चलाख भुते
चलाख भुते
सदाशिव घाई करीत होता. तो आपल्या बायकोला म्हणाला— "अग पार्वती, जरा आटपतं घे की! गाडीवाला उशीर झाला म्हणून ओरडतो आहे!"
खरं बोलायचं म्हणजे पार्वतीला तो प्रवास नको होता. तरी सदाशिव ओरडतच होता— "तू म्हणजे एक हळूबाई आहेस! आज आपण शहराच्या गावी गेलेच पाहिजे."
दुऱ्याच दिवशी त्यांच्याच गावी त्याच्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. गावात राहिला असता तर कोणती तरी भेट किंवा कापड-चोपड द्यावे लागले असते. तो व्यर्थ खर्च टाळता आला, तर टाळण्याच्या हेतूने परगावी निघून जाण्यासाठी सदाशिव घाई करीत होता. त्याने आपल्या मित्राकडे निरोप धाडला की, सासऱ्याची तब्येत एकाएकी बिघडल्यामुळे बायकोबरोबर सासुरवाडीला जावे लागत आहे.
पार्वतीला ते मुळीच आवडले नाही. सदाशिव तिची समजूत घालण्यासाठी म्हणाला— "परवाच आपल्या लग्नाला एक वर्ष पुरं होत आहे. शहरांतल्या बाजारांतून नवीन लुगडं तुला घ्यावे म्हणतो! इकडे लग्न होऊन जाईल तोपर्यंत!"
पार्वतीला ते कसे आवडणार? कारण त्यांच्या लग्नात त्याच मित्राने चांदीचे ताट भेट म्हणून दिले होते. पार्वतीने नवऱ्याला त्या गोष्टीची आठवण करून दिली.
"तू म्हणतेस ते खरं आहे की त्याने आपल्या दोघांच्या लग्नात चांगली भेट दिली होती. परंतु माझ्या बहिणीच्या लग्नात त्याने काय दिलं गं?" सदाशिव चिडक्या स्वरात म्हणाला.
"तुमच्या मित्राला आपल्या या प्रवासाचे गुपित कळले तर त्याला काय वाटेल?" पार्वती म्हणाली.
"तो आहे मूर्ख!" सदाशिव आपल्या हुशारीच्या घमेंडीत म्हणाला.
शेवटी संध्याकाळच्या सुमारास दोघे गाडीत बसून निघाली. उजाडण्यापूर्वी शहरात पोहोचू असे त्यांना वाटत होते. परंतु अर्ध्या वाटेवर पोहोचताच जोराचा पाऊस पडू लागला. पावसाची झड गाडीत येत होती. दोघे नवरा-बायको ओलेचिंब झाले. इतक्यात गाडीचे एक चाक रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात रुतले आणि त्या पाठोपाठ बैलाचा पाय घसरून तो सुद्धा खाली बसला.
गाडीवाल्याने खूप श्रम करून बैलाला उभे केले, परंतु एक पाय लंगडा झाल्यामुळे बैलाला पळता येईना. गाडीवाला चिडून जाऊन सदाशिवला म्हणाला— "मालक! गाडी पुढे जाणे आता शक्य नाही. समोर झाडी दिसते आहे, तिच्या पलीकडे एक खेडेगाव आहे, तिथे रात्र काढा. पाहिजे तर गाडी भाडे अर्धेच द्या म्हणजे झाले!"
नाईलाज म्हणून सदाशिव गाडीतून उतरला व बायकोला घेऊन झाडीच्या दिशेने चालू लागला. थोडे अंतर चालून गेल्यानंतर विजेच्या चकाचाटात काही घरे दिसली. परंतु तोपर्यंत अर्धी रात्र उलटली होती आणि कोठेही दिवा दिसत नव्हता.
सदाशिवला रस्त्याच्या बाजूला एक जुनाट पडके घर दिसले. त्याच्या चौथऱ्यावर बसत तो बायकोला म्हणाला— "रात्र येथेच काढू या."
पार्वतीने लोकांच्या तोंडी ऐकले होते व गोष्टीत वाचलेही होते की जुनाट ओसाड घरात भुते राहतात. म्हणून रात्र त्या घरात काढण्याची गोष्ट ऐकताच तिच्या अंगाचा थरकाप उडाला.
ती हलकाय आवाजात म्हणाली— "मी कित्येकांच्या तोंडी ऐकलं आहे की भुते अशाच घरात राहतात!"
ते ऐकून सदाशिवाची सुद्धा घाबरगुंडी उडाली. परंतु बायकोसमोर आपली मान खाली होऊ नये म्हणून धाडस दाखवून तो म्हणाला— "भुतांची भीती आपल्याला नाही वाटत बुवा! मी भुतांचा मारण होम केला आहे! बत्तीस भुतांना जमिनीत पुरून टाकलं आहे. मला पाहताच भुते..." असे म्हणत असतानाच सदाशिव भडकला आणि ओरडला.
"ओरडून सांगण्याची गरज काय की तुला पाहताच भुते पळून जातात म्हणून! तुझ्या गप्पा आम्ही सर्व ऐकल्या. तुला वाटलं का तुझ्या ओरडण्याने आम्ही भ्यायलो आणि येथून पळून जाऊ? तुझा तो भयंकर आवाज ऐकून आम्ही सुद्धा ओरडणार होतो, पण आमची बोबडीच वळली," भुते म्हणाली.
