कृतघ्न प्राणी
एकदा एक शिकारी जंगलात शिकारीला गेला होता. एका जागी त्याला खड्ड्यातून निरनिराळ्या प्रकारचे आवाज ऐकू आले. शिकाऱ्याने खड्ड्यात डोकावून पाहिले.
"दादा! आम्हांला वाचवा हो! देव तुम्हांला सुखी करील." आवाज ऐकू आले.
त्या खड्ड्यात शिकाऱ्याला एक मनुष्य, एक चित्ता, एक साप व एक उंदीर दिसला. खड्ड्याची भिंत सरळ उभी होती, म्हणून एकाही प्राण्याला चढून येणे शक्य नव्हते.
"तुम्हाला मी मदत कशाला करू रे? उंदीर आमचे धान्य खाऊन टाकतो. साप चावून आमचा जीव घेतो. चित्ते आमच्या गाईची वासरे उचलून नेतात. मनुष्य आमच्या जातीचा आहे, मी त्याला एकट्याला वाचवीन." शिकारी म्हणाला.
परंतु इतर प्राण्यांनी गयावया करून वाचवायला विनंती केली. तेव्हा शिकाऱ्याला त्यांची कीव आली व त्याने लांब लांब वेलींचे दोरखंड वळून ते खड्ड्यात सोडले व त्यांच्या आधारे सर्व प्राण्यांना वाचविले.
"आम्ही या उपकाराची फेड म्हणून कोणती तरी उपयोगी वस्तू आणून देतो," असे सांगून उंदीर, साप व चित्ता निघून गेले. परंतु मनुष्य म्हणाला— "दादा! मी फार गरीब आहे. खायलादेखील मला मिळत नाही. म्हणून मी आपल्याला कोणतीही वस्तू भेट म्हणून आणून देऊ शकणार नाही."
ते ऐकून शिकारी त्या गरीब माणसाला आपल्या झोपडीत बोलावून घेऊन गेला आणि त्याला पोटभर खायला घातले.
दुसऱ्या दिवशी चित्त्याने शिकार करून एक हरिण शिकाऱ्याला प्रेमाची भेट म्हणून दिले आणि म्हणाला— "आजपासून तुला शिकार करण्याची गरज नाही. मी रोज शिकार करून तुला लागणारे मांस पुरवीन." असे सांगून चित्ता निघून गेला.
त्यानंतर साप आला आणि म्हणाला— "मी तुझ्यासाठी एक चूर्ण आणले आहे. हे चूर्ण एखाद्या कृतघ्नाच्या रक्तात भिजवून ते साप चावेल त्या जागेवर चोळलेस तर विष उतरेल." असे सांगून एक तऱ्हेचे चूर्ण शिकाऱ्याच्या हातात देऊन साप निघून गेला.
त्यानंतर उंदीर कसले तरी लहानसे गाठोडे ओढीत घेऊन आला आणि म्हणाला— "यात पुष्कळ दागिने आहेत. मी कित्येक दिवसांपासून हे जमवून ठेवले आहेत. हे विकून आयुष्यभर तुला आनंदाने घालविता येतील." असे सांगून उंदीरपण निघून गेला. त्या गाठोड्यात सोन्या-चांदीचे दागिने होते.
हे दागिने मिळाल्यामुळे मी केवढा श्रीमंत झालो आहे, आता मी या खोपटात कशाला राहायचे? असा विचार करून शिकाऱ्याने सर्व दागिने विकले आणि जे पैसे मिळाले ते खर्च करून त्याने एक चांगलेसे घर बांधले आणि त्यात राहू लागला. तो गरीब मनुष्य शिकाऱ्याबरोबरच राहत होता. शिकाऱ्याचे वैभव पाहून त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. तो शिकाऱ्याचे वाईट कसे व केव्हा होते याची वाट पाहू लागला.
त्याच सुमारास शहराच्या एका अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाली. पैसे व दागिने चोरीस गेले. त्याने दवंडी पिटविली की जो कोणी चोराला पकडून देईल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल.
शिकाऱ्याच्या घरी राहणाऱ्या त्या गरीब माणसाने अधिकाऱ्याला जाऊन चोरीचा माल शिकाऱ्याकडे असल्याचे कळविले. म्हणाला— "मी त्या माणसाला ओळखतो. त्याने आपल्या घरातले दागिने चोरून विकले व एक मोठे घर बांधून त्यात राहत आहे. पाहिजे तर येऊन आपण ते घर पाहून घ्यावे."
अधिकाऱ्याने आपल्या नोकरांना पाठवून शिकाऱ्याला बोलाविले आणि विचारले— "काय रे, तू हे एवढे मोठे घर कसे काय बांधलेस? कोठून आले इतके पैसे?"
शिकाऱ्याने खोल खड्ड्यात पडलेल्या चार प्राण्यांना त्याने कसे वाचविले होते ते सांगितले.
अधिकारी ते सर्व ऐकून म्हणाला— "तू कपोलकल्पित गोष्टी सांगू लागलास तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार? मला तर तू अट्टल चोर दिसतो आहेस." नंतर तो आपल्या शिपायांना म्हणाला— "या माणसाला धरून तुरुंगात नेऊन टाका. नंतर सर्व चौकशी करू."
थोड्या वेळाने घरातून नोकरांनी धावत येऊन मुलीला साप चावल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती. काय करावे, अधिकाऱ्याला सुचेना.
"आपण काळजी करू नका, सापाचे विष उतरविण्यास माझ्याकडे औषध आहे. मी आपल्याला थोड्या वेळापूर्वीच तर सांगितले की मी ज्या सापाला वाचविले होते त्यानेच एक औषध मला देऊन ठेवले होते. या कृतघ्न माणसाच्या रक्तात भिजवून साप चावलेल्या जागी हे औषध लावले तर विष उतरेल." शिकारी म्हणाला.
अधिकाऱ्याने त्याप्रमाणे मुलीला साप चावला होता त्या जागी ते औषध चोळून लावले. मुलीला शुद्ध आली व ती उठून बसली.
अशा तऱ्हेने शेवटी शिकारी म्हणाला होता ते सर्व खरे असल्याची अधिकाऱ्याची खात्री पटली आणि त्याने त्या कृतघ्न माणसाला शिक्षा केली आणि शिकाऱ्याची माफी मागितली.