Bookstruck

श्री स्वामी समर्थ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://lh3.googleusercontent.com/-tCTdLnRfC84/Uzqsd-DtsrI/AAAAAAAABUo/jrp6wwlh-Kc/w480-h720/swamisamarth.jpg

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

« PreviousChapter ListNext »