अदृश्य रूपातली मोलकरीण
सुंदरी ही श्रीमंत सुकुमारीची मैत्रीण होती. पण गरीब असूनही ती कधीच कुणापुढे हात पसरत नसे. मनात कोणताही भेदभाव न बाळगता दोघी मैत्रिणी एकमेकींकडे जात-येत असत.
सुकुमारीच्या घरी एकदा दागिन्यांचा एक व्यापारी दूर प्रांतातून आला. सुकुमारीच्या वडिलांनी चार-पाच दागिने खरेदीही केले.
या व्यापाऱ्याबरोबर नलंद नावाचा एक तरुणही होता. दिसायला तो खूपच सुंदर व रुबाबदार होता. सुकुमारी त्याच्याकडे आकर्षित झाली व त्याच्याशीच विवाह करावा असे तिने ठरवले. सुंदरीला बोलावून तिने तिच्यासमोर आपली इच्छा प्रकट केली. ती सुंदरीला म्हणाली, "दागिन्यांचा व्यापारी धर्मशाळेत उतरला आहे. कसंही करून तू त्या तरुणाला भेटून त्याला माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाबद्दल सांग. त्याला हवा तेवढा हुंडाही माझे बाबा देऊ शकतील."
त्याच दिवशी संध्याकाळी सुंदरी धर्मशाळेत जाऊन नलंदला भेटली. स्वतःच स्वतःचा परिचय करून देऊन तिने त्याला आपली मैत्रीण सुकुमारी हिची इच्छा सांगितली.
नलंद सुंदरीकडे पहातच राहिला. तिच्याकडून सारी हकीकत जाणल्यावर तो सुंदरीला म्हणाला, "तुझ्या सौंदर्याने माझ्यावर जादू केली आहे. तुझं बोलणं मी ऐकले आहे, पण माझे तिकडे नीट लक्ष लागले नाही. मी लग्न करीन, तर तुझ्याशीच. हे न घडले तर मी जीव देईन."
असा काही विपरीत परिणाम होईल, याची सुंदरीने कल्पनाच केली नव्हती! घाबरत ती तेथून काही न बोलताच सटकली. त्या दोघांचे बोलणे व्यापाऱ्याने मात्र दुरून ऐकले होते. तो नलंदजवळ येऊन म्हणाला, "ही मुलगी चांगलीच हुशार वाटतेय. पण ती तर आपल्या मैत्रिणीबद्दल बोलायला तुझ्याकडे आली होती. तेव्हा आता तू स्वतःच सुकुमारीकडे जाऊन तिच्याशी बोलून या विवाहासाठी संमती मिळवायला हवीस. तसे न झाले, तर सुंदरी तुझ्याशी लग्नाला तयार होणार नाही."
दुसऱ्या दिवशी नलंद सुकुमारीला भेटायला गेला आणि जे काही घडले, ते त्याने तिला स्पष्ट सांगून टाकले. पुढे तो म्हणाला, "यात सुंदरीचा काहीही दोष नाही. तेव्हा तिच्याबद्दल गैरसमज नसावा. तिच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. तूच तिला नीट समजावून या लग्नाला राजी कर."
ही सारी हकीकत ऐकून सुकुमारीला काही बोलायला वावच उरला नाही. नाइलाज म्हणून तिला त्याला 'होय' म्हणावेच लागले.
सुंदरी व नलंदचा रीतसर विवाह होऊन दोघेही ते गाव सोडून निघून गेले. यानंतर थोड्याच दिवसांनी सुकुमारीचा विवाहही एका संपन्न माणसाशी होऊन गेला.
काही वर्षे निघून गेली आणि एक दिवस सुकुमारीला समजले की सुंदरी आपल्या पतीसह चक्रपूर गावात राहत आहे. तिला हेही समजले की ते दोघे तिथे छान सुखासमाधानात आहेत. हे ऐकून ती द्वेषाने जळू लागली. आपण स्वतः किती वैभवात व चैनीत राहत आहोत हे नलंदला दाखवून द्यावे, अशा इच्छेने तिने चक्रपूरला सुंदरीकडे जायचे ठरवले. एक मोलकरीण बरोबर घेऊन ती चक्रपूरला गेली.
सुंदरीने मोठ्या प्रेमाने आपल्या मैत्रिणीचे स्वागत केले. दोघेही नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करत आहेत व त्यांच्यात कसल्याही प्रकारचा झगडा वगैरे नसल्याचे पाहून सुकुमारीच्या मनात जास्तच आग पेटली.
दुसऱ्या दिवशी खोटी सहानुभूती दाखवत ती सुंदरीला म्हणाली, "तुझ्या घरात कोणी नोकरचाकर नाहीत ही मोठी दुःखाची गोष्ट आहे."
यावर हसतच सुंदरी म्हणाली. "अरे, माझ्याकडे मोलकरीण नाही, असं का वाटलं तुला? ती तुला न दिसता, अदृश्यपणेच सगळी कामं करून टाकत असते. पाहिलंस ना, माझं घर किती स्वच्छ अन् नीटनेटके आहे? मग तूच सांग बरं, मोलकरीण नसून इतकं कसं शक्य झालं असतं?"
