Bookstruck

खोट्यावर खोटे

माधवपूरच्या जमिनदारांकडे गोविंद नावाचा काम करणारा एक मुलगा होता. त्याचा बाप जमिनदाराकडे नोकरी करीत असतां गोविंदच्या लहानपणीच वारला. त्याला त्याच्या आई शिवाय जवळचा नातेवाईक कोणीच नव्हता. जमिनदाराने त्याच्यावर दया करून त्याला आपल्याच घरी, नोकर म्हणून ठेवले. आता गोविंद अठरा वर्षांचा झाला होता. एकदा जमिनदाराने गोविंदला एक काम सांगितले. त्याच्या मुलीचे लग्न शेजारच्या जमिनदाराच्या मुलाशी व्हायचे ठरले होते. त्यासाठी साखरपुड्याचा मुहूर्त पौणिमेच्या दिवशी ठरविण्यात आला होता. परंतु तो मुहूर्त काही कारणामुळे पुढे ढलावा लागत आहे, हा निरोप भावी व्याह्यांकडे पोचविण्याचे काम गोविंदला सांगितले होते. ते काम त्याला सांगून जमिनदार गावात काही कामासाठी गेला. गोविंद शेजारच्या गावी जायला निघणार तेवढ्यात दिवाणसाहेबांनी आणि नंतर राणी सरकारांच्या कड्यांनी काही कामे सांगितली. ती सर्व कामे करून जायला संध्याकाळ झाली. त्या दिवसातला एक तासर्च उरला. मुलांच्या गावी जाऊन परत यायला संध्याकाळ होऊन चांगली रात्र होणार रस्ता तसा बेताचच होता. काळोखातूनच यावे लागले असते. ते त्रासाचेच होणार होते. परंतु मालकांनी जरुरीचे काम सांगितले होते. ते टाळतां येणे शक्य नव्हते. गोविंद काय करावे, या विचारातच असतां एक म्हातारा नोकर त्याला म्हणाला- “रात्रीच्या वेळी कोठे जाणार रे? कीड मुंगी कोठे असणार सांगतां येईल का? साखरपुड्याला आणखी चार दिवस आहेत. उद्या बरं नाही हे सांगून एक दिवसाची सुट्टी मागून घे. गावातून परत येऊन मालकांनी रात्री विचारले तर निरोप पोचविला, असे सांगितले की झाले.” असा सल्ला म्हाताऱ्या नोकराने दिला. तो सल्ला गोविंदला चांगला पटला. रात्री मालकांनी परत आल्याबरोबर गोविंदला निरोप पोचला का, चौकशी केली. “पोचविला मालक!” गोविंद म्हणाला. “त्यांच्या घरात कोणाला तरी सांगितलेस का? की जमिनदारसाहेबांनाच सांगितलेस?” जमिनदाराने विचारले. “जमिनदारसाहेब घरीच होते. त्यांनाच सांगून आलो, मालक!” गोविंद म्हणाला. “ते काय म्हणाले?” जमिनदाराने विचारले. “ठीक आहे, असे सांग, म्हणाले मालक.” गोविंद म्हणाला. “त्यांच्या गावी जायच्या वाटेवरच्या ओढ्याला पूर आला होता, म्हणे? मग तू कसा गेलास रे?” जमिनदाराने विचारले. गोविंद थोडादेखील न कचरतां म्हणाला- “मला पोहतां येते ना! पोहून पलीकडे गेला. परत येणारताना लाकडी पुलावरून आलो.” जमिनदार साहेबांनी हळू हळू मान डोलावीत विचारले- “जमिनदारसाहेबांचे चिरंजीव त्यांच्या मामाच्या घरून काल परत येणार होते, ते आले का?” “परत आले मालक! केव्हां आले ते मात्र माहीत नाही. घरांत दिसले खरे!” गोविंद म्हणाला. “असं जमिनदार साहेबांच्या मागच्या भिंतीच्या बाजूला आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता कारे?” जमिनदाराने विचारले. ते मोहोर येण्याचे दिवसच होते, म्हणून गोविंदने न अडखळतां उत्तर दिले- “आतांच मोहोर थोडाथोडा येऊ लागला आहे, मालक?” गोविंदला अशातऱ्हेने