All Marathi Stories

उत्तम काव्य

कनकसेन चित्रदुर्गचा राजा होता. त्याच्या दरबारात कवी व पंडितांचा खूप आदर होई. चित्रदुर्गचा दरबारी कवी पंडित नरसिंह शर्मा हा एक उत्तम दर्जाचा विद्वान होता. कित्येक सुंदर काव्ये रचून तो राजाचा आदरपात्र बनून राहिला होता. एक दिवशी कवी-पंडितांनी भरलेल्या सभेत नरसिंह शर्माकडे वळून राजा म्हणाला, "महाकवी, गेल्या सहा महिन्यात आपण काही नवी रचना केली नाहीत? कारण विचारू शकतो मी?" जरा वेळ गप्पच राहून शर्मा म्हणाला, "काही खास असं कारण नाही महाराज! आता म्हातारपण शरीराचा ताबा घेऊ लागलंय म्हणायचं! लिहायची इच्छाच कमी होत चालली आहे दिवसेंदिवस!" कनकसेन म्हणाला, "तुमचं नवीन काव्य ऐकलं नाही, की सगळं कसेनुसे वाटू लागतं. आता या महिन्यात शिवरात्रीचा उत्सव येत आहे. त्या दिवसापर्यंत एका उत्तम काव्याची रचना करा कविवर; अन् ते सभेत ऐकवून तुमच्या काव्याच्या रस-माधुरीत स्नान करायचं भाग्य मिळू दे आम्हाला. बास! इतकीच माझी तीव्र इच्छा आहे." दीर्घ श्वास घेत नरसिंह शर्मा म्हणाला, "राजा, कोकिळा वसंत ऋतूत गाते. मोर वर्षा ऋतूतच ढग पाहून नाचू लागतो. सकाळी सूर्यकिरण पडल्यावर कमळं उमलतात. चंद्राच्या शीतल स्पर्शाने रात्री कुमुदे विकसित होतात. त्याचप्रमाणे कवीच्या हृदयात कंपने उमटली की आपोआपच उत्तम कविता जन्मते. माझा असाच दृढविश्वास आहे." इतक्यात राजीव नावाचा एक तरुण कवी उठून उभा राहत म्हणाला, "प्रभु, नरसिंह शर्माच्या म्हणण्याप्रमाणे कवीला स्फूर्ती, स्पंदन वगैरे अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याशिवाय कविता लिहिली जाऊच शकत नाही, हे मात्र पटत नाही मला! मला वाटतं की, कवीला कविता रचण्यासाठी स्वतःच आपल्याला आवश्यक ते वातावरण बनवून घ्यायला हवं. आपला आळस किंवा असमर्थता झाकण्यासाठी कवींनी स्पंदन, प्रेरणा इ. सुंदर नावं निर्माण केली आहेत. मानवाला भगवंताने बुद्धी दिली आहे. ती शक्ती अतुलनीय असूनही तिची पशूंशी तुलना करणे बरे दिसते का? पक्षी असोत किंवा फुलं असोत, मानवाने त्यांना कितीही शिकवले, तरी ते काय काव्य रचू शकतील?" नरसिंह शर्माचा द्वेष करणाऱ्या काही दरबारी कवींना राजीवचे बोलणे फार गोड वाटले. त्याची स्तुती करण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवल्या, अभिनंदन केले. पण शर्माच्या मनाला मात्र राजीवच्या बोलण्याने धक्का बसला. त्याचे मन तापले. राग व अपमानामुळे त्याचा चेहरा लाल झाला. ताबडतोब आपल्या आसनावरून उठून तो म्हणाला, "राजीव, वेळ घालवण्यासाठी प्रेमकविता रचणाऱ्या तुझ्यासारख्या सामान्य कवीला 'कविता' कशाशी खातात, हे तरी माहीत आहे का? उत्तम काव्य बुद्धीतून नव्हे, तर मनातून हृदयातून प्रस्फुटित होतं." हसतच राजीव म्हणाला, "म्हणजे कविता रचण्यासाठी मेंदूची गरज नाही, फक्त हृदय असलं म्हणजे पुरे असेच ना?" त्याच्या प्रश्नात खोडसाळपणा होता. दुसऱ्या कवींनी यावरही कुत्सितपणे हसून टाळ्या वाजवल्या. शर्माला त्यांची ही वागणूक राजीवच्या बोलण्यापेक्षाही जास्त बोचली. तो राजीवला रागाने विचारू लागला, "शेवटी तुला