Bookstruck

उंदराची भाकडकथा

एक होता उंदीर. धावता धावता त्याच्या शेपटीत काटा शिरला. तो सुताराकडे गेला आणि म्हणाला, "सुतारदादा, काटा काढ." सुतार म्हणाला, "शेपूट तुटली तर?" उंदीर म्हणाला, "तुझी माझी बलाय गेली." सुताराने काटा काढला पण शेपूट तुटली. उंदीर म्हणाला, "माझी शेपूट दे, नाहीतर तुझी विन्नी (कुऱ्हाड) दे." उंदीर विन्नी घेऊन निघाला. वाटेत एक कुणबी नखांनी जमीन खणताना दिसला. उंदीर म्हणाला, "कुणबीदादा, ही विन्नी घे." कुणब्याने विन्नी घेतली पण ती मोडली. उंदीर म्हणाला, "विन्नी दे, नाहीतर मडके दे." उंदीर मडके घेऊन निघाला. वाटेत एक म्हातारा ओंजळीने अळ्यांना पाणी घालत होता. उंदराने त्याला मडके दिले. मडके फुटले तेव्हा उंदीर म्हणाला, "मडके दे, नाहीतर तौसे (काकडी) दे." पुढे एका जांगळी माणसाला चटणी-कोशिंबीर नव्हती, म्हणून तो बैलाच्या मुताशी भाकरी खात होता. उंदराने त्याला तौसे दिले. तौसे संपले तेव्हा उंदीर म्हणाला, "तौसे दे, नाहीतर बैल दे." बैल घेऊन उंदीर निघाला. पुढे एक तेली आपल्या बायकोलाच घाण्याला बांधून घाणा चालवत होता. उंदराने त्याला बैल दिला. बैल मेला तेव्हा उंदीर म्हणाला, "बैल दे, नाहीतर बायको दे." बायको घेऊन उंदीर निघाला. पुढे एक भोरपी (खेळाडू) स्वतःच नाचत होता. उंदराने त्याला बायको दिली. खेळाच्या नादात ती पडली आणि मेली. उंदीर म्हणाला, "बायको दे, नाहीतर तुणतुणे दे." शेवटी उंदीर तुणतुणे वाजवत एका तळ्याकाठी झाडावर चढला आणि गाऊ लागला: शेपेची विन्नी, विन्याचे मडके, मडक्याचे तौसे, तौशाचा बैलू, बैलाची बायलू, बायलूचे तुणतुणे! गाता गाता त्याचे हात सुटले आणि तो पाण्यात पडून मेला.