उत्तम इनाम
एक राजा आपल्या दिवाणखान्यात बसून काही कागदपत्रे पाहत होता. तेव्हा एका कवीने येऊन त्या राजाची स्तुती करून एक कविता म्हटली – "हे प्रतापी चक्रवर्ती! इंद्रासारखे आपले तेज आहे... वगैरे!”
त्या राजाला असला तोंडपुजेपणा आवडत नसे. त्याने आपल्या खजिनदाराला बोलावून त्या कवीला शंभर रुपये द्यायला सांगितले. तेव्हा कवीला अपरंपार आनंद झाला. त्याने राजाची तुलना कुबेर आणि कर्णाशी करून आणखी एक कविता म्हणून दाखविली.
राजाला राग आला तरी त्याने खजिनदाराला हाक मारून "शंभर नाही, हजार रुपये द्यावे!" असे सांगितले.
खजिनदाराने त्या कवीला बाहेर बसायला सांगून राजाला येऊन विचारले –
"महाराज! कवीश्वरांना शंभर द्यायचे की हजार?"
"अरे, जे द्यायचे ते मी दिले! तू द्यायची गरज नाही. त्यांनी माझा खोटा स्तुतिपाठ केला, मी देखील खोटे गोड बोलून खूप केले. आतां द्यायचे काय आहे?" राजा म्हणाला.