All Marathi Stories

गाय-वासरूं

राघव आणि नारायण दोघांची घरे आणि शेते एकमेकांना लागूनच होती. त्या दोघांच्या घरांच्या मध्ये भिंत नव्हती. राघवची बायको कांता आणि नारायणची बायको शांता दोघांचाही देवावर फार विश्वास होता. दोघांकडेही दोन-दोन बैल होते, म्हशीही होत्या, पण दोघांपैकी कुणाकडेच गाय नव्हती. आपापल्या बायकांची इच्छा पुरी करण्याच्या उद्देशाने दोघेही एकदा बाजाराला गेले आणि एक-एक गाय खरेदी करून आले. त्यामुळे कांता व शांता दोघी खूप आनंदित झाल्या, कारण आता त्या गोमातेचं पूजन सहज करू शकणार होत्या. त्या मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने गायींचे लालनपालन करू लागल्या. कालांतराने नारायणच्या गायीने पाठोपाठ दोन वासरांना जन्म दिला, तर राघवच्या गायीने मात्र दोन्ही वेळा कालवडींना जन्म दिला. राघवला एक आशा होती की बैल जन्माला आला तर शेतीवाडीच्या कामाला उपयोगी होईल. आता परत तिसऱ्यांदा गायी गाभण होत्या. राघवची मनापासून इच्छा होती की निदान या खेपेस तरी त्याच्या गायीने बैलाला जन्म द्यावा. ह्याच सुमारास नारायणच्या कोणा आप्ताकडे लग्न असल्याने त्याला परगावी जाणे भाग पडले. जाण्याआधी, गायीच्या देखरेखीची सर्व जबाबदारी राघववर सोपवून तो सर्व कुटुंबियांसमवेत लग्नासाठी निघून गेला. इकडे राघवच्या मनात एक वेगळाच विचार आला. त्याला वाटले की त्याच रात्री दोन्ही गायी व्यायल्या तर किती बरे होईल. त्यानंतर काय करायचं हे त्याने उत्साहाने बायकोला सांगितले. त्याचं बोलणं ऐकून कांता थक्क झाली. आपल्या नवऱ्याशी थोडे फटकून बोलत तिने विचारले, "अहो, काय झालंय तरी काय तुम्हाला? त्यांच्या गायीला जर खोंड जन्मला, तर तो आपण घ्यायचा? आणि आपल्या गायीला कालवड झाली तर त्यांच्या गायीजवळ ठेवायची? हा तर सरळ अन्याय आहे. जनावरं आपल्या पिल्लांची देखरेख आणि सांभाळ, माणसांपेक्षाही जास्त सावधतेने करतात बरं! तुम्ही कुत्र्यामांजरांचे वा माकडांचे वागणे बघितले असेलच. किती प्रेमाने ती आपल्या पिल्लांचा सांभाळ करतात. तुमच्या इच्छेप्रमाणे जरी आपण गायीच्या पिल्लांची अदलाबदल केली, तरी गाय दावे आणि दोर तोडून आपल्या पिल्लाजवळ जाईलच बघा." आपल्या नवऱ्याला सावध करत कांता म्हणाली. राघवने बायकोचे बोलणे काही मनावर घेतले नाही. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच दोन्ही गायींनी पाडा व कालवडीला जन्म दिला. नारायणच्या गायीने बैलाला तर राघवच्या स्वतःच्या गायीने कालवडीला जन्म दिला. कांताने नवऱ्यास रोखण्याचा खूप प्रयत्न करूनही राघवने वासरांची अदलाबदल केलीच. नंतर तो रात्री झोपायला गेला. थोड्याच वेळात गुरांच्या गोठ्यातून खुडबूड ऐकू आल्याने राघव व कांता तिथे गेले. त्यांनी बघितले की त्यांची गाय तिच्या स्वतःच्या कालवडीला चाटत होती. तिच्या गळ्यात दाव्याची अर्धवट तुटलेली दोरी होती. तो लगेच नारायणच्या घराकडे, गोठ्यात गेला, तर त्याची गाय तिच्या बछड्याला चाटत होती. ते बघताच तो मनोमन समजून चुकला की पशुसुद्धा आपल्या पिल्लांवर खूप प्रेम करतात. त्याला पश्चाताप झाला. राघवने नारायणच्या गायीला व तिच्या पिलाला त्यांच्या गोठ्यात बांधले, तर स्वतःच्या गायीला व तिच्या पिलाला आपल्या गोठ्यात बांधले. दुसऱ्याच दिवशी नारायण आणि त्याची बायको गावाहून परत आले. राघवने रात्री घडलेल्या घटनेबद्दल सर्व काही नारायणला सांगून, पश्चाताप व्यक्त करत म्हटले, "माझ्या मनात अशी दुर्बुद्धी निर्माण झाली, त्याबद्दल मला माफ कर." "अरे काय बोलतोस राघव! ह्यात दुर्बुद्धी कसली? तीन-तीन बैलांना घेऊन मी तरी काय करणार आहे? त्यातला एक तू घे ना." "नारायण, खरंच तू फार मोठ्या मनाचा आहेस." "हो, पण माझ्याकडची एक कालवड मात्र तुला घ्यावीच लागेल," राघव आग्रहाने ठासून म्हणाला. नारायणनेही ते मान्य केले. बाजूला उभ्या असलेल्या कांता आणि शांता, त्या दोघांचे हे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होत्या. दोघींनी मोठ्या प्रेमभराने एकमेकींना मिठी मारली.