अतिशहाणा
सोमनाथला वाटे, की आपला मुलगा सुनन्द हा मोठा बुद्धिमान मुलगा आहे. त्याने सुनन्दला शिक्षण यावे म्हणून शहरात नेले आणि निर्मलानंद नावाच्या गुरुंकडे ठेवले.
काही दिवसांनी सोमनाथला काही कामा निमित्त शहरात जायचे होते. तो निर्मलानंदकडे ही गेला. त्याला पहाताच निर्मलानंद म्हणाला- “तुझा मुलगा अतिशहाणा आहे; त्यामुळे त्याला शिकवणं फार कठीण काम आहे.”
पण सोमनाथला ते काही पटेना. तो म्हणाला- “माझा मुलगा तर चांगला चलाख अन् खूपच बुद्धिमान आहे. मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे नीटसं लक्ष देत नसावेत.”
हे उत्तर ऐकून निर्मलानंदला फारच वाईट वाटले. त्याने सुनन्दला जवळ बोलावले व म्हटले- “हे बघ सुनन्द! जुन्या काळी आपल्या देशात इतके अद्भुत कलावान विणकर असत की त्यांनी विणलेली एक एक साडी काडेपेटीत सहज मावू शके! तुझ्या लक्षात आलं ना मी काय सांगतोय ते?”
सुनन्दने होकारात्मक मान हलवली.
“ठीक आहे, सांग बरं काय समजलं तुला?” गुरूंनी सुनन्दला विचारले.
“असंच की, त्या काळात कोडेपेटीचा इतक्या मोठाल्या असत की त्यात एकेक साडीही सामावू शके! बरोबर ना?” सुनन्द झटकन उत्तरला.
आता सोमनाथला शहाणपण अन् अतिशहाणपणा यातला फरक कळून चुकला! ‘आपण पटकन् काहीतरी बोललो’ म्हणून त्याने निर्मलानंदची क्षमा मागितली, आणि ‘काहीही करून सुनन्दला नीट मार्गावर आणेन’ असे त्यांच्याकडून वचन घेऊन सोमनाथ घरी परतला.