आजचा अर्जुन
"भीमा, काय दिसते तुला?" गुरुवर्य द्रोणाचार्यांनी विचारले.
टिंग टिंग... भीमाचा फोन वाजला. "गुरुवर्य, एक मिनिट, फोनवर नोटिफिकेशन आले होते." द्रोणाचार्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. "अरे, झाडावर नेम धर आधी, फोन नंतर पहा," ते वैतागून म्हणाले. "गुरुवर्य, आज स्विगीवर स्पेशल ऑफर होती, त्याची डिलिव्हरी मागितली होती. कदाचित त्याचा OTP आला असावा. एक मिनिट मी पाहतो." भीमाने धनुष्य खाली ठेवले, फोन बाहेर काढला आणि डिलिव्हरी आली म्हणून तो बाहेर पळाला. "हा मेला खादाड असाच, हा काही सुधारणार नाही," द्रोणाचार्य पुटपुटले.
अर्जुन तसा हुशार मुलगा होता. "अर्जुना, तू ये बघू." अर्जुन मात्र अतिशय निस्तब्धपणे द्रोणाचार्यांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. "अरे अर्जुना... ऐकू येत नाहीये का?" द्रोणाचार्य ओरडले. नकुलाने अर्जुनाचा हात हलवला आणि द्रोणाचार्य काहीतरी बोलत आहेत हे सुचवले. अर्जुनाने मग अचानक कानातून आपले एअरपॉड्स काढले. "सॉरी गुरुवर्य, कानात मी संगीत ऐकत होतो. कुरुप्रदेशात नवीन के-पॉप बँड आलाय, मस्त आहेत त्याची गीते."
"ब्रह्मास्त्र पडो त्या बँडवर! आधी तुझे धनुष्यबाण उचल आणि नेम धर," द्रोणाचार्यांनी आदेश दिला.
अर्जुन हळूच उठला. उठताना अचानक कंबर लचकली. मग त्याने आळोखेपिळोखे द्यायला सुरुवात केली.
"अरे, आता काय एरोबिक्स करणार आहे का? अजून खूप लोकांना नेम धरायचा आहे. ये इकडे!"
"थांबा गुरुवर्य, थोडा आळस आलाय."
"अरे, उद्या युद्धात शत्रू उभा ठाकला तर काय आळस दाखवशील?"
"त्यावेळी भीम बघून घेईल शत्रूला. नाहीतरी तोच असली कामे करतो. मला नको युद्ध वगैरे. हा बुद्धाचा देश आहे, युद्धाचा नाही."
"डोंबल! अरे हे द्वापारयुग आहे. बुद्ध अजून यायचा आहे."
"पण यूट्यूबवर कुणीतरी शकुनी म्हणून आहे, तो हे व्हिडिओ टाकतो."
"हे सगळे बघायला वेळ मिळतो, पण इथे नेम धरताना इतर सर्व गोष्टी आठवतात. नेम धर आधी!"
अर्जुनने मग नाईलाजाने धनुष्य उचलले आणि नेम धरला.
"काय दिसते तुला, सांग?" द्रोणाचार्यांनी विचारले.
अर्जुनाने अचानक धनुष्य खाली ठेवले. "थांबा गुरुदेव, गॉगल लावायला विसरलो. ऊन डोळ्यावर येते."
द्रोणाचार्यांचा पारा मस्तकाला गेला. "ठीक आहे, ते लाव. सनस्क्रीन आणायला लावू का अश्वत्थाम्याला?" त्यांनी उपरोधाने म्हटले. अर्जुनाला उपरोध समजला नाही. "नाही गुरुदेव, कुंतीमाता लावूनच पाठवते."
मग अर्जुनने धनुष्य उचलले. आजूबाजूला नकुल, सहदेव, दुर्योधन वगैरे मंडळी पाहत होती. युधिष्ठिर दूरवर बसून होमवर्क करत होता.
"बोल मग आता, तुला काय दिसते?"
"मस्त दिसते गुरुदेव. हा गॉगल छान आहे, आता ऊन नाही लागत."
"अरे मूर्खा, ते नाही विचारले तुला! नेम धरून काय दिसते?"
"गुरुदेव, मला मूर्ख वगैरे म्हणू नका, मला एन्झायटी होते."
"अरे बाता नंतर कर. झाड दिसते का तुला?"
"हो हो, झाड दिसते. तुमच्या काळी असली झाडे होती का गुरुदेव?"
"अरे, त्याचा इथे काय संबंध? झाडे हजारो वर्षांपासून आहेत पृथ्वीवर."
"मग तुम्ही कधी नेम धरला होता का?"
"अरे, मी नेम धरला म्हणूनच मी गुरु झालो की नाही इथे?"
