उदारता
अनुरूप देशाचा राजा अनंतपाळ हा वेष पालटून देशभर भ्रमण करण्यास निघाला असता त्याच्या मनात आले की जनतेचे सुख-दु:ख कसे काय आहे ते पाहून यावे. एकदा तो राजा एका गावच्या गल्लीतून जात असता त्याला एका चौथऱ्यावर एक बाई दुःखी अंतःकरणाने बसलेली दिसली.
राजाला त्या बाईच्या दुःखाचे कारण काय आहे हे समजून घ्यावयाचे होते, इतक्यात शेजारच्या घरांतून एक बाई बाहेर आली, तिने त्या दुःखीकष्टी बाईला विचारले— "शांताबाई, काय झालं? तुम्ही इतक्या दुःखी कां?"
हे ऐकून शांताबाईच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली— "पार्वतीबाई, काय सांगू, कितीतरी दिवसांनी मुलीसाठी ठिकाण सांगून आले, पण त्यांना हुंडा वगैरे काही नको होते. फक्त मला लग्नाच्या खर्चाची चिंता वाटते आहे. निदान हजारबाराशे रुपये तरी पाहिजेत पण ते तरी कोठून येणार? प्रयत्न करीत आहे."
पार्वतीबाईला शांताबाईविषयी सर्व काही माहीत होते. तिची मिळकत ती काय, त्यात लग्नाची मुलगी पदरी, त्यामुळे जवळ जवळ वर्षभर चिंतेने तिला ग्रासलं होते.
पार्वतीबाई सहानुभूती दाखवीत म्हणाली— "शांताबाई, मी सुद्धां तुमच्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करते तेव्हा मनात येते की जरी माझी ऐपत नाही, तरी सुद्धां तुम्हाला काही ना काही मदत करावी. पण करणार काय, देवाची प्रार्थना करून त्याच्या जवळ दोन हजार रुपये मागावे, व त्यापैकी एक हजार तुला द्यावे, तुमची अडचण दूर होईल व लग्न पार पडेल आणि तुमची चिंता दूर होईल."
ह्या दोघींचे बोलणे अनंतपाळ राजाने ऐकले. ह्या दोघी जवळजवळ राहणाऱ्या गरीब कुटुंबातील आहेत असे त्याला वाटले.
दुऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पार्वतीबाईने दार उघडले तर तिला दारांत एक पुरचुंडी दिसली. जवळपास कोणी नाही असे पाहून आनंदाच्या भरांत ती पुरचुंडी उचलून घरांत गेली.
थोड्या वेळाने राजाचा एक शिपाई दवंडी पिटीत आला— "रस्त्यात येतांना कोठेतरी दोन हजार रुपयांची पुरचुंडी पडली आहे. जर कोणास सापडली असेल तर गांवबाहेर राजाचा मुक्काम आहे. त्याच्या तंबूमध्ये ती पुरचुंडी आणून द्यावी राजा योग्य ते बक्षीस देईल."
पार्वतीबाई ती रुपयांची पुरचुंडी घेऊन राजाच्या तंबूकडे गेली. घडलेला सर्व वृत्तांत राजाला सांगून त्याच्यापुढे ती पुरचुंडी ठेवली. राजा पार्वतीबाईची स्तुती करीत म्हणाला— "हे दोन हजार रुपये मी तुझ्या इमानदारीबद्दल बक्षीस देत आहे. घेऊन जा."
घरी परतल्यावर पार्वतीबाई घडलेला सर्व वृत्तांत शांताबाईस सांगून म्हणाली— "बाईसाहेब, आपण असे समजू या की हे रुपये ईश्वराच्या आणि राजाच्या कृपेमुळे आपणांस मिळाले आहेत. ह्यापैकी एक हजार रुपये मी तुम्हाला देते, तुमच्या मुलीचे लग्न पार पडेल." असे म्हणत पार्वतीबाईने एक हजार रुपये मोजून शांताबाईला दिले.
