All Marathi Stories
गोपाळपूरचा जमीनदार
गोपाळपूरचा जमीनदार रत्नाकर एकदा आपल्या शेताची पाहणी करायला गेला. रामजी नावाचा एक शेतकरी ते शेत खंडावर करीत असे. त्या शेतातले पीक रामजी आपल्या घरातच कोठारात साठवून ठेवीत असे.
रामजीच्या घराशेजारीच एका घरात जमीनदार उतरला होता. म्हणून रामजीच्या मुलीने जमीनदारासाठी सुद्धा स्वयंपाक केला होता. जमीनदार जेवायला बसला व रामजीची मुलगी शांती वाढायला आली. तिला पाहून जमीनदाराचे डोळेच फिरले. शांती दिसायला सुंदर होती व तिचं लग्न झालेले नव्हते. जमीनदाराने रामजीच्या मुलीला मागणी घातली व लग्न त्याच्याशी करून द्यायला सांगितले.
रामजी थबकच झाला. कारण जमीनदाराचे लग्न झालेले होते व त्याला दोन मुलेसुद्धा होती. रामजी म्हणाला- "मालक, तुम्ही काय म्हणता आहां, मला नाही कळले?"
"यांत न समजण्यासारखे काय आहे? मी शांतीला दुसरी बायको म्हणून घरात आणणार आहे." जमीनदार म्हणाला.
"मी गरीब आहे, म्हणून आपण हे बोललात, पण हे बरोबर नाही! मेहेरबानी करून पुन्हा असे बोलू नका." रामजी थोडा रागानेच म्हणाला.
परंतु ती गोष्ट जमीनदाराला अपमानास्पद वाटली. त्याला वाटत होते की त्याच्याबरोबर दुसरी बायको म्हणून रहायला कोणत्या स्त्रीला हरकत असण्याचे कारणच काय? रामजीला गर्व चढलेला दिसतो आहे. असा विचार करून त्याने संधी पाहून एके दिवशी शांतीलाच सरळ जाऊन विचारले. शांती तर घाबरूनच पळून गेली. रत्नाकर शांतीचा हातच धरायला जाणार तितक्यात एका तरुणाने "शांती!" म्हणून हाक मारली.
"माधव, तू केव्हा आलास रे?" शांतीने विचारले.
रत्नाकर प्रश्नार्थक दृष्टीने शांतीकडे पाहू लागला. तेव्हा शांती म्हणाली- "हे आमच्या नात्यातले आहेत. यांचे नाव माधव आहे. शहरात कॉलेजात शिकत आहेत. परंतु राहणारे या गावचेच आहेत!"
त्यानंतर रत्नाकर माधवकडे करड्या नजरेने पाहत निघून गेला. शांतीचे माधवशी लग्न ठरले होते. माधवची चांगली वागणूक वगैरे पाहून रामजीने त्याच्याशी शांतीचं लग्न करून द्यायचे ठरवून त्याच्या आईवडिलांशी बोलणी केली होती.
त्याच दिवशी संध्याकाळी दिवे लागल्यावर रत्नाकर संधी पाहून पुन्हा शांतीला भेटला व तिच्याशी लग्न करून घ्यायला आग्रह करू लागला. परंतु शांती समोरून निसटून पळून गेली. रत्नाकर चिडला व दिव्याला लाथाडून शांतीच्या घरातून बाहेर निघून गेला. दिव्यातले तेल घरभर पसरले आणि घराला आग लागली. शेजारपाजारच्या लोकांनी येऊन आग विझविली.
तिथे रत्नाकरने गावालया पंचांना बोलाविले. त्याने, रामजीने आपल्या घरात शेतावरचे पीक जाळून मोठे नुकसान केल्याचा रामजीवर आरोप लावला.
पंचांनी आश्चर्यचकित होऊन उलट विचारले- "अहो, जमीनदार साहेब! तुमच्या पिकाबरोबर रामजीचे घर जळलं नाही का? तुम्ही आपलं पीक मागितलं तर तो बिचारा कोठून देणार? म्हणून तुम्ही आपली फिर्याद मागे घ्यावी!"
"मी आपलं पीक का सोडीन? माझं पीक काढून मला द्यायची जबाबदारी रामजीची आहे, नाही तर...!" जमीनदाराने उलट प्रश्न विचारला.
