All Marathi Stories

खडतर व्रत

एक राजा होता व एक राणी होती. त्यांना बारा मुले होती. पण एक देखील मुलगी नव्हती म्हणून राणीला तिचीच उणीव भासे. नाहीतर मुलगा होत नाही म्हणून लोक व्रते अनुष्ठाने करतात. या उलट मुलगी व्हावी म्हणून राणी देवीच्या देवळात गेली व पदर पसरून तिने देवी जवळ मागणी घातले की देवी, मला एक सुंदर कन्या दे. मग मुले नसली तरी हरकत नाही. तोंडाने ती म्हणाली खरी, पण तिने स्वतःच आपली जीभ चावली व म्हणाली- "किती मूर्ख व पापिन आहे मी! माझ्या तोंडांतून असे शब्द निघाले तरी कसे?" तिला फार पश्चात्ताप वाटला. पण पुढे कांहीं दिवसांनी ही गोष्ट ती पार विसरून गेली. आपले मागणे देवी पुरे करील व आपण जसे मागणे घातले आहे तसेच पुरे करील हे तिच्या ध्यानी मनी देखील नव्हते. देवी नवसाला पावली आणि राणीला नऊ महिन्यांनी खरोखरच एक कन्यारत्न झाले. तिची बाराची बारा मुले बदके झाली आणि आकाश मार्गे उडून गेली. पुढे ती कोणाला पुन्हा कधी दिसली नाहीत. बारा वर्षे लोटली. राजकन्या खरोखरच फार सुंदर होती. तिला पाहिले की असे वाटे की प्रत्यक्ष देवीचाच अवतार आहे. राजकन्येने मैत्रिणींच्या व दासदासींच्या तोंडून ऐकले की तिला बारा भाऊ होते व जन्मल्याबरोबर ते बदके होऊन उडून गेले. परंतु असे का झाले हे मात्र तिला कळले नाही. घरात ती एकटीच होती. बरोबर खेळायला कोणी नाही म्हणून भाऊ नसल्याने एकटेपणा जास्तच जाणवला. भाऊ का बदके होऊन उडून गेले याविषयी कळावी अशी उत्सुकता अर्थात जास्त जास्त वाढू लागली व एक मानसिक आजार होण्यास ते एक कारण झाले. मुलीने नेहमी हसत राहावे व खेळत राहावे असे आईला वाटे. परंतु ती अशी आजारपण सारखी अंथरुणावर पडून राहायची किंवा एकटी कोठे तरी बसून राहायची हे पाहून तिच्या आईला काळजी वाटू लागली. मुलीने शेवटी आईला कारण विचारले व आईने ते इच्छा नसून सांगून टाकले. त्यावर मुलगी म्हणाली- "म्हणजे माझ्या भावांची अशी स्थिती व्हायला कारण मीच. त्यांना किती कष्ट सहन करावे लागत असतील कोण जाणे! त्यांना पुन्हा मनुष्य रूप मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही." ते ऐकून आईला वाटले की मुले तर आता नाहीतच, या मुलीने देखील जिवाचे बरे वाईट करून घेतले तर काय होणार? म्हणून तिने तिला न कळत तिच्यावर नजर ठेवण्यासाठी दासदासी नेमल्या. परंतु त्याच दिवशी रात्री राजकन्या राजवाड्यांतून बाहेर दूर रानात निघून गेली. तिने बरोबर खायला थोडेफार घेतले होते. सुदैवाने तिला रानात फळे खायला मिळाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती एका झोपडीत जाऊन पोचली. त्या झोपडीच्या चहू बाजूला फुलवाडी होती. त्या झोपडीत जेवणाची सर्व तयारी होती व बारा अंथरुणे पण तयार होती. इतक्यात तिला बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली. नंतर एका मागून एक बारा तरुण आत आले. तिला पाहून त्या सर्वांना फार वाईट वाटले. एकजण म्हणाला- "आपले दुर्भाग्य कोठून घेऊन आले तुला कोण जाणे! एका मुलीमुळेच तर आम्हाला आपल्या आईबापांपासून पारखे व्हावे लागले आणि दिवसभर बदक होऊन जगावे लागत आहे. बारा वर्षे झाली तो शाप लागून." दुसरा म्हणाला- "म्हणूनच तर मुलगी दिसली की तिचा जीव घ्यायचे आम्ही ठरविले आहे. परंतु तू इतकी गरीब व भोळी दिसतेस की तुझा जीव घ्यायला हात पुढे होत नाही. तरी आम्हाला आपली प्रतिष्ठा तरी कशी मोडता येईल?" "मी तुमचीच बहीण आहे. तुम्ही म्हणलांत ते मी कालच ऐकले आणि तुमच्या शोधात घर सोडून बाहेर निघाले." राजकन्या म्हणाली. तिच्या भावांना ते ऐकून फार लाज वाटली. आपली बहीण इतकी चांगली आहे आणि आम्ही अशी प्रतिज्ञा का बरे केली होती! इतक्यात दरवाजांत एक स्त्री आली आणि त्यांना