म्हणायचे आहे काय? असेच ना, की एक महिन्याच्या आत उत्तम काव्य रचणे सहज शक्य आहे?" "हो, हो! नक्कीच शक्य आहे." राजीव उत्तरला. "मग ते काव्य तूही रचू शकशील ना?" नरसिंह शर्माने विचारले. आतापर्यंत त्यांच्यातली वादावादी लक्षपूर्वक ऐकणाऱ्या राजाने हस्तक्षेप करत म्हटले, "कविवरांनो, मी जी मुदत जाहीर केली आहे, त्या अवधीत जो कोणी सुंदर काव्य रचेल, त्याला भरसभेत सुवर्णाभिषेक करण्यात येईल अन् सिंहासनाचा अर्धा भाग देऊन मी त्याचा गौरवही करीन." दोन्ही कवींनी राजाचे हे आव्हान विनयपूर्वक स्वीकारले. घरी आलेल्या आपल्या पतीला व्यग्र अवस्थेत पाहून नरसिंह कवीची पत्नी शांती घाबरून गेली. त्याने रात्रीचे भोजन केले तेही जसे काही एक रिवाज म्हणूनच केले. जेवणात त्याचे मुळीच लक्ष नव्हते. राजीवचे व्यंगपूर्ण बोलणे त्याच्या कानात घुमत होते. त्याला दुःखी पाहून शांती जवळ बसून त्याला पंख्याने वारा घालू लागली. हळुवारपणे तिने विचारले, "कसलं तरी दुःख होत आहे असे वाटत आहे तुम्हाला! सभेत महाराज तुम्हाला वाईट वाटेल असे काही बोलले काय?" त्याच वेळी तेथे पोचलेली त्यांची कन्या माधवी खळखळून हसत म्हणाली, "बाबांना वाईट वाटेल असे बोलण्याचं साहस महाराज करतील? सभेत बाबा ऐकवतील त्याला 'काव्यच' म्हटले जाते! बरोबर ना बाबा?" सोन्याच्या बाहुलीप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या कन्येकडे हसून पाहत शर्मा मोठ्या प्रेमाने म्हणाले, "तू म्हणालीस ते अगदी बरोबर हं माधवी! पण आज राजीव नावाच्या एका युवकाने मला आव्हान दिले अन् काव्य रचायला कटिबद्ध झाला आहे तो!" अन् दरबारात घडलेले सारे त्याने सविस्तर सांगितले. राजीवचे नाव ऐकताच माधवीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली. ती जेव्हा-जेव्हा पित्याबरोबर दरबारात जायची, तेव्हा त्याच्या शीघ्रकविता ऐकून ती मुग्ध होत असे. त्याच्या सुंदर रूपाचेही तिला आकर्षण वाटे. पण एका कालच्या तरुणाने आपल्या पित्यासारख्या महान कवीला आव्हान द्यावे हे तिला कदापि आवडण्यासारखे नव्हते. त्याच्या साहसाचा तिला फार राग आला अन् मोठ्या बेपर्वाईने ती म्हणाली, "बाबा, तुमच्यासमोर त्याची काय किंमत? चंद्रकोरीपुढे काजव्याने चमकण्यासारखेच नव्हे का?" नरसिंह शर्माने गंभीरपणे डोके हलवले. भोजनानंतर तालपत्र घेऊन त्यांनी नवीन काव्य-रचनेचा श्रीगणेश केला. त्यांनी काव्याचे नाव ठेवले, 'जीवनवलय'. त्यात त्यांनी मानवाच्या निरनिराळ्या अवस्थांची तुलना निसर्गाशी केली होती. बाल्यकाल उदयाची वेळ, यौवन मध्यकाल आणि वृद्धावस्थेची संध्यासमयाशी तुलना केली होती. अद्भुत शैलीत त्यांनी सगळे चित्रीकरण केले होते. रात्रंदिवस परिश्रम करून निर्धारित वेळेत त्यांनी काव्य रचले अन् आता ते खूप संतुष्ट दिसू लागले. पत्नी व कन्येला बरोबर घेऊनच शिवरात्रीच्या दिवशी नरसिंह शर्मा दरबारात पोचले. त्या अगोदरच राजीव, अन्य पंडित व नगरातल्या प्रमुख व्यक्ती दरबारात आसनस्थ झालेल्या होत्या. माधवीकडे पाहून राजीव गालात हसला. माधवीनेही संकेतानेच त्याची खुशाली विचारली अन् हसत राहिली. इतक्यात