एका बाहुलीची गोष्ट
निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हा झाडाजवळ गेला, झाडावरून त्याने शव खाली उतरवून खांद्यावर घेतले आणि त्याने स्मशानाकडे जाणारा रस्ता धरला. तेव्हा शवामध्ये लपलेल्या वेताळाने म्हटलं, "राजन, ज्या महान लक्ष्यासाठी तू एवढे कठोर परिश्रम करतो आहेस, ते मिळवण्यासाठी अपार कष्ट व चिकाटीची आवश्यकता आहे. हे दोन्ही गुण तुझ्यांत आहेत. पण जेव्हा भाग्यदेखील जोडीला असते, तेव्हाच मनुष्य यशस्वी होतो. तेव्हा इच्छा पूर्ण होतात, लक्ष्यप्राप्ती होते. परंतु कधीकधी परिश्रम कारणी लागतात, अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळते, पण काहीजण जाणूनबुजून ते यश हातांतून निसटू देतात.
तुला सावध करावे म्हणून मी एका तरुण शेतकऱ्याची गोष्ट तुला सांगतो. ऐकताना तुझा थकवाही दूर होईल." आणि वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
शूंगबर जमीनदारीमध्ये साकेतपुरी गाव होते. त्या गावात दिलीप हा एका संपन्न शेतकऱ्याचा मुलगा होता. शेतीच्या कामांत त्याला फारसा रस नव्हता, पण हस्तकलांच्या मध्ये तो हुशार होता. कोणतीही कला एकदा बघितली की तो लगेच ती चांगली शिकत असे. चिकन माती किंवा चुना दिसला की त्यांतून तो सुरेख फुलदाणी किंवा बाहुली बनवत असे. हातात वेळू मिळाला की त्यांतून सुरेल बासरी तयार होत होती. एखादे सुंदर दृश्य पाहिले की ते चित्र पुरे होईपर्यंत तो झोपू शकत नसे. एकलव्याप्रमाणे दिलीपने या कलांचे शिक्षण स्वतःच घेतले होते.
त्यावर्षी शूंगबर जमीनदाराची मुलगी मणिमाला हिचा अठरावा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा होणार होता. जमीनदारांनी दवंडी पिटवून सर्व जनतेलाच उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. साकेतपुरीच्या गावकऱ्यांनी दिलीपला विनंती केली की, या शुभप्रसंगी एखादी अद्भुत व अनुपम वस्तू जमीनदारकन्येला भेट द्यायला तयार करावी. अशी वस्तू कशी असावी त्यावर दिलीपने बराच विचार केला आणि अखेरीस लाल चंदनाचे सिंहासन बनवायचा त्याने निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी रक्तचंदनाची लाकडे मागवण्यात आली. कामाला सुरुवात झाली.
सिंहासनाच्या हातांची रचना राजहंसाच्या पंखांसारखी केली होती व हरिणांच्या पायांसारखे पाय केले. मागच्या प्रभावळीवर रंगीत दगड बसवले व फुलवेलींची नक्षी कोरली. जेव्हा काम पूर्ण झाले, तेव्हा उरलेल्या चंदनाच्या लाकडातून त्याने एका लहानशा सुंदर बाहुलीची मूर्ती कोरली. ती मूर्ती अतिशय मनमोहक होती. ती त्याने स्वतःसाठी सुरक्षित ठेवायचे ठरवले. तिला सुरेखशी रेशमी साडी बनवली व अलंकारांनी ती मूर्ती सजवली.
सिंहासन व ती चंदनी बाहुली पाहून गावकरी फारच खूष झाले. त्यांनी शूंगबरला जाऊन ते सिंहासन जमीनदाराच्या मुलीला भेट दिले. ते सुंदर सिंहासन पाहून ती बेहद खूष झाली. त्या कलाकाराला भेटायची इच्छा तिने पित्याजवळ प्रकट केली. दिलीपला बोलावल गेले. दिलीपने येताना ती चंदनी बाहुलीदेखील आणली होती. मणिमालाला ती बाहुली खूप आवडली, तो कलाकारही तिला खूप आवडला.
"पिताश्री, ही अतिसुंदर बाहुली मला हवी," मणिमालाने सांगितले.
"सरकार, क्षमा असावी. मी ही मूर्ती माझ्यासाठीच बनवली आहे. ती देता येणार नाही," दिलीपने स्पष्टच सांगितले.
"मागशील ती किंमत मिळेल. सांग, किती हवेत?" जमीनदाराने विचारलं.
"सरकार, ही बाहुली म्हणजे माझी कला आहे, माझा प्राण आहे. ती मी कुणालाही देणार नाही," दिलीपने निश्चयी स्वरांत सांगितलं.