रागावून म्हणाली- "पुरे झाली तुमची प्रतिज्ञा! तुम्ही या मुलीचा जीव घ्यायचा विचार नुसता मनांत आणलांत तर पहा, तुम्हाला या तलावांतले शेवाळ करून टाकीन मी! खबरदार तिच्या अंगाला हात लावलांत तर! ती तुम्हांला शापमुक्त करण्यासाठी आली आहे. ते तेवढे सोपे नाही. तिला खडतर व्रत करावे लागणार आहे. रानातले मऊ गवत व शेवाळे आणून त्यांची वस्त्रे तुमच्यासाठी विणून तिने तयार केली पाहिजेत. याला निदान पाच वर्षे लागतील. या पाच वर्षात तिने हसता कामा नये की रडता कामा नये. कोणाशी बोलता कामा नये. या तिन्ही पैकी एक देखील चुकले तरी व्रतभंग होईल." म्हणून तुम्ही स्वतःच्या हितासाठी तिची काळजी घेत राहिले पाहिजे." असे सांगून ती स्त्री अदृश्य झाली. भावांना ते ऐकून परमानंद झाला. आपला उद्धार करण्यासाठी धाकट्या बहिणीला हे खडतर व्रत घ्यावे लागणार याबद्दल त्यांना तिची फार दया आली. बाराच वर्षांची तर मुलगी होती. त्यांनी तिच्या रक्षणासाठी सतत जागरूक राहण्याचे ठरविले. बहिणीने व्रत सुरू केले. ती त्यांच्यासाठी रानटी गवताचे सदरे शिवू लागली. तीन वर्षे लोटली. ती कोणाशी बोलली नाही, हसली नाही की रडली नाही. तोपर्यंत आठ सदरे तयार झाले होते. एकदा ती फुलवाजेजवळ रानटी गवत कापीत बसली असता एका राजकुमाराने बाहेरच्या फाटकाजवळ येऊन तिला विचारले- "येऊ का आत?" तिने मान हलवून होकार दिल्यावर तो आत गेला. तो म्हणाला- "मी वनापलीकडच्या नगराचा राजा आहे. शिकारीसाठी आलो होतो या बाजूला. तू येतेस का आमच्या गांवी? मी तुझ्याशी लग्न करून तुला आपली पट्टराणी करीन." तिने त्याला पाहिले तेव्हापासून त्याने जणू काही तिचे मन चोरले होते. दोघांची दृष्टादृष्ट झाली व मनाची साक्ष मनाला पटली. परंतु तिला आपल्या बारा भावांचा उद्धार करायचा होता. व त्यासाठी तिने व्रत केले होते. ते व्रत अर्धअधिक पुरे झाले होते. म्हणून मनात फार इच्छा असूनदेखील राजकुमार तिच्याशी बोलू लागला म्हणजे ती तोंड फिरवून घेई. मौन संमती दर्शविली. ती त्या राजकुमाराबरोबर गेली तरी तिच्या भावांना ती कोठे गेली आहे हे कळलेच. तरी निघण्यापूर्वी तिने तोपर्यंत तयार झालेले सदरे व गवत दोन टोपल्यात घातले आणि दोन्ही टोपल्या घेऊन निघाली. राजकुमाराच्या नोकरांनी त्या टोपल्या नेण्याची जबाबदारी घेतली. राजकुमाराने तिला बरोबर घोड्यावर बसवून घेतले आणि राजधानीकडे निघाला. दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला. तिच्या रूपावरून व वागण्यावरून राजकुमाराची खात्री झाली होती की तिची बायको सामान्य स्त्री नसून कोणीतरी राजकन्याच आहे. परंतु त्याच्या सावत्र आईला वाटले की ती कोणी तरी रानटी जातीची स्त्री आहे व तसे म्हणून दाखवायला देखील तिने मार्ग पुढे पाहिले नाही. परंतु राजकुमार स्वतंत्र विचाराचा होता त्याने सावत्र आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. राजकन्येने गवताचे सदरे विणून तयार करण्याचे काम चालू ठेवले. एक वर्ष गेले, तिला एक मुलगा झाला. राजाला फार आनंद झाला. सावत्र मुलाच्या मुलाचे वारसे वगैरे सोहळे पाहून सावत्र आईला हेवा वाटू लागला. तिने आपल्या सावत्र मुलाची व सुनेचे आपसांत वितुष्ट यावे म्हणून प्रयत्न सुरू केला. एकदा तिने सुनेला भूल द्यावी म्हणून एक औषध दिले आणि तिच्या मुलाला पळवून नेण्यासाठी तिला मुलाला उचलले. पण तितक्यात तिला खिडकीतून तोंड वासून उभे असलेले तोच लांडगा दिसला. तिने त्या मुलाला बाहेर फेकून दिला. लांडगा मुलाला घेऊन दूर पळून गेला. नंतर राजमातेने आपले बोट कापून घेतले आणि सुनेच्या तोंडाला रक्त फासून निघून गेली. राजकुमार शिकार करून परत आला तेव्हा सावत्र आईने त्या रानटी स्त्रीला घरात पट्टराणी म्हणून आणल्याचा