राजाही दरबारात आला अन् सर्वांनी उभे राहून त्याला प्रणाम केले. सर्वांवर धावती नजर फिरवून राजाने त्यांना एकदा पाहून घेतले आणि म्हटले, "आज शिवरात्रीचा पर्वदिवस आहे. आता नरसिंह शर्मा आणि राजीव आपापले काव्य पठन करून आपले कान तृप्त करतील." नरसिंह शर्माने उठून आपला घसा साफ केला आणि मोठ्या मधुर स्वरात तो आपले काव्य-पठन करू लागला. एक एक पद्यांश तो जेव्हा भावपूर्ण आवाजात वाचत होता, तेव्हा तेथे उपस्थित कवी, पंडित आणि नगरप्रमुख मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. काव्य-पठन समाप्त होताच टाळ्यांच्या आवाजाने दरबार दुमदुमला. आता राजीवची पाळी होती. थैलीतून त्याने तालपत्रांचा गठ्ठा काढला अन् राजाला समर्पित केला. राजाने उघडून पाहिले, तो सगळी तालपत्रे कोरीच! राजाने राजीवला विचारले, "हे तू रचलेले काव्य होय?" काही न बोलता राजीव हसत उभा राहिला. ते पाहून राजा क्षणभर विचारात पडला, अन् सर्व काही उमगून मोठ्या प्रेमाने राजीवकडे पाहत तो म्हणाला, "काही असो, नरसिंह शर्माकडून एक उत्तम रचना करवून घेण्यात सिंहाचा वाटा तुझाच!" मंत्री धीरमती आश्चर्य प्रकट करत म्हणाला, "महाराज, आपण काय म्हणत आहात, ते समजत नाही मला! राजीवने महाकवीकडून काव्य लिहून घेणे कसे शक्य आहे?" गालात हसत राजा म्हणाला, "राजीवला स्वतःची रचना-शक्ती छान माहीत आहे. तरीही त्याने नरसिंह शर्मासारख्या महाकवीला आव्हान दिले. माहीत आहे, असे का केले त्याने? नरसिंह शर्माच्या कविता-सरस्वतीला जागवू पाहत होता तो! शर्मांना आव्हान दिले, त्यांच्या कविताशक्तीवरच टोमणे मारले, तेव्हा त्यांच्या मनात काव्य आकार घेऊ लागले. अन् त्यांनी आपल्याला आनंदसागरात बुडवले. आपण त्यात डुबक्या घेऊ लागलो!" नरसिंह शर्मा आता राजीवजवळ आला. "मी गैरसमज करून घेतला तुझ्याबद्दल! वाईट वाटून घेऊ नकोस!" "आपणाकडून उत्तम काव्य रचून घेण्यासाठी, काव्यशक्तीवर चढलेला गंज काढून टाकण्यासाठीच मी आपल्याला आव्हान दिले. आता सभेच्या माध्यमातून क्षमा मागतो मी आपल्या औद्धत्याबद्दल!" राजीव विनयपूर्वक बोलला. मोठ्या वैभवाने नरसिंह शर्माला कनकाभिषेक करण्यात येऊन राजाने त्याला अर्ध्या सिंहासनावर बसवून घेतले. राजाने राजीव व माधवीचे आपसातले संकेत पाहिले होते. दोघांचे आपसातले आकर्षण हेरून तो शर्माला म्हणाला, "या मंगलप्रसंगी आपण एक निर्णय जाहीर केला तर बरे होईल!" "सांगा, काय आज्ञा आहे?" नरसिंह शर्माने विचारले. "राजीवला आपला जावई बनवून घेतले तर दुग्ध-शर्करा योग होईल ना! तो बरोबर राहून तुम्हाला प्रेरणा देत राहील." राजाने हसत म्हटले. शर्माने कन्येला विचारले, तेव्हा माधवीने लाजत आपला होकार भरला. "बोल, तुला काय म्हणायचे आहे?" त्याने राजीवलाही विचारले. "मी तर अनाथ आहे. मला आईवडील नाहीत. या योगाने माधवीच्या मातापित्यांच्या रुपात मलाही आईवडिलांचे प्रेम प्राप्त होईल. माझ्यासारख्या एका सामान्य कवीचे भाग्य असे फळफळणार असेल, तर मी 'नाही' थोडेच म्हणेन?" राजीव हर्षातिरेकाने म्हणाला. भावी वधू-वरांचे कवी-पंडितांच्या सभेने टाळ्या वाजवत अभिनंदन केले!