खोट्या पाठीमागून खोटे सांगत जाणे अवघड जाऊ लागले. मालकांनी आतां तरी सोडले तर बरे होईल, असे गोविंदला वाटले. परंतु शेजारीच एक खुर्ची पडली होती तीवर बसून जमिनदार साहेबांनी विचारले- “त्याच्या घरची दुभती गाय दूध देत नव्हती, म्हणे, असे मी ऐकलं होतं, आतां कशी आहे रे?” गोविंदला ताबडतोब काय उत्तर द्यावे, सुचले नाही. परंतु त्याने विचार केला एवढे मोठे जमिनदार औषधपाणी केल्याशिवाय राहतील का? म्हणून त्याने थाप मारली- “आतां गाय चांगली आहे, मालक! कोणताच आजार नाही.” ते उत्तर ऐकून जमिनदार साहेब थोडेसे स्मित करून म्हणाले- “कायरे, गोविंदा तू आतां पर्यंत जेवला आहेस की नाही?” त्याला त्यावेळी चांगली भूक लागली होती. परंतु त्या मोठ्या जमिनदाराकडे भोजन केले नाही म्हटलं तर त्या जमिनदारसाहेबांना कमी लेखल्या सारखे होईल, असा विचार करून त्याने थाप ठोकून दिली- “त्यांच्या घरच्या लोकांनी पोटभर जेवायला घालूनच पाठविले. आतां घरी जातो, मालक!” कारण त्याला, आणखी किती खोटे बोलावे लागेल, यांची भीती वाटू लागली होती. जमिनदार त्याच्या कडे खोल नजरेने पहात म्हणाले- “तू खोटे बोलायला केव्हापासून शिकलास रे?” तो प्रश्न ऐकून आपण खोटे बोलल्याचे मालकाला कळल्याचे त्याच्या लक्षात आलं तो भीतीने घामाघूम झाला. पण जमिनदारसाहेब शांतपणे हसत म्हणाले- “कायरे, तू त्या गावी काही कारणाने जाऊ शकला नसशील. ती गोष्ट मला सांगितली असतीस तर मी तुला, उद्यां जा म्हटले नसते का? पण त्यासाठी एवढं खोटं बोलण्याची गरज काय होती? एक खोटं लपविण्यासाठी खोट्यांवर खोटे बोलावं लागलं ना? आतां पर्यंत ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच असेल?” गोविंदला कांपरे भरलं होतंच. तो मान खाली घालून उभा होता. “आज संध्याकाळी ते जमिनदार साहेब मला गावात भेटले होते. त्यांना मी मुहूर्त पुढे ढकलावा लागत असल्याचे सांगितले. ते घरातच होते असे तू खोटे सांगितलेस. ओढ्याला पूर आला होता म्हटले तर ते खरेच समजून तू आणखी एक थाप दिलीस. तो ओढा कोरडा पडला आहे, ही गोष्ट तुला माहीत नव्हती. होय ना?” जमिनदारसाहेबांनी विचारले. “माहीत नव्हते, मालक! त्या बाजूला फार दिवसां पूर्वी गेलो होतो.” गोविंद घाबऱ्या आवाजात म्हणाला. ते उत्तर ऐकून जमिनदार मोठ्याने हसून म्हणाला- “जमिनदार साहेबांचा मुलगा अजून मामाकडून परतला नाही. नंतर जमिनदारसाहेबांच्या परसांत आंब्याचे झाड नसून कडुनिंबाचे झाड आहे. त्याच प्रमाणे दुभत्या गाईला आजार वगैरे गोष्टी.” गोविंदने खाली घातलेली मान वर उचलली नाही. जमिनदार खुर्चीवरून उठत म्हणाले- “गोविंदा, आता या पुढे तू कधी खोटे बोलू नकोस. खोटे हे विस्तवा सारखे समज. आज नाही तर कधी तरी बाहेर पडतेच!” गोविंद हात जोडून म्हणाला- “माफ करा, मालक! घरातली कामे बरीच राहिली होती, मालक! आपण रागवाल की का गेला नाही, म्हणून खोटे बोललो. यापुढे कधी खोटे बोलणार नाही.” “बर तर जा आत आणि मालकीणबाईंना भेट. त्या तुला वाढतील जेवायला.” जमिनदाराने त्याला निरोप दिला.