मैत्रिणीच्या या बोलण्याने सुकुमारीचे औत्सुक्य वाढले. तिने खूप जागरूकतेने पाहिले, पण तिला मोलकरीण कुठे दिसलीच नाही. चार दिवस राहिल्यावर तिने परत जायचे ठरवले.
निघण्यापूर्वी काही नवीन साड्यांचे एक गाठोडे तिच्यासमोर उघडत सुंदरी म्हणाली, "सुकुमारी, तुझ्या येण्यामुळे मला किती आनंद झाला, कसं सांगू? यातली तुला आवडेल ती साडी घे, माझी आठवण म्हणून."
सुकुमारीने लगेच आपल्या मोलकरणीला बोलावून साडी पसंत करून घ्यायला सांगितले. सुंदरीच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य पाहून ती म्हणाली, "अग, मी नेसण्यालायक साडी काही तू देऊ शकणार नाहीस. असली साडी मी नेसली तर माझी किती नाचक्की होईल, तुला काय माहीत? म्हणून मी ती आपल्या मोलकरणीला घ्यायला सांगते आहे." सुंदरी यावर काय बोलणार?
या घटनेनंतर काही दिवसांनी सुंदरीही आपल्या माहेरी गेली. सुकुमारी मुद्दामच तिला भेटायला गेली, अन् परत निघताना म्हणाली, "सासरी जाण्यापूर्वी एक दिवस नक्की माझ्याकडे जेवायला ये."
जेवणानंतर सुकुमारीनेही साड्यांचे एक गाठोडे सुंदरीसमोर ठेवून साडी पसंत करायला सांगितली अन् म्हटले, "या काही साध्यासुध्या साड्या नव्हेत, खूप महाग आहेत या! मी नेहमी असल्याच साड्या वापरते."
सुंदरीने त्यातली एक साडी निवडून घेत म्हटले, "मी तुला देऊ केलेली साडी तू आपल्या मोलकरणीला देऊन टाकलीस. आता ही साडी मीही माझ्या मोलकरणीला दिली, तर ते संयुक्तिकच होईल ना? गैरसमज नको करून घेऊस हं!"
"हो, माझ्या मोलकरणीला मी स्वतः नेसते तसलीच देते साडी." असे उत्तर देऊन सुंदरी तेथून निघून गेली.
सुंदरीचे हे बोलणे सुकुमारी विसरू शकणे शक्यच नव्हते. तिने ओळखले की जशास तसा टोला देऊन सुंदरीने एक प्रकारे आपला अपमानच केला आहे. ती मनातल्या मनात चरफडत राहिली.
एक महिन्यानंतर सुकुमारीच्या नवऱ्याला काही कामासाठी चक्रपूरला जायचे होते. सुकुमारीही त्याच्याबरोबर मुद्दामच गेली. तिच्या मनात अजूनही तो अपमान सलत होता. नवरा आपल्या कामाला निघून गेला अन् सुकुमारीने सुंदरीकडे जाऊन तिचा दरवाजा खटखटावला.
सुंदरीने दरवाजा उघडला. पण त्यावेळी ती कपडे धूत असताना मध्येच बाहेर आल्याने तिच्या तोंडावर व हातापायांवर पाण्याचे शिंतोडे पडलेले होते, अन् केसही विसकटलेले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तिने नेमकी सुकुमारीने दिलेली साडीच नेसलेली होती.
"तुझ्या मोलकरणीलाच पहायला आले होते मी! आज ती कामाला आली नाही वाटतं? अन् तिचं नाव सांगून आणलेली साडी तू कशी काय नेसलीस?" आश्चर्याने अन् व्यंगाने सुकुमारीने विचारले.
सुंदरी हसत बोलू लागली, "म्हणजे? अजूनही समजले नाही तुला? अगं, मीच तर ती मोलकरीण! तूच सांग, आपले काम आपणच करावे, आपले खाणे आपणच बनवून खावे हेच बरे नव्हे का? यासाठीच तर देवाने आपल्याला शरीराचे अवयव दिले आहेत ना? त्यांचा उपयोग न करता, आपली कामं दुसऱ्याकडून करवून घेणारे, एक प्रकारे पांगळेच समजायचे की नाही? मग आता मी ही साडी का नेसली आहे याचं आश्चर्य गेलं की नाही? घरगुती कामं करतानाही मी याच साड्या नेसते."
सुंदरीचा भलेपण व हुशारी पाहून तिची प्रशंसा करत सुकुमारी म्हणाली, "द्वेष अन् अहंकारामुळे मी तुझ्यासारख्या चांगल्या मैत्रिणीला मुकले असते. क्षमा कर मला! लग्नापूर्वी होता तसाच पवित्र अन् निस्वार्थ स्नेह आपण कायम ठेवू या."