शांताबाईला रुपयांची सोय झाल्याबद्दल बरे वाटले, परंतु पार्वतीबाईविषयी तिच्या मनात थोडे किल्मिष उत्पन्न झाले. पार्वतीबाईने मुलीच्या लग्नासाठी पैसे देण्याचे ठरविल्यावरच तिला ती पुरचुंडी मिळाली आहे. म्हणजे रुपये मिळाले हे माझ्या मुलीचे भाग्यच समजायचे.
अशाप्रकारे रुपयांच्या आशेने शांताबाईच्या मनात नाही नाही त्या गोष्टी येऊ लागल्या. त्याच दिवशी पार्वतीबाई मागीलदारी विहिरीवर पाणी भरावयास गेली आहे हे पाहून शांताबाईने पार्वतीबाईच्या घरांत मांजराच्या पावलाने प्रवेश केला आणि ती रुपयांची पुरचुंडी घेऊन चुपचाप पसार झाली.
पार्वतीबाईने जेव्हा पेटी उघडून पाहिले तेव्हा तिला ती पुरचुंडी दिसली नाही. तिला फार वाईट वाटले. तिने हे शांताबाईला जाऊन सांगितले.
शांताबाई चिंतित होऊन म्हणाली— "अगबाई, हा काय अन्याय? मी माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा तरी भागवीन, तुम्ही हे हजार रुपये घेऊन जा."
"असे काय म्हणता. असे काय म्हणता. मुलीचे लग्न तर टाळता येणार नाही. एक हजार रुपयांनी काय माझे दारिद्र्य थोडेच जाणार आहे." पार्वतीबाई म्हणाली.
शांताबाईचे पार्वतीबाईच्या घरात चुपचाप येणे व रुपयांची पुरचुंडी घेऊन जाणे, राजाचे दोन शिपाई पाऱ्यावर होते त्यांनी पाहिले होते. काही वेळानंतर त्यांनी शांताबाईच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांना ती दोन हजार रुपयांची पुरचुंडी मिळाली. शांताबाई व पार्वतीबाई यांस शिपाई राजाकडे घेऊन गेले. राजा पार्वतीबाईला म्हणाला— "मी तुला दोन हजार रुपये दिले होते. ते दोन हजार रुपये शांताबाईच्या घरांत शिपायांना मिळाले. आपसांत मैत्रीचे सोंग करून शांताबाईने पार्वतीबाईचा विश्वासघात केला. म्हणून शांताबाईस शिक्षा करतो."
शांताबाईचा थरकांप उडाला आणि तिने अपराध कबूल केला. ह्यावर पार्वतीबाई म्हणाला— "महाराज, आपल्या शिपायांची यात चूक आहे. मीच शांताबाईला मुलीच्या लग्नासाठी एक हजार रुपये देण्याचे ठरविले होते, पण तेवढ्याने तिचे काम भागणार नाही असे वाटल्यावरून मीच तिला दोन हजार रुपये देऊन तिला मदत केली."
राजाला हे कळून आले की, पार्वतीबाई शांताबाईची चूक लपविण्यासाठी स्वतः खोटे बोलत आहे. राजाने पार्वतीबाईच्या इमानदारीची आणि उदारतेची प्रशंसा केली. या दोन हजार रुपयांच्या बरोबर आणखी एक हजार रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून देत आहे. हे सर्व रुपये तुम्ही आपल्या जवळ ठेवा आणि शांताबाईच्या मुलीचे लग्न पार पडल्यावर शांताबाईच्या मनातील दुष्ट हेतू दूर करण्याची जबाबदारी तुमच्यावरच टाकीत आहे."
पार्वतीबाई राजाला नमस्कार करून घरी यावयास निघाली तिच्या पाठोपाठ शांताबाईपण पश्चात्तापाने मान खाली घालून निघाली.