Bookstruck

अष्टावधान

अवधानी पांडित्यामध्ये आपल्या वडिलांपेक्षा दोन पावलं पुढेच होता. त्याच्या वडिलांनी खरे तर त्याचे नाव सदानंद ठेवले होते, पण अवधान विद्येमध्ये असाधारण प्राविण्य दाखवल्यामुळे सर्वजण त्याला 'अवधानी' म्हणूनच हाक मारीत. अवधान विद्येत 'अष्टावधान' अतिशय कठीण व गंभीर आहे. शतावधानांत त्याच्या चारी बाजूंना शंभर विद्वान बसतात. एकेकजण एकेक प्रश्न विचारतो, व त्याचे उत्तर पद्यांत द्यावे लागते. साधारणपणे एका पद्यांत चार ओळी असतात व ती अवधानीला एकाच वेळी सांगायची नसतात. प्रथम प्रत्येक पद्यातून एक पद सांगायचे असते. तसेच कोणी कोणता प्रश्न विचारला आहे हेही लक्षात ठेवावे लागते, व प्रत्येकाला दोन पदे ऐकवायची असतात. याप्रमाणे तिसरे व चौथे पद ऐकल्यानंतर शेवटी बरोबर बसलेल्या सर्व विद्वानांना चारी पदे ऐकवायची असतात. यासाठी स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व पांडित्य यांची अत्यंत गरज असते. शतावधानाहून अष्टावधान आणखी कठीण व क्लिष्ट आहे. यांत अवधानीच्या चारी बाजूंना विविध प्रकारचे प्रश्नांवर प्रश्न विचारणारे आठ पंडित असतात, त्यांना 'पृच्छक' म्हणतात. हे पृच्छक त्याला वाटेल ते प्रश्न विचारून त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेतात. पहिला पंडित: एखादी कठीण प्रसंगातून वाट कशी काढायची ते विचारतो. दुसरा पंडित: फुलाने अवधानीला हळुवार स्पर्श करत राहतो. तिसरा पंडित: काहीतरी फालतू प्रश्न विचारून त्याचा वेळ दवडू पाहतो. चौथा पंडित: त्याच्यासमोर बुद्धिबळ खेळून त्याचे लक्ष आपल्याकडे वेधायला बघतो. पाचवा पंडित: चौसष्ट अक्षरे असलेला श्लोक वाचत राहतो, पण हा श्लोक क्रमाने वाचला जात नाही. त्याला वाटेल तसे तो अक्षरे बोलत जातो (उदा. २५वे अक्षर, मग १८वे, मग पहिले). सहावा पंडित: मध्येच काव्य वाचायचे थांबवतो व त्याठिकाणी अवधानी कुठल्या पद्याचा उपयोग करतो इकडे लक्ष ठेवतो. सातवा पंडित: अधून मधून घंटा वाजवत राहतो. आठवा पंडित: व्याकरणासंबंधी प्रश्न विचारत राहतो. अशा रीतीने ते सर्वजण त्याची एकाग्रता भंग करत राहतात. शेवटी अवधानीने या सर्वांना चातुर्याने, कौशल्यपूर्ण उत्तरे द्यायची असतात. फुलाचा स्पर्श अंगाला किती वेळा झाला हे त्याला बरोबर सांगावे लागते, फालतू प्रश्नांना युक्तीने उत्तर द्यावे लागते, बुद्धिबळात प्रतिस्पर्ध्याचे डाव उलटवून पडतील अशी चाल खेळावी लागते, श्लोकांतल्या सर्व अक्षरांची आठवण ठेवून तो योग्य क्रमांत लावून बरोबर श्लोक सांगावा लागतो, तसेच घंटा किती वेळा वाजली व व्याकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर द्यावे लागते. एकाच वेळी आठ भिन्न कार्यांना योग्य रीतीने सांभाळण्याची क्षमता असली पाहिजे. असे अतिशय कठीण व क्लिष्ट अष्टावधान सहजपणे करण्याची क्षमता अवधानीमध्ये होती. त्याच्या ह्या प्रतिभेचे सर्वांना आश्चर्य व कौतुक वाटत असे. त्याच्या वडिलांनी पांडित्यात परिपूर्ण असलेल्या अवधानीचा विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. श्रीधाम येथे राहणारी सुमती, अवधानीची पत्नी व्हायला योग्य मुलगी