"ही प्राणहीन बाहुली तुझा प्राण आहे? ही मणिमाला तुझी व्हायला तयार आहे, पण ती बाहुली माझ्या स्वाधीन कर," मणिमालाने म्हटलं. तिच्या मनात दिलीप व त्याच्या कलेबद्दल प्रेम निर्माण झाले होते.
"ही बाहुली म्हणजे माझ्या मनातल्या सुंदरीची प्रतिमा आहे. अशीच पत्नी मला हवी आहे. माफ करा, मी आपल्या इच्छेला होकार देऊ शकत नाही," दिलीपने गंभीरपणे सांगितलं.
त्याचा निश्चय आणि खंबीरपणा पाहून अहंकारी मणिमाला दुखावली गेली. पण आपला राग बाहेर न दर्शविता तिने पित्याकडे पाहिले. जमीनदाराला मुलीचे मन समजले. तो दिलीपला म्हणाला, "दिलीप, तू एक अद्वितीय कलाकार आहेस हे मान्य आहे! त्याबद्दल तुझं अभिनंदन! मी तुला सहा महिन्यांचा अवधी देतो. त्या काळात तुला तुझ्या इच्छेप्रमाणे अनुरूप मुलगी मिळाली तर ठीक, नाहीतर तुला ही बाहुली माझ्या मुलीला द्यावी लागेल आणि तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. जर तू तसं केलं नाहीस, तर तुला माझ्या जमीनदारीमधून बहिष्कृत करीन," जमीनदाराने रागावून म्हटलं.
"आपली इच्छा!" असे उत्तर देऊन दिलीप तिथून निघाला आणि आपल्या कल्पनेमधली सुंदरी शोधत गावोगांभी हिंडत राहिला. त्याला काही तशी गुणसुंदरी कुठे देखली नाही. निराश होऊन एक दिवस थकलेल्या अवस्थेत तो अरण्यातून जात होता. भुकेने कळवळला होता आणि उपाशी असल्यामुळे बेहोश होऊन खाली पडला. जेव्हां त्याला शुद्ध आली, तेव्हां आपण एका झोपडीत आहोत असे त्याला दिसले.
त्याच्यासमोर एक सामान्य रूपाची भिल्ल युवती होती. दिलीपने जेव्हां डोळे उघडले, तेव्हां त्या युवतीने त्याला प्यायला पाणी दिले आणि म्हटले, "तुम्ही रानांत बेशुद्ध पडला होतात. त्या पर्वतदेवीची कृपा म्हणून आता शुद्धीवर आला आहात. मला वाटतं डोंगरी लिंबाच्या सरबतात मध घातला होता, त्याचा प्रभाव तुमच्यावर पडला असावा. थांबा, मी आत्ताच वडिलांना बोलावते."
असं म्हणून ती बाहेर पळाली. तिचं नांव मंगला होतं. तिचा पिता तिथल्या लोकांना जडीबुटीची औषधे देऊन उपचार करीत असे. तो मुलीच्याबरोबर झोपडीत आला व त्याने दिलीपची नाडी पाहिली व विचार करून म्हटले, "तुम्ही फार अशक्त झाला आहात. चार दिवस इथे राहा आणि आराम करा. माझी ही मुलगी, मंगला, तुमची सेवा-शुश्रूषा करील."
दिलीप कबूल झाला. चारी दिवस तो मंगलाकडे नीट बघत होता. एका दिवशी एक वाघ शिकाऱ्याच्या हातून वाचला, पण जखमी झाला होता. त्याच्या पायातून रक्त वाहायला लागले. मंगलाने त्याच्या पायावर मलमपट्टी केली. "तो क्रूर प्राणी तुला खाऊन टाकील याची तुला भीती नाही वाटली?" दिलीपने आश्चर्याने विचारले.
"नाही, ते क्रूर प्राणी आहे खरा, पण भूक लागेल तेव्हां च तो कुणावर तरी हल्ला करतो. आपल्या डोळ्यांमध्ये जर त्याला प्रेम, दया दिसली तर तो क्रूर प्राणी आपल्याला त्रास देणार नाही," मंगलाने हसून सांगितले. ती झाडपाला आणून बारीक वाटत होती, गरम काढे करून देत होती आणि वडिलांना मदत करत होती. सगळे घरकाम स्वतः करीत होती. गोड आवाजांत छान गाणीदेखील ती गात असे. कुणाला कसलीही मदत हवी असली तर ती पुढे होऊन मदत करीत असे.
चार दिवसांनंतर निघण्यापूर्वी ती चंदनी बाहुली दिलीपने तिला देऊ केली व पुढे म्हटले, "तुझी मदत मी कधीच विसरू शकणार नाही. त्याची आठवण म्हणून ही बाहुली मी तुला भेट देतो आहे, घे."
