कुचकामाचा मंत्री
एका मूर्ख राजाच्या दरबारात दोन मंत्री होते. त्यांच्यातला रंजन हा समजूतदार व शहाणा होता व भंजन हा महामूर्ख होता. भंजन त्याच्या सारखाच मूर्ख होता म्हणून राजा नेहमी त्याच्याच सल्ल्याप्रमाणे वागे. त्यामुळे प्रजेला अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागत. या दोघांच्या मुळे होणाऱ्या त्रासातून कसे मुक्त व्हायचे हा प्रश्न सदा सर्वांसमोर उभा असे.
चाणाक्ष नावाच्या एका तरुणाला एक उपाय सुचला. त्याने त्याला, राजकन्येशी त्याचा विवाह झाल्याचे स्वप्न पडले असल्याचे सांगायला सुरुवात केली. ती बातमी राजाच्या कानावर पोचली. राजाने चाणाक्षाला बोलावून विचारले— "कायरे, राजकन्येशी तुझे लग्न झाले असल्याचे तुला स्वप्न पडलं म्हणे? तू सर्वांना सांगत सुटला आहेस?"
"होय, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत! मला स्वप्न पडलं ही गोष्ट खरी आणि मी ती गोष्ट सर्वांना सांगितली ही गोष्ट ही खरी. माझ्या स्वप्नात ते होऊ देऊ नका महाराज, नाहीतर राजाचा जावई होणे मोठीच गोष्ट नव्हे का?" चाणाक्ष म्हणाला. राजाने आपल्या दोघा मंत्र्यांना सल्ला विचारला.
"महाराज, त्याला राजकन्येशी त्याचा विवाह झाला असल्याचं स्वप्न पडलं त्यात काही चूक नाही. परंतु त्याने ती गोष्ट सर्वांना सांगत सुटणे ही गोष्ट दंड करण्यालायक आहे!" रंजन म्हणाला.
"एका सामान्य माणसाने राजकन्येशी विवाह करणे म्हणजे राजद्रोह आहे! याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे!" भंजनने सल्ला दिला. लगेच चाणाक्षाची चौकशी करण्यासाठी जाहीर सभा झाली. गुन्ह्याची चौकशी पाहायला लोकांची मोठी गर्दी जमली. चाणाक्षाने जाहीरपणे कबुली दिली की स्वप्नात त्याचे लग्न राजकन्येशी झाले असल्याची गोष्ट खरी आहे. ते ऐकल्यावर राजा त्याच्यावर ओरडून म्हणाला— "काय रे, स्वप्नात राजकन्येशी विवाह करायला तू निघालास, तुझे हे धाडस?"
"महाराजांनी मला क्षमा करावी! यांत माझी चूक काही नाही. राजकन्येचे जोडे पुसायची लायकीही माझी नाही, हे मला कळते महाराज! मी 'नको नको' म्हणून कितीदा विनविले तरी तिकडे दुर्लक्ष करून आपल्या शेजारच्या राज्याचे अधिपती भल्लूकवर्मा यांनी माझा व राजकन्येचा विवाह समारंभ उरकून घेतला! आता मी तरी काय करू महाराज? आपणच सांगावे!" चाणाक्ष म्हणाला.
ते ऐकून राजा संतापून म्हणाला— "त्या भल्लूकवर्माची चरबी चढलेली दिसते आहे. ती उतरविलीच पाहिजे. रंजन मंत्री, काय वाटतं तुम्हाला?"
"महाराज, अहो ते स्वप्नच होते नाही का? विनाकारण शेजारच्या राजाशी वैर करून घेण्यात राज्याचे हित नाही. महाराजांच्या गौरवाला कलंक लावणाऱ्या या चाणाक्षाला आपण काहीतरी शिक्षा करावी, एवढे केले की पुरे." रंजन म्हणाला.
"भंजन मंत्री, या बाबतीत आपण काय करावं?" राजाने विचारले.
"महाराज, या भल्लूकाला क्षमा केली तर आपल्याला भित्रा, कापुरुष म्हणतील! त्याचं डोकं उडवावं!" भंजन म्हणाला. राजा सेनापतीकडे वळून म्हणाला— "सेनापती, ताबडतोब सैन्याला सज्ज व्हायला आज्ञा करा आणि राजपुरोहिताला विचारून स्वारीसाठी चांगलासा मुहूर्त सांगायला सांगा. सर्व गोष्टी लवकर झटपट झाल्या पाहिजेत!"
चाणाक्ष मध्येच म्हणाला— "महाराज, आपण माझ्या स्वप्नाची गोष्ट पूरी पूरी ऐकली नाहीत. भल्लूकवर्माने माझं लग्न कसं लावून दिलं, वाटलं आपल्याला? तो पहिल्याने आपल्या राज्यावर ससैन्य चालून आला व या रंजन व भंजन मंत्र्यांच्या समोरच आपला वध केला. तेव्हा आपल्यावरच्या पूर्ण विश्वासामुळे रंजन मंत्री म्हणाला— 'देवासारेख आमचे महाराजच गेले, तर मी जिवंत राहून तरी काय करणार?' असा विचार करून रंजन मंत्रीवर्यांनी आत्महत्या करून घेतली."
ते ऐकून राजाने आनंदाने रंजन मंत्र्याला आलिंगन देऊन विचारले— "त्या वेळी भंजन मंत्री काय करीत होते?"
चाणाक्ष डोळे पुशीत म्हणाला— "सर्व प्रजा आपल्या विरहाने दु:खी होऊन रडत असता भंजन मंत्रीवर्य 'मी शरण मागतो' आपल्या चरणांजवळ म्हणत भल्लूकवर्माच्या पायां पडले. भल्लूकवर्माने त्यांना आपला मंत्री करून घेतले. भंजन मंत्रीवर्य भल्लूकवर्माचा जयजयकार करू लागले."
राजाचे डोळे आणखी लाल झाले. म्हणाला— "इतका विश्वासघातकी आहे का हा भंजन? याला तर राज्यद्रोहाबद्दल शिरच्छेदाचीच शिक्षा करायला हवी!"
"शिव शिव!" रंजन मंत्री म्हणाला.
"तुम्हाला काय वाटतं रंजन मंत्री?" राजाने विचारलं सवयीप्रमाणे. राजाच्या मूर्खपणाची चांगली ओळख असल्या कारणाने भंजन मंत्री थरथर कापत म्हणाला— "महाराज! कीव करावी, दया करावी महाराज! जिवंत सोडलात तर आपल्या अनुज्ञेने कोठेतरी दूर निघून जाईन, सुखाने आयुष्य घालवीन."
भंजनने त्याच दिवशी राज्याबाहेर पलायन केले. तो राज्यसभेतून निघून गेला त्या दिवशीच राजाने रंजनमंत्र्याला विचारले— "या चाणाक्षाला काहीतरी चांगलं इनाम द्यावं म्हणतो आहे!"
"बदनामी व्हायची ती झालीच आहे, याच्याशीच राजकन्येचा विवाह करून द्यावा!" रंजनमंत्री म्हणाला. त्यावेळी तो कृतज्ञता दर्शवीत चाणाक्षाकडे पाहात होता.