आहे असे त्यांना वाटत होते. परंतु अवधानीला इतक्या लवकर विवाह करायची इच्छा नव्हती. त्याला वाटे की एखादी विद्वान पत्नीच त्याला मिळावी. "माझी पत्नीही माझ्यासारखी विद्वान, सर्व विद्येत निपुण असावी अशी मी अपेक्षा केल्यास त्यात काय चुकलं?" तो म्हणे. अवधानीच्या वडिलांना माहीत होते की त्यांचा मुलगा केवळ शास्त्रांत पंडित आहे पण व्यावहारिक ज्ञानात तो अजाण आहे. ते हसत म्हणाले - "एकदा तू सुमतीला पाहून ये. तुला ती मुलगी पसंत पडली नाही तर मग दुसरी मुलगी पाहूया." वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून अवधानी सुमतीला पाहायला तिच्या गावी गेला. सुमतीच्या वडिलांनी प्रेमाने त्याचे स्वागत केले व सुमतीला त्याचे आदरातिथ्य करायला सांगितले. सुमतीचे सौंदर्य पाहून अवधानी चकित झाला, पण तरीही त्याच्या मनात विचार आला - "मला सौंदर्यात काही रुची नाही, मला पाहिजे बुद्धिमत्ता!" पण दुसऱ्या दिवशी सुमतीच्या वागण्याने तो तिच्यावर मुग्ध झाला. सुमती भल्या पहाटेच उठते, अंगणात केर काढून सर्व स्वच्छ करते. वय झालेल्या आजीला नियमित औषध देते. पूजेचे सर्व सामान तयार ठेवते. स्वयंपाकात बहिणीला मदत करते. सकाळी सर्वांना न्याहारी देऊन झाली की तळ्यावर जाऊन पाणी घेऊन येते. वडील व मोठ्या भावाला काय हवे-नको ते पाहते. मोठ्या भावाचा मुलगा तिला नको ते प्रश्न विचारतो, पण ती त्याला शांतपणे उत्तरे देते. कोणा पाहुण्यांची विचारपूस करते. इतके सर्व झाल्यावर अवधानीला काय हवे-नको ते पाहते. अधून मधून आरशात पाहून स्वतःला नीट करते, सदैव खळखळून हसते. कोणी गंमत म्हणून तिची टिंगल केली तर योग्य म्हणीचा उपयोग करून ती त्यांचे तोंड बंद करते. तिची ही सर्वांशी वागण्याची पद्धत अवधानीला आवडली. संध्याकाळी सुमती अवधानीला गाव दाखवायला घेऊन गेली. तिने विष्णू मंदिर व ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगितली. अवधानीने तिच्या ज्ञानाची स्तुती केली. अवधानीने तिला आपल्या अष्टावधानाविषयी सविस्तर सांगितले आणि त्याला मिळालेले सोन्याचे कंकण दाखवले. तो म्हणाला, "तुझी बुद्धिमत्ता आणि काम करण्याची क्षमता अद्भूत आहे. तुझी इच्छा असेल तर एका वर्षाच्या आत मी तुला ही कला शिकवेन आणि तुला पंडिता बनवून तुझ्याशी लग्न करेन." सुमती नकारात्मक डोके हलवत म्हणाली - "नाही, मला अवधानी व्हायचे नाही. लोकांना आनंद देणे ही उत्तम कला आहे, पण मला लोकांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करण्यांतच जास्त आनंद मिळतो. त्यामुळे मी घरीच राहून घरच्या सर्व लोकांना मदत करते." तिचे हे बोलणे ऐकून अवधानी थक्कच झाला. तो म्हणाला - "तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. माझी विद्या केवळ मनोरंजनासाठी व वेळ घालवण्यासाठी आहे, तर तुझी विद्या दुसऱ्यांना सुख देण्यासाठी व विश्रांती देण्यासाठी आहे. माझ्या अष्टावधानापेक्षा तुझे अष्टावधानच श्रेष्ठ आहे. खरं पाहता हे सुवर्णकंकण घालून घ्यायला तूच योग्य आहेस." असे म्हणून त्याने आपल्या हातातले कंकण काढून तिच्या हातात घातले. नंतर काही दिवसांतच त्या दोघांचा विवाह झाला.