All Marathi Stories
खरी लक्ष्मी
फार प्राचीन काळी धीमंत नावाचा एक राजा उज्जयिनी येथे राज्य करीत असे. एकदा धीमंत राजाकडे एक योगी आला. राजाने योग्याला पाहून विचारले- "योगिराज! आपल्याला काय पाहिजे?"
"महाराज! माझ्याजवळ एक पत्र्याचा पेला आणि काठी आहे. ती आपल्याला विकण्यासाठी आलो आहे." योगी म्हणाला.
"किती किंमत आहे या दोन्ही वस्तूंची?" राजाने विचारले.
"या दोन्ही वस्तू घेऊन मला एक लाख रुपये द्यावेत, महाराज!" योगी म्हणाला.
ते ऐकून राजाने जास्त विचार केला नाही की मंत्र्याला विचारले नाही आणि योग्याला एक लाख रुपये देऊन त्या दोन्ही वस्तू खजिन्यात ठेवायला सांगितले.
त्या दिवशी रात्री धीमंत राजाला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक अत्यंत रूपवती स्त्री सुंदर वस्त्राभूषणे घालून राजवाड्याबाहेर जात असलेली दिसली. राजाने तिला विचारले- "कोण ग बाई तू?"
"मी धनलक्ष्मी आहे." ती स्त्री म्हणाली.
"तू कोठे चाललीस व का?" राजाने त्या स्त्रीला विचारले.
"तू एक लाख रुपये देऊन एका योग्याकडून एक निरुपयोगी पेला व काठी विकत घेऊन माझा अपमान केला आहेस. म्हणून मी एक क्षणभर देखील राहायला तयार नाही." धनलक्ष्मी म्हणाली.
"तर मग अवश्य जा." राजाने तिच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करून उत्तर दिले.
प्रहर रात्र उलटल्यावर राजाला एक स्त्री स्वप्नातच राजवाड्याबाहेर जात असलेली दिसली.
"कोण ग बाई तू?" राजाने तिला विचारले.
"मी बललक्ष्मी आहे." ती स्त्री म्हणाली.
"तू का व कोठे निघालीस?" राजाने तिला विचारले.
"धनलक्ष्मी तुला सोडून गेली. आता तू किती दिवस माझे रक्षण करणार? म्हणून मी एक क्षणभर देखील येथे राहायला तयार नाही." बललक्ष्मीने उत्तर दिले.
"बरं बाई, तू देखील जा!" राजाने विशेष काळजी न दाखवता उत्तर दिले.
दोन प्रहर रात्र उलटल्यावर राजाला एक म्हातारी राजवाड्यातून बाहेर जात असलेली दिसली.
"कोण ग बाई तू?" राजाने तिला विचारले.
"मी ज्ञानलक्ष्मी आहे." ती स्त्री म्हणाली.
"तू का व कोठे निघालीस?" राजाने तिला विचारले.
"धनलक्ष्मी व बललक्ष्मी निघून गेल्यावर मला येथे राहायला जागा कोठे आहे?" ज्ञानलक्ष्मी म्हणाली.
तीन प्रहर रात्र उलटल्यावर स्वप्नात राजाला देवजातीतील एक स्त्री बाहेर जात असलेली दिसली.
"तू कोण ग बाई?" राजाने तिला विचारले.
"मी धैर्यलक्ष्मी आहे." ती म्हणाली.
राजाने तिला थांबायला सांगितले आणि म्हणाला- "तू मला का सोडून निघालीस?"
"तुला सर्व जणी सोडून निघून गेल्या. मी तरी कशाला राहू?" तिने विचारले.
राजा हात धरून म्हणाला- "तुला नाही जाऊ देणार मी. तू असलीस म्हणजे मला धन, बल आणि ज्ञान सर्व मिळेल."
धैर्यलक्ष्मी स्मित करून म्हणाली- "बरं तर, मी तुझ्या बरोबर सर्व काळ राहीन."
सर्वस्व गेले तरी माणसाने धीर सोडू नये. झोप मोडली तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.