काय परिणाम झाला ते तिखटमीठ लावून वर्णन करून सांगितले. तिने नातवाच्या अशा तऱ्हेने अमानुष वध झाल्याबद्दल ओक्साबोक्शी रडण्याचे ढोंग देखील केले. बायकोच्या तोंडाला रक्त व मुलगा नाहीसा झालेला पाहून दुःखा मुळे व भया मुळे राजा किंकर्तव्य विमूढ उभा राहिला. तरी त्याने सर्वांना बजावून सांगितले की ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. तिने आपल्या सावत्र आईला विचारले की कोणी लंगडा उचलून घेऊन गेला. तिने होकार दिला. परंतु तिने आपल्या सावत्र मुलाला जसे सांगितले होते तसेच खोटे सर्वांना सांगितले. हे सर्व घडल्याचे सर्वात अधिक दुःख कोणाला झाले असेल तर: राजकन्या. तिचा मुलगा नाहीसा झालेला व तिच्यावर खुनाचा आरोप! राजाच्या मनात देखील तोच संदेह आहे असे कळल्यावर तर तिला फार वाईट वाटले. तरी तिने मनाला फार आवरले व आपल्या भावांसाठी सदरे विणण्याचे काम चालू ठेवले. तिचे भाऊ पक्षिरूपाने येत. खिडकीतून ती सुखरूप आहे हे पाहत व निघून जात. अजून एक वर्ष झाले. अकरा सदरे विणून तयार झाले. बारावा देखील जवळ जवळ पुरा झाला. थोडेच उरले असेल व तिला पुन्हा दिवस गेले व या खेपेस तिला एक मुलगी झाली. पहिल्याने झाले तसे पुन्हा होऊ नये म्हणून राजकुमाराने राणीच्या खोलीत चोवीस तास दास दासींचा पहारा ठेवला. परंतु दुष्ट राजमातेने या खेपेस दासींना लाच देऊन राणीला पुन्हा भूल यावी म्हणून औषध दिले. बेशुद्ध राणीच्या कुशीत झोपलेल्या मुलीला उचलून घेऊन ती निघाली. तेवढ्यांत तिला खिडकीतून तोंड वासून उभे असलेला तोच लांडगा दिसला. तिने मागचा पुढचा काही एक विचार न करता त्या मुलीला खाली टाकले. लांडगा मुलीला घेऊन रानात निघून गेला. मागच्या प्रमाणे राणीने आपले बोट कापून घेतले आणि राणीच्या तोंडाला रक्त फासून मोठमोठ्याने ओरडू लागली की जाऊन पहा त्या राक्षसिणीने मुलीला देखील खाऊन टाकले आहे. राणी संकटात पडली की काय करावे? बोलावे तर व्रतभंग होणार, रडावे तरी व्रत-भंग होणार? व्रत पुरे होण्यास थोडाच काळ हवा होता. तिने मनाचा निग्रह केला व प्राण गेला तरी व्रत न मोडण्याचे मनाशी ठरविले. बारा सदरा विणून पुरा करण्यासाठी ती सर्व शक्ती एकवटून काम करू लागली. राजवाड्यात अनेक बेत होऊ लागले. राजाने तिला पुन्हा रानात सोडून द्यायचा विचार केला. परंतु राजमातेला ते कबूल नव्हते. ती म्हणाली- "अशा राक्षसिणीला जिवंत जाळी पाहिजे!" इतर दरबारी न्यायाधीश वगैरेचे तेच मत पडले. राजकुमार तरी काय करणार? त्याने आज्ञा केली की त्या दिवशी सायंकाळी राणीला जिवंत जाळून टाकण्यात यावे. ठरल्या वेळी शिपाई आले व राणीला स्मशानात घेऊन गेले. ती तो सदरा देखील बरोबर घेऊन निघाली व विणण्याचे काम तिने चालू ठेवले. सुदैवाने तो सदरा पुरा झाला व ती चितेवर चढून उभी राहिली आणि म्हणाली- "मला याविषयी कांही एक सुद्धा माहित नाही. प्रथम राजाला बोलावून आणा!" राणी बोलू लागलेली पाहून सर्व चकित झाले. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोठून तरी बारा पक्षी उडत आले. ती त्यांना एक एक सदरा अंगात घालू लागली व ते सुंदर तरुण होऊन तेथे उभे राहू लागले. बारा पक्षी बारा राजकुमार झाले. त्यांनी आपल्या बहिणीला चितेवरून खाली उतरवले. त्याच वेळी तिथे राजा आला. तेवढ्यांत कोणी तरी अनोळखी स्त्री आली. तिच्या कडेवर एक मुलगी होती व एक मुलगा तिचे बोट धरून चालत येत होता. तिने दोघां मुलांना राजकन्येला दिले व म्हणाली- "ही घे तुझी मुले!" हे सर्व दृश्य पाहून राजा तर चकित झालाच तेथे हजर असलेले लोक देखील आश्चर्यचित झाले. सर्वांना आनंद झाला. राजा राणीला व आपल्या मुलांना घेऊन आनंदाने राजवाड्यांत परत आला. बारा राजकुमार आपल्या राज्यांत परत गेले.