"पण कुंतीमाता तर म्हणत होती की तुम्ही कृपाचार्यांच्या वशिल्यावरून इथे कामाला लागलात."
"अरे बाबा... काय बरळतोस? नेम धर त्या पक्ष्यावर!"
"पक्षी? कुठे आहे पक्षी?" अर्जुनाने विचारले.
"अरे, झाडावर मीच ठेवलाय, तुला दिसत नाही का?"
"हा हा, दिसला गुरुदेव. आहे पक्षी."
"मग नेम धर आणि सोड बाण."
"थांबा गुरुदेव! नकुला, जरा व्हिडिओ काढ बरे. मला ना पांचालीला पाठवायचा धर्मेश नंतर."
"अरे, व्हिडिओ कशाला पाहिजे?"
"गुरुदेव, मग लोकांना कसे कळेल मला धनुर्विद्या येते ते?"
"लोकांना कशाला कळायला पाहिजे?"
"मग शिकून काय उपयोग?"
"अरे, उद्या युद्धात नाही का वापरणार?"
"च्यायला! मला नाही बाबा युद्ध वगैरे जमत. कोण उन्हात फिरणार? आणि चुकून बाण वगैरे लागला तर?"
"लागला म्हणजे काय? तुम्ही क्षत्रिय वंशाचे ना? तुमच्यात युद्ध करण्याची क्षमता पाहिजे."
"अहो, पण ते सोशल सायन्सच्या पुस्तकात लिहिले आहे की जाती-वर्ण वगैरे चुकीच्या गोष्टी आहेत."
"अरे, पण युद्ध तुलाच लढायला पाहिजे!"
"पण का म्हणून?"
"अरे, त्याचे उत्तर तुला केशव देणार, युद्धाच्या वेळी."
"आता का नाही?"
"तसे विधिलिखित आहे!"
"मग तुमचे विधिलिखित काय आहे?"
"अरे, तू बाण मारतोस की नाही? की मी तुला 'F' ग्रेड देऊ?"
इतक्यात पहिल्या बाकावर बसणारा, आज्ञाधारक, चष्मिष्ट युधिष्ठिर आला. "गुरुवर्य, एक शंका होती."
"काय ती?"
"तो झाडावर तुम्ही पक्षी लावलाय?"
"हो, लाकडाचा खोटा पक्षी आहे तो," द्रोणाचार्य म्हणाले.
"पण इथे सिलॅबसमध्ये तर सांगितले आहे की झाडावर छोटा लाकडी हत्ती ठेवायचा आहे." युधिष्ठिराने सिलॅबसची कॉपी दाखवली.
"अरे बाबा, लाकडी पक्षी असो, माकड असो वा हत्ती, काय फरक पडतो?"
"गुरुवर्य, हे नियमांच्या विरुद्ध आहे. नियम पाळले पाहिजेत."
द्रोणाचार्य वैतागले. शेवटी शाळेचे अनुदान यांच्या आई-वडिलांकडून येत होते, त्यामुळे युधिष्ठिराचे म्हणणे मान्य करणे भाग होते.
द्रोणाचार्य शाळेच्या कपाटात गेले. तिथे लाकडी हत्ती होता, तो घेऊन आले. वैतागून ते झाडावर चढू लागले. इथे अर्जुन प्रत्यंचा ताणून उभा होता. द्रोणाचार्य धोतर सांभाळत वरच्या फांदीवर गेले. "नशीब माझे म्हणून इथे अडकलो. त्या हरामखोर द्रुपदाने मला फसवले नसते, तर आज या मुलांचे हे नखरे सहन करण्याची पाळी आली नसती," असे पुटपुटत त्यांनी पक्षी काढला आणि त्या जागी लाकडी छोटा हत्ती ठेवला.
"गुरुदेव, हात दुखले प्रत्यंचा ओढून," खालून अर्जुन ओरडला.
"अरे मग सोडून द्यायची ना!" द्रोणाचार्य वरून ओरडले.
अर्जुनने त्याचा अर्थ शब्दशः घेतला. त्याने प्रत्यंचा सोडून दिली आणि त्यामुळे बाण सुद्धा सुटला. "सिल्ली मिस्टेक!" अर्जुन आपली जीभ चावत उद्गारला. तिकडे बाण वेगाने जाऊन कुठे तरी धडकला आणि द्रोणाचार्यांचे विव्हळणे ऐकू आले.
"युधिष्ठिरा, बाण लागला का रे?" अर्जुनने विचारले.
"नरो वा कुंजरो वा," युधिष्ठिर भयभीत चेहऱ्याने बोलला. "आज कदाचित मला सुद्धा बंक करावे लागणार," असे म्हणून त्याने सुद्धा धूम ठोकली.