Bookstruck

कंकणाची भेट

मल्यावती नगरीत यात्रेकरूंसाठी एक मोठी धर्मशाळा होती. राजधानीत येणाऱ्या यात्रेकरूंनी ही धर्मशाळा नेहमी भरलेली असे. या धर्मशाळेत दूरच्या एका गावावरून आलेला वीरबाहू नावाचा एक प्रवासी उतरला होता. त्याच्या सोन्याच्या बांगड्या (कंकण) तिथे चोरीला गेल्या. वीरबाहू विचार करू लागला की आता काय करावे? आपल्या बांगड्या परत कशा मिळतील? शेवटी वीरबाहूने धर्मशाळेच्या मालकाकडे तक्रार केली. मालकाने वीरबाहूची खोली एकदा नीट पाहिली आणि आवश्यक वस्तू तिथे आणणारा सेवक टोलारामला ताबडतोब बोलावले आणि वीरबाहूच्या बांगड्यांबद्दल विचारले. आश्चर्य करीत टोलाराम म्हणाला— "मला बांगड्यांबद्दल काहीही माहिती नाही. खोली झाडण्यासाठी मी वीरबाहूच्या खोलीत जरूर गेलो होतो. पण मी आपलं काम केलं नि बाहेर आलो." टोलारामचे कपडे नि त्याची खोली यांची झडती घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. निपायास्तव धर्मशाळेच्या मालकाने शिपायांना बोलावले आणि टोलारामला पकडायला सांगितले. शिपाई टोलारामला घेऊन ठाण्यावर गेले. मग सुनावणीसाठी टोलारामला राजा पुढे हजर केले गेले. शिपायांकडून सगळं जाणून राजा थोडा वेळ गप्प बसला. या श्रीमंत माणसाच्या (वीरबाहूच्या) खोलीत टोलाराम शिवाय तर कोणी गेलं नव्हतं, म्हणून टोलारामच चोर असण्याची शक्यता आहे, असा विचार करीत असताना राजाच्या मनात एक शंका आली. आपल्या कामासाठी राजधानीत आलेल्या श्रीमंत माणसाला टोलाराम विरुद्ध तक्रार करायची काय जरूर आहे? शहाणपणाने टोलाराम कडूनच सत्य काढून घेतलं पाहिजे. मग राजाने टोलारामला विचारलं— "अरे, चमचम चमकणाऱ्या सोन्याच्या बांगड्या पाहिल्या आणि तुझ्या मनात लोभ उत्पन्न झाला, अन् मग तू चोरी केलीस! आपला गुन्हा कबूल केलास, तर माफ करून तुला सोडून देईन. नाहीतर चांगली कडक शिक्षा भोगावी लागेल." टोलाराम जरा सुद्धा घाबरला नाही. पुन्हा शांतपणे त्याने सांगितलं— "महाराज, मला बांगड्यांबद्दल काही माहिती नाही." आता राजाने आपला दरबारी विदूषक चारुहासकडे पाहिलं. चारुहासने आपल्या वाक्-चातुर्याने टोलारामकडून वदवावं की चोरी त्यानेच केलेली आहे, हा उद्देश चारुहासच्या लक्षात आला. गंभीरपणे टोलारामच्या जवळ जात चारुहासने प्रश्न केला— "हा श्रीमंत माणूस धर्मशाळेत केव्हा बरं आला?" "तीन दिवस झाले साहेब!" टोलाराम म्हणाला. "त्याच्या बांगड्या कशा होत्या?" चारुहासने पुन्हा विचारले. "बांगड्या बाबत मला काही माहिती नाही." टोलाराम उत्तरला. जरा विचार करून चारुहास म्हणाला— "वीरबाहूच्या खोलीत तुझ्याशिवाय अन्य कोणी नोकर तर जाणार नाही?" "होय सरकार!" टोलाराम म्हणाला. चारुहासने आणखी विचारले— "बरं आता असं सांग हा श्रीमंत माणूस सतत बांगड्या आपल्या हातात ठेवी, की कधी कधी काढून ठेवी?" टोलारामने ताबडतोब सांगितलं— "माफ करा हुजूर, बांगड्या कशा होत्या हे मी पाहिलं सुद्धा नाही." चारुहासने अनेक प्रकारे प्रश्न विचारले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तो राजाला म्हणाला— "प्रभु, हा खरोखरीच गुन्हेगार नाही. जो चोरी करेल, त्याच्या मनात कुठे तरी थोडी भीती असेलच की नाही? आणि त्या भयापोटी तो पकडला जाईल. टोलाराम मुळीच घाबरलेला दिसत नाही. म्हणून हा निरपराधी आहे." विदूषकाच्या म्हणण्यावर स्मितहास्य करीत राजा म्हणाला— "हा फार चांगला अभिनेता असण्याची ही शक्यता आहे. आपला गुन्हा लपविण्यासाठी हा खूपच चांगला अभिनय करीत असेल!" "होय प्रभू, मूठभर मीठ तोंडात घालून गूळ खात असल्याचा अभिनय करणं ही काय साधी गोष्ट आहे? याचा खूप मोठा सन्मान आपण करणं योग्य होईल. अशा महान अभिनेत्याला आपल्या दरबारी स्थान द्यायला आपल्याला अभिमान वाटावा. एक छान सोन्याचं कडं बनवून ते आपल्या हस्ते याला दिलं जावं अशी माझी इच्छा आहे, महाराज!" विदूषकाने आपलं जाळं टाकलं. आता टोलाराम हात जोडून राजाला म्हणाला— "प्रभु, मला क्षमा करा. त्या श्रीमंताच्या बांगड्या मीच चोरल्या. मी जर एखादा निर्णय घेतला, तर कोणी ही मला त्यापासून परावृत्त करू शकत नाही. म्हणून आपण माझा अपराध माझ्या तोंडून वदवू शकला नाहीत." जोरात टाळ्या वाजवीत चारुहास म्हणाला— "महाराज, आली न खरी गोष्ट आता बाहेर? हा नोकर एक नंबरचा धोकेबाज आहे. मधात बुडवलेल्या सुरीसारखा आहे हा! असल्या भयंकर नि धोकेबाज माणसाला समाजात स्वतंत्रपणे वावरू देणं समाजाला हानिकारक ठरेल. याला आमरण कारावासाची शिक्षा देणेच योग्य होईल." चारुहासची बुद्धिमत्ता आणि चलाखी पाहून राजाला खूप आनंद झाला. टोलारामला जन्मभर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. चारुहासची सर्वांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.