पंचांनी नाइलाजाने रामजीला बोलाविले. रामजी पंचांसमोर जाण्यापूर्वी शांतीचा हात माधवाच्या हातात देत म्हणाला- "बाबा रे! शांतीचा हात धरण्याच्या हेतूने रत्नाकरने हा डाव टाकला आहे. माझं काय वाटेल ते नुकसान झालं तरी मी शांतीला बिहोरित लोटणार नाही. तिच्या रक्षणाची जबाबदारी आता तुझ्यावर सोडतो!"
"मामा, तुम्ही जा, पंचांना खरं काय ते सांगा, आम्ही येतोच तुमच्या पाठोपाठ!" माधव म्हणाला.
"तसं नव्हे रे बाबा! ज्या लाकडात अग्नी असतो तेच लाकूड जळते!" असे सांगून रामजी निघून गेला.
रामजी म्हणाला ते ऐकून माधवाच्या मनात एक विचार आला. तो कॉलेजात रसायन शास्त्राचा विद्यार्थी होता. रसायनशास्त्रातील एका प्रयोगाने रामजीला वाचविता येईल, असा तो विचार होता. लगेच त्याने त्या प्रयोगासाठी लागणारी सामुग्री जमविली आणि शांतीला बरोबर घेऊन पंच बसले होते तेथे गेला.
रत्नाकर पंचांना सांगत होता- "रामजी आपल्या मुलीचं लग्न माझ्याशी करून द्यायला तयार असेल तर मी आपली फिर्याद मागे घ्यायला तयार आहे."
माधवाने पंचांना नमस्कार केला व नम्रपणे म्हणाला- "पंच हो! आपण कृपा करून शांतीला काय म्हणायचे आहे ते सुद्धा ऐकून घ्यावे!"
शांतीने अथापासून इतिपर्यंत सर्व गोष्टी उघडपणे सांगितल्या. परंतु रत्नाकरने ते सर्व खोटे असल्याचे सांगितले व उलट आरोप लावला- "माझ्या शेतातलं पीक कोठेतरी लपवून ठेवून घर व घरातले पीक जळून गेल्याचे सोंग करता यावे यासाठी शांतीनेच किंवा रामजीने घराला आग लावली असावी."
परंतु माधव म्हणाला- "पंचहो! अशा तऱ्हेने खोटेखरे कळणार नाही. आपण खरे की खोटे देवालाच विचारू या. आपण रामजी, शांती व रत्नाकर जमीनदार तिघांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्यांच्यावर देवावरचा अभिषेक करून त्याचे तीर्थ शिंपडून पाहू या. तेव्हा अपराधी कोण ह्या गोष्टीचा देवच कौल देईल!"
अशा प्रयोगाने खरंखोटं कळण्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. परंतु तो प्रयोग करून पाहण्यात कोणाला हरकत दिसली नाही. असले प्रयोग कधी यशस्वी होणेच शक्य नाही व अपराध सिद्ध होणार नाही. या विश्वासावर रत्नाकरने प्रयोग करून पाहण्यास त्याची हरकत नसल्याचे सांगितले.
माधव देवळात गेला व अभिषेक केलेले तीर्थ घेऊन आला. त्यानंतर त्याने तीन कागदांवर तिघांची नावे लिहिली. पंचांनी अभिषेकचे पाणी तिन्ही कागदांवर शिंपडले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जमीनदाराचे नाव ज्या कागदावर होते, नेमका तोच कागद जळून गेला.
ते पाहून सर्व आश्चर्यचकित होऊन जमीनदाराकडे पाहू लागले. रत्नाकरने घाबरून जाऊन आपली चूक मान्य केली. पंचांनी त्याच्याकडून रामजीला नुकसान भरपाई देवविली. रामजीने ते पैसे खर्च करून शांतीचे लग्न माधवशी करून दिले.
त्यानंतर शांतीने नवऱ्याला एकांतात विचारले- "माधव, जमीनदाराच्या नावाचा कागदच कसा काय जळला? तुम्ही कोणता प्रयोग केला होतात?"
"साखर आणि पोटॅश क्षार मिसळून त्याचा लेप एका कागदावर लावून ठेवला आणि त्या कागदावर जमीनदाराचे नाव लिहिले. अभिषेकाच्या पाण्यात सल्फरिक ॲसिड घालून ठेवले होते. ते ॲसिड लेप लावलेल्या कागदावर पडताच तो कागद जळला. बाकी दोन्ही कागद साधेच होते. म्हणून ते जळले नाहीत." माधव म्हणाला.