Bookstruck

श्याम 147

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

माझ्या घरच्या सर्व मंडळींस वाईट वाटत होते; परंतु त्याला इलाज नव्हता. मी आईची व वडिलांची समजूत घातली. 'तेथे औंधला माझा एक मित्र आहे. तोही मला मदत करील. तुम्ही काळजी करु नका.' असे मी सांगितले.

मी पालगड सोडले. दापोलीची शाळा सोडली आणि बोटीत बसून मुंबईस आलो. मुंबईस मोठया भावास भेटून मी पुण्याला आलो. पुण्याला रामला भेटलो. माझ्या रामला पाहिले.

राम म्हणाला, 'श्याम ! औंधला पण होईल का व्यवस्था ?'

मी म्हटले, 'जात आहे खरा. वडिलांवर भार किती दिवस टाकावयाचा ? श्यामचे काहीही होवो. माझा पतंग मी हवेबरोबर सोडून देणार आहे. चढो, पडो, वा गोता खावो.'

राम म्हणाला, 'आधी विचार करणे बरे, औंधच्या महाराजांस आधी पत्र का लिहिले नाहीस ? आधी अर्ज करुन काय उत्तर येते ते पाहिले असतेस तर चांगले झाले असते.'

मी म्हटले, 'आणि नकार आला असता तर ? झाकली मूठ सव्वा लाखाची. नकार आधीच येता तर मला कोणीही जाऊ दिले नसते.'

राम म्हणाला, 'श्याम ! मला वाईट वाटते.'

मी म्हटले, 'तू पत्र पाठवीत जा म्हणजे मी आनंदात राहीन. कशीही परिस्थिती असो, तुझे पत्र आले म्हणजे सारे दु:ख मी विसरेन. तहानभूक विसरेन.

राम म्हणाला, 'श्याम ! तू वेडा आहेस झाले. भूक लागली असताना माझी पत्रे का खाशील ?'

मी म्हटले, 'तूच वेडा आहेस. तुला समजत नाही, प्रेमाच्या एका अक्षरात केवढे अमृत असते ते तुला काय माहीत ? राम ! तू सायंकाळी कधी सूर्यास्त पाहिला आहेस ?'

राम म्हणाला, 'मी कोठे श्यामसारखा कवी आहे ?'

मी म्हटले, 'राम ! सायंकाळी काळे काळे ढग एखादे वेळेस दिसतात; परंतु सूर्याचा एखादा किरण त्यांच्यावर पडतो, आणि ते सारे काळे ढग सोन्याचे होतात, त्याप्रमाणे आपल्या समोर दिसणा-या दु:खचिंतांच्या ढगावर मित्राकडून आलेल्या प्रेमाचा एखादाही किरण पडला तर ती दु:खे, त्या चिंता भेसूर न वाटता रमणीय व गोड वाटतात. तो किरण नवीन चैतन्य ओततो, नवीन धीर देतो.

एक किरण मज देई

केवळ एक किरण मज देई

राम म्हणाला, 'श्याम ! तुझ्यासारखी मला पत्रे लिहिता येत नाहीत. हृदयातील भावना शब्दांत प्रकट करता येत नाहीत.'

मी म्हटले, 'तू एखादे चित्र काढून मला पाठवीत जा. ते चित्र मी पाहीन. त्या चित्रात ओतलेले तुझे हृदय पाहीन.'

« PreviousChapter ListNext »