काजीची युक्ती
एका नवाबाच्या हाताखाली एक वजीर होता. त्याने एके दिवशी एका अत्यंत रूपवती गुलाम स्त्रीला विकत घेतले. ही गोष्ट नवाबास कळली व त्याच्या मनात तिला बघण्याची अनावर इच्छा झाली. त्याने वजिराकडे निरोप पाठवला— "आज रात्री मी आपल्या घरी जेवणास येत आहे!"
वजिराने नवाबासाठी शाही मेजवानीचा बेत केला. उत्तम खाद्यपदार्थ व मद्याची व्यवस्था केली. मद्य वाढणारी 'साकी' म्हणून त्याने आपल्या नवीन दासीला उभे केले. जेवण आटोपून नवाब व वजीर मद्याचा आस्वाद घेत बोलत बसले. साकी मद्याचे प्याले भरून देत होती.
अचानक नवाब म्हणाला— "वजीर साहेब, तुमची ही गुलाम दासी मला विका. तुम्ही जेवढी किंमत दिली आहे, त्याच्या दुप्पट रक्कम मी तुम्हाला देईन."
वजीर अत्यंत विनयाने म्हणाला— "गुस्ताखी माफ असावी हुजूर! या दासीला विकण्याचा माझा मुळीच मानस नाही."
"तर मग, मला ही मुलगी नजराणा (भेट) म्हणून द्या," नवाब म्हणाला.
भीड न बाळगता वजीर म्हणाला— "तसाही माझा मुळीच विचार नाही सरकार!"
वजिराचे असे उद्धट वागणे बघून नवाबास भयंकर संताप आला. संतापाच्या भरात तो म्हणाला— "जर तू मला ही दासी विकत अथवा भेट म्हणून देणार नसशील, तर अल्लाची कसम, मी माझ्या बेगमला तलाक देईन!"
नबाबाची शपथ ऐकून वजीरही हट्टास पेटला आणि म्हणाला— "मी माझ्या बायका-मुलांना सोडून देईन, पण ही दासी तुम्हाला विकणार नाही किंवा देणार नाही. जर माझे म्हणणे खोटे झाले, तर मी खुदाच्या दरबारी गुन्हेगार ठरेन!"
दोघांनीही जिभेला हाड नसल्याप्रमाणे आवेशात येऊन शपथा घेतल्या. नंतर दोघांनाही पश्चात्ताप होऊ लागला. "आता काय करावे?" नवाब म्हणाला. "आपल्या दोघांच्याही शपथा न मोडता या पेचातून सुटण्याचा मार्ग काय?"
वजीर म्हणाला— "या पेचातून सुटण्याचा मार्ग फक्त 'काजी'च सुचवू शकेल. हुजूरचा हुकूम असेल तर त्याला बोलावण्यासाठी निरोप पाठवतो."
नबाबाने संमती देताच काजीला बोलावण्यात आले. काजीने सर्व हकीकत ऐकली आणि तो म्हणाला— "ही काही फार मोठी समस्या नाही. वजीराने नवाबास अर्धी दासी विकावी आणि अर्धी 'नजराणा' म्हणून द्यावी, म्हणजे दोघांच्याही शपथा पाळल्या जातील आणि हा प्रश्न सहज सुटेल."
ही युक्ती ऐकून नवाबास फार आनंद झाला. "वाह, बहुत खूब!" तो म्हणाला. "परंतु अजून एका बाबतीत आपल्या सल्ल्याची गरज आहे. कायद्यानुसार या मुलीची गुलामगिरीतून मुक्तता झाली तरच मी तिला माझ्या जनानखान्यात सामील करू शकेन."
काजीने क्षणभर विचार केला आणि म्हणाला— "खाविंद, यासाठी एक सोपा उपाय आहे. जर आता हिचे कोणाबरोबर तरी लग्न लावून दिले, तर तत्क्षणी हिची गुलामगिरीतून मुक्तता होईल. नंतर लगेच त्या माणसाकडून तिला तलाक देऊन, तुमच्या मर्जीप्रमाणे या मुलीला जनानखान्यात घेता येईल."
नवाब म्हणाला— "बहुत अच्छे! वजीर साहेब, तुमच्या एका नोकराला बोलवा."
वजिराने आपल्या एका नोकराला बोलावले. काजीने त्या नोकराबरोबर गुलाम मुलीचा निकाह लावला आणि म्हणाला— "आता ही मुलगी गुलाम राहिली नसून स्वतंत्र झाली आहे. तरी आता या नोकराने हिला लगेच तलाक द्यावा."
पण तो नोकर यासाठी तयार झाला नाही. तो म्हणाला— "ही माझी बीबी फारच सुंदर आहे. हिला तलाक द्यायला मी मुळीच तयार नाही."
नवाब आणि वजीराने कितीही दरडावले तरी तो नोकर ऐकेना. नवाबाचा पारा चढला. तो भडकून काजीला म्हणाला— "अरे नतद्रष्ट! हाच काय तुझा सोपा उपाय? आता या पेचातून मार्ग काढला नाहीस, तर तुझे शीर धडावेगळे करून वेशीवर टांगेन!"
काजी शांतपणे म्हणाला— "हुजूर, आपण उगीच बेचैन होत आहात. वजीर साहेबांनी जर या नोकराला गुलाम म्हणून मला दिले, तर या पेचातून सुटता येईल." वजिराने काजीच्या कानात काहीतरी सांगितल्यावर काजीने "दिले, घे!" असे म्हणत त्या नोकराला स्वतःचा गुलाम म्हणून स्वीकारले.
मग काजी त्या मुलीकडे वळून म्हणाला— "हा नोकर माझा गुलाम आहे आणि मी याला तुला गुलाम म्हणून भेट देत आहे. तू याचा स्वीकार करशील ना?" ती मुलगी आनंदित होऊन म्हणाली— "हो, स्वीकारते!"
काजी म्हणाला— "बस्स! झाले तर मग. कायद्यानुसार स्वतःचा गुलाम हा आपला नवरा असू शकत नाही. त्यामुळे तुमचे हे लग्न आता रद्द झाले आहे! अशा प्रकारे माझे कार्य सिद्ध झाले आहे, आता मी येतो."
नबाबाला काजीची ही बुद्धिमत्ता पाहून खूप आनंद झाला. त्याने सन्मानार्थ सोन्याच्या दीनारांनी भरलेली एक थैली काजीला भेट दिली. ती थैली घेऊन काजी आपल्या वाटेने निघून गेला.