एका उवाची गोष्ट
एक होती ऊ. ती गंगेवर अंग धुवायला गेली, पण तिथे तिचे पोट फुटले आणि त्यातून रक्ताचा ओघळ लागला. त्यामुळे गंगेचे पाणी लाल झाले. इतक्यात एक गाय तिथे पाणी प्यायला आली. ती गंगेला म्हणाली, "गंगे गंगे, तुझे पाणी लाल का ग झाले?" गंगेला आधीच राग आला होता, ती म्हणाली:
ऊ की पुटपुटो, गंगा लालो, गाईचे शिंग मोडो!
त्याबरोबर गाईचे शिंग मोडले. बिचारी गाय खिन्न होऊन एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसली. वडाला आश्चर्य वाटले, त्याने विचारले, "गाई गाई, तुझे शिंग कसे मोडले?" गाय रागावून म्हणाली:
ऊ की पुटपुटो, गंगा लालो, गाईचे शिंग मोडो, वडाचे पान झडो!
त्याच क्षणी वडाची सगळी पाने गळून गेली. वडावर एक कावळा राहायचा, त्याने विचारले, "वडा वडा, तुझी पाने का गळाली?" वडाने उत्तर दिले:
...कावळा काणा!
कावळा काणा झाला. तो डोळ्याला तेल लावायला तेल्याकडे गेला. तेल्याने विचारले, "कावळ्या कावळ्या, तू काणा कसा झालास?" कावळ्याने उत्तर दिले:
...तेली आंधळा!
तेली आंधळा झाला. तो फुलांसाठी माळ्याकडे गेला. माळ्याने विचारले, "तेल्या तेल्या, तू आंधळा का झालास?" तेल्याने उत्तर दिले:
...माळी लंगडा!
माळी लंगडा झाला. तो राजवाड्यात फुले घेऊन गेला तेव्हा त्याला बटिक भेटली. तिने विचारले, "माळ्या माळ्या, तू लंगडा का झालास?" माळी म्हणाला:
...बटिक पादरी!
त्याबरोबर बटिक पादू लागली. राणीला राग आला, तिने विचारले, "बटकी, तू पादतेस का?" बटकीने शाप दिला:
...राणी नाचरी!
राणी थयथया नाचू लागली. राजाने विचारले, "अशी नाचतेस काय?" राणीने उत्तर दिले:
...राजा ढोलके वाजवितो!
राजा ढोलके बडवू लागला. प्रधानाला नवल वाटले, त्याने विचारले, "महाराज, ढोलके का वाजवता?" राजा म्हणाला:
...प्रधान टिरी खाजवितो!
त्याबरोबर प्रधान आपली टिरी खाजवत बसला.
इटकुली मिटकुली गोष्ट सरो, तुमचे आमचे पोट भरो.