अजामिल
प्राचीनकाळात कन्याकुब्ज नगरात अजामिल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. लहानपणी तो खूप चरित्रवान व सदाचारी होता. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तो एके दिवशी फुले वेचण्याकरिता म्हणून पुष्पवाटिकेत गेला. परत येताना त्याला काही दारूडे जुगारी व वाईट व्यसनांत मती गुंग झालेले तरुण दिसले. त्याचक्षणी अजामिलच्या मनाने चुकीच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला व त्याने घरदार सोडून ताडी विकून धर्माविरुद्ध वागणाऱ्या एका बाईबरोबर विवाह करून भोगविलासात आपले आयुष्य घालवले. त्यांना एकूण आठ मुले झाली शेवटच्या मुलाचे नांव त्यांनी "नारायण" असे ठेवले.
वाधक्य आल्या बरोबर अजामिल आजारी पडला व त्याने अंथरूण धरले. त्या स्थितीत असतांना त्याला यमराजाचे दूत दिसू लागले. मरणाच्या भीतीने त्याने मोठ्याने किंचाळत आपल्या लहान मुलाचे नांव घेत 'नारायण' 'नारायण' असे ओरडत हांका मारले. हे शब्द जेव्हा विष्णूदूतांच्या कानी पडले तेव्हा त्यांनी ताबडतोब अजामिलला दृष्टांत दिला. तेव्हा तेथे उपस्थित झालेल्या यमदूतांमध्ये व विष्णूदूतांमध्ये वादविवाद सुरू झाला की, ह्याला यमलोकात न्यायचे का विष्णूलोकात? अजामिल तर बेशुद्धावस्थेत होता. तरी त्याला अस्पष्ट ऐकू आले. त्यांच्या बोलाचाली वरून कळले आपण कसे नीच जीवन जगत आहोत. उसका त्याला पश्चाताप होऊ लागला.
शेवटी यमदूत असा विचार करीत तेथून निघून गेले की--"हा कोणीतरी मोठा विष्णूभक्त दिसतो आहे. आपण बहुधा चुकून इथे आलो!" असे होऊन त्याची मरणाची वेळ तर टळून गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला की, त्याचे आरोग्य सुधारू लागले.
त्या दिवसापासून त्याच्या मनात भयंकर बदल झाला. त्याने असे मनात स्मरण केले आपला लहान मुलगा "नारायण" ह्याला हांका मारले तरी विष्णू दूत त्या बोलाष्याने धावून आले. व विष्णूचे आपल्यावरील अगाध प्रेम पाहून त्याला गहिवरून येऊ लागले. त्याने आपले उर्वरित आयुष्य देवाची भक्ती ध्यान धारणा सदाचरण ध्यात घालवून गंगा किनारी आपली समाधी लावली. व आपल्या शरीराचा त्याग करून तो विष्णू लोकांत गेला.