"नको, माझी मनोमन इच्छा आहे की या बाहुलीसारखी सुंदर पत्नी तुम्हाला मिळावी. तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात, तर तेवढे मला पुरेसे आहे." आणि तिने बाहुली घ्यायला नकार दिलाच, व आतून रानातल्या मधाची बुधली घेऊन तिने ती दिलीपला दिली.
"तुझा मधच नव्हे, तर त्यापेक्षा जास्त गोड तुझे मन आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?" दिलीपने आपल्या मनातली गोष्ट तिला विचारली. मंगला लाजली व हसतच झोपडीत गेली. आठवडाभरांतच मंगलाच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावले आणि मंगलाची दिलीपबरोबर पाठवणी केली.
दिलीप पत्नीसह शूंगबरला गेला आणि जमीनदाराला भेटून त्याने सांगितलं, "मालक, आपल्या कन्येने चंदनाची बाहुली मागितली होती, ती घ्यावी. मी ही बाहुली त्यांना देतोय. आपण स्वीकार करावा."
"त्याची काय किंमत देऊ?" जमीनदाराने विचारले.
"मी त्याची किंमत मागत नाही. मी ही त्यांना भेट देतो आहे," दिलीपने अत्यंत नम्रपणे सांगितले. त्याच वेळी तिथे मणिमाला आली आणि म्हणाली, "ही भिल्ल तरुणी तुझ्या कल्पनेतली सुंदरी आहे की काय? बाहुली इतकी सुंदर आहे, त्यामानाने ही काहीच नाही. ही माझ्यापेक्षा सुंदर आहे वाटतं? पिताश्री, दिलीप हारला आहे. त्याची बाहुली घेऊन टाका आणि त्याला कठोर शिक्षा द्या."
जमीनदाराने एकवार आपल्या मुलीकडे बघितले आणि नंतर दिलीपला म्हटले, "दिलीप, मला माफ कर. माझ्या मुलीच्या अहंकारी आणि गर्विष्ठ स्वभावाची मला लाज वाटते. या बाहुलीची किंमत म्हणून नव्हे, परंतु तुझ्या विवाहाची भेट म्हणून मी तुला ही हजार नाणी देतो आहे. उसका स्वीकार कर." दिलीपने भेट स्वीकारली. जमीनदाराला प्रणाम केला आणि मंगलासह तो आपल्या गावी जाण्यास निघाला.
वेताळाने ही गोष्ट सांगितली आणि राजाला विचारले, "राजन, दिलीपने एका बाहुलीसाठी जमीनदाराची मुलगी आणि त्याची अपार संपत्ती स्वीकारायला नकार दिला, आणि शेवटी अशी भिल्ल मुलगी त्याने निवडली. ती सुंदरही नव्हती, किंवा संपन्नही नव्हती. हे त्याचे अज्ञानच नाही का?
ठीक आहे, त्याने मंगलाशी लग्न केले. मग त्याने तिला घेऊन आपल्या गांवी परत जायचे. सरळ जमीनदाराकडे जायची काय गरज होती? जर जमीनदाराने त्याला कडक शिक्षा दिली असती, तर मंगलावर अन्याय झाला नसता का? त्याचा हा स्वभाव तिरकस नाही वाटत? हे पाहून असं वाटतं की दिलीप हा केवळ एक कलाकार आहे, त्याला विद्वत्ता, व्यवहारज्ञान हे मुळीच नाही.
असल्या मूर्खाची जमीनदार क्षमा मागतो आणि वर त्याला इनामही देतो. हे तुला विचित्र वाटत नाही का? माझ्या शंकांची उत्तरे तुला माहीत असून तू मौन पत्करलेस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होतील हे लक्षात ठेव."
विक्रमार्काने म्हटले, "दिलीप केवळ एक निपुण कलाकार नाही, तर तो प्रामाणिकही आहे. सुंदर रूप असून भागत नाही, मनही सुंदर असावे लागते. जमीनदाराच्या मुलीला पाहून हे सत्य त्याला समजले. मंगलाला पाहून त्याला आंतरिक सौंदर्य कसे असते ते समजले आणि त्याने तिच्याशी विवाह केला. जे इतरांचा मान राखत नाहीत, ज्यांच्यामध्ये अधिकाराचा दर्प भरलेला असतो, जे स्वार्थी असतात, ते माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नसतात. मणिमाला त्याचे जिवंत उदाहरण आहे. दिलीपच्या वर्तणुकीत अविचारी किंवा अव्यवहारीपणा नाही. जमीनदाराला भेटायला जाणे ही त्याच्या सज्जनपणाची खूण आहे, ते पाहून जमीनदाराचेही डोळे उघडले आणि त्याने दिलीपची क्षमा मागितली."
राजाचे मौन भंग झाल्यामुळे वेताळ शवासहित अदृश्य झाला व पुन्हा झाडावरून जाऊन बसला.