Bookstruck

कुराण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हे गद्यकाव्य ६,२२६ आयतांचे (श्लोकांचे) असून ते ११४ सूरांमध्ये (अध्यायांत) संपादित केलेले आहे. सर्वांत मोठा सूरा २३६ आयतांचा असून दोन छोटे सूरा ३–३ आयतांचे आहेत. कुराणाची उत्पत्ती मुहंमदांना अधूनमधून मिळणाऱ्या स्फूर्तीने बावीस वर्षे चालू होती. वेळोवेळी ह्या आयता मुखोद्‌गत केल्या जात आणि पानांवर किंवा चामड्यांवर लिहिल्या जात. मुहंमदांच्या मृत्यूनंतर सु. वीस वर्षांनी त्यांचा जावई खलीफा उस्मान याच्या मार्गदर्शनाखाली कुराणाचे संपादन झाले. आता माहीत नसलेल्या कोणत्यातरी कारणासाठी, संपादकाने स्थलकालाचा क्रम ठेवला नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या आणि अगदी शेवटी उत्स्फूर्त झालेल्या आयताही एका सूरामध्ये सापडतात. सूरांची मांडणीकरतानासुद्धा अगदी शेवटचे आणि मोठे सूरा प्रथम आणि सुरुवातीच्या आयता असलेले सूरा मध्येच किंवा शेवटी आले आहेत. पहिल्या संपादनानंतर सु. शंभर वर्षांनी कोणता सूरा मक्केतील (मुहंमदांच्या धार्मिक कारकीर्दीतील पहिला कालखंड) आणि कोणता मदीनेतील ते प्रारंभी नमूद करण्याची पद्धती सुरू झाली. मक्केतील सूरांचा एकंदर सूर आर्जवीपणाचा, इस्लामचे तत्वज्ञान पटवून देण्याचा आहे. त्यांत परमेश्वराचे वर्णन, अंतिम न्यायदिनाची माहिती, स्वर्गसुखाचे आणि नरकयातनांचे वर्णन, विश्वनिर्मिती तसेच सैतानाची आणि आदमची कथा,ज्यू आणि ख्रिश्चन धर्मांतील पुराणकथांचे एकेश्वरवाद आणि मूर्तिपूजेचा धिक्कार या तत्वांनुसार केलेले विवरण, तत्कालीन वाईट चालींचा धिक्कार, मुहंमदांना लोकांनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरे, मुहंमदांना मक्केच्या लोकांचा विरोध इ. हकीकत दिली आहे. मक्केहून मुहंमद यस्त्रिब शहरात गेले. तेथील स्थानिक शासन त्यांच्या हवाली करण्यात आले. पैगंबरांचे गाव म्हणून यस्त्रिबला मदीना हे नाव पडले. मदीनेतील आयतांतून अधिकार आणि आत्मविश्वास पदोपदी प्रकट होतो. या आयतांतून मुहंमदांच्या राज्यातील ज्यू, ख्रिश्चन आदी विविध जमातींचे शासनाशी संबंध, ज्यू आणि ख्रिश्चनांना मुहंमद हे ईश्वराचे प्रेषित आहेत हे मान्य करण्याचे आवाहन, नवीन राज्यांतील मुलकी आणि फौजदारी कायदे, नवी रीतिरिवाज, मक्केच्या मूर्तिपूजकांशी झालेल्या लढाया, या लढायांत सामील  होण्याचे आणि लढाईसाठी देणग्या देण्याचे आवाहन, अनुयायांनी लढाईच्या वेळी पाळण्याची शिस्त, कचखाऊ अनुयायांचा धिक्कार, ज्यू आणि ख्रिश्चनांची अरबस्तानातून हकालपट्टी, मक्केवरील अंतिम विजय आणि काबावर मिळविलेला ताबा, तेथील मूर्तींचे भंजन इ. विषय हाताळलेले आहेत.कुराणाची भाषा अत्यंत प्रभावी आहे. मुहंमदांनी तारुण्याची वीस वर्षे मोठ्या व्यापारधंद्यात घालविली होती; यावरून त्यांना लिहिता वाचता येत असावे असे वाटते. परंतु ते अशिक्षित होते असा जवळ जवळ सर्व मुस्लिम धर्मवेत्त्यांचा दावा आहे. किंबहुना एका अशिक्षित माणसाच्या तोंडून कुराणासारखा भव्य, प्रतिभासंपन्न आणि सामर्थ्यशाली ग्रंथ बाहेर पडावा, हेच ईश्वरी कृपेचे आणि चमत्काराचे उदाहरण आहे, असे भाविक लोक मानतात. किंबहुना प्रत्येक आयत म्हणजे एक चमत्कार आहे; म्हणून कुराणाच्या आयतास अरबीत चमत्काराचा निदर्शक अशा अर्थाचा ‘आयत’ हाच शब्द वापरतात. नवव्या सूराखेरीज प्रत्येक सूराची सुरुवात ‘कृपाळू आणि दयावंत परमेश्वराच्या नावाने’ या अर्थाच्या शब्दांनी होते. एकदोन सूरा सोडले तर बाकीचे सर्व सूरा मुहंमदांना किंवा लोकांना उद्देशून परमेश्वर, भाषण करीत असल्यासारखे आहेत. कुराणातपरमेश्वर स्वत:चा उल्लेख ‘आम्ही’ असा करतो; काही वेळा ‘मी’ हा शब्दही वापरलेला आहे. ईश्वराच्या वाणीचे भाषांतर करणे चूक आहे या कारणासाठी कित्येक शतके कुराणाचे भाषांतर करण्यास प्रतिबंध होता

« PreviousChapter ListNext »