्यामच्या सुकलेल्या, वाळलेल्या जीवनाला टवटवी देणारा तो अमृताचा अखंड झरा होता. त्या तुकडयात प्रेमाचा सिंधू होता, अपार ओलावा होता. वामनाच्या एका पावलात सारी पृथ्वी मावली. त्याप्रमाणे त्या तुकडयात अथांग प्रेम मला दिसत होते. अत्तराच्या एका थेंबात लाखो फुलांचा अर्क असतो. त्याप्रमाणे त्या साठयाच्या तुकडयात लाखो जन्मांतील मंगल व मधुर स्मृतींचा सुगंध भरुन राहिला होता.

« PreviousChapter ListNext »