भुते पाहून पार्वतीला कापरं भरलं. सदाशिवाच्या घशाला कोरड पडली. तरी त्याने धाडस करून व रामाचा आव आणून भुतांना विचारले— "काय रे! तुम्ही मला काय समजलात? माझ्या समोर यायची तुम्हांला हिम्मतच कशी झाली?"
"मालक, आमच्यावर असे रागवू नका! आम्हांला मारण होम करून ठार करू नका. आम्हांला आपल्या वाटेने पळून जाऊ द्या!" एका भुताने विनवणी करीत विचारले.
"आम्हांला जिवानिशी सोडा, आम्ही आयुष्यभर आपलं गुणगान करू," दुसरे भूत म्हणालं.
तेव्हा सदाशिवला वाटलं की ही भुतं अगदी भोळी व मूर्ख दिसत आहेत. तो दरडावून म्हणाला— "माझ्या दृष्टीस जे जे भूत पडते त्याला मी जिवानिशी सोडणार नाही. नाईलाज, माझी ती जुनी सवय आहे, मी कोणाला सोडणार नाही."
"फक्त आजची रात्र ती सवय विसरा. आमच्याकडे दयेच्या नजरेने पहा. याबद्दल आम्ही जवळ जेवढे सोने राखून ठेवले आहे, ते सर्व तुम्हांला देऊ." भुतांनी पाया पडून विनंती केली.
सदाशिव मनातल्या मनात खूप खुश झाला, परंतु वरकरणी कठोर आवाजात म्हणाला— "बोला, कोठे ठेवलं आहे तुम्ही ते सोने लपवून! मला सोन्याची गरज नाही, परंतु तुमची कीव आली म्हणून विचारले."
"मालक, तुम्ही उदार दयाळू आहात, चला आमच्याबरोबर!" असं सांगून भुतं जाऊ लागली. सदाशिवसुद्धा त्यांच्याबरोबर निघाला.
पार्वती घाबरून जाऊन म्हणाली— "तुम्हांला वेडबीड तर नाही लागलं? तुम्ही मला एकटीला येथे सोडून त्या भुतांच्या मागे निघालात काय?"
"अग वेडे, तू थोडावेळ येथे बसून राहा, ही भुते मूर्ख दिसत आहेत! मी हा आलोच परत, येताना पुष्कळसे सोने घेऊन येईन. तुझ्या नशिबी सोन्याचा कंबरपट्टा लिहिलेला आहे. कपाळावर लिहिलेले कोणी पुसू शकेल का?" असे सांगून सदाशिव भुतांच्या मागोमाग निघून गेला.
भुते सदाशिवला घेऊन गेली तिथे जमिनीवर गालिच्यासारखं मऊ गवत उगवलेलं होतं. जागोजागी काटेरी झुडपं सुद्धा होती. ती म्हणाली— "तुम्ही येथे खणून पहा, मिळेल तेवढं सोनं घेऊन जा, तुम्हांला उचलून नेता येईल तेवढे! तुम्ही आम्हांला जीवदान दिले आहे. आम्ही तुमच्या या उपकारापासून कधी उतराई होणार नाही." असे सांगून भुते अदृश्य झाली.
सदाशिवने एक अणकुचीदार फांदी तोडून घेतली व तिच्या टोकाने जमीन खणू लागला. दोन अडीच फूट खणल्यावर त्याला एक सोन्याचं नाणं सापडलं. ते बाजूला ठेवून तो हाताच्या बोटांनी भुसभुशीत जमीन खणू लागला. थोड्या वेळाने त्याच्या हाताला सोन्याची नाणी लागली. थोड्याच वेळात सदाशिवजवळ सोन्याच्या नाण्यांचा एक ढीग झाला. तरी सदाशिव लोभाला बळी पडून जमीन उकरीत राहिला.
इतक्यात एक प्रश्न ऐकून तो चकित झाला. कोणी विचारीत होता— "कोण आहे तो? येथे काय खणतो आहे?"
तोपर्यंत उजाडू लागलं होतं. प्रश्न विचारणारा गावाचा पाहरेकरी होता. सदाशिवने चटदिशी खांद्यावरचं उपरणं त्या नाण्यांवर टाकलं. पाहरेकऱ्यांपैकी एकाने ते उपरणं बाजूला सारून पाहिलं आणि चकित होऊन ओरडला. ढिगाकडे पाहून सदाशिवला चक्कर आल्यासारखं झालं. रात्रभर ती सोन्याची नाणी आहेत असे समजून तो आनंदाने नाचत होता, पण खरोखरी ते हाडाचे तुकडे होते! तो खरोखरी त्यावेळी स्मशानात होता. त्याने खणली होती ती जागा जुन्या काळातली कोणाची तरी समाधी होती.
त्यानंतर पाहरेकऱ्यांनी सदाशिवला अटक करून गावाच्या पोलीस पाटलासमोर उभे केले. पार्वती दुरून हे सर्व पाहत होती. तिने डोळ्यांत पाणी आणून सर्व रडकथा पाटलाला सांगितली. पाटलाला पार्वतीने म्हटलेलं सर्व खरं वाटलं. तो सदाशिवला दटावून म्हणाला— "तू स्वतःला मोठा शहाणा समजून आपल्या मित्राला आणि भुतांना फसवायला निघाला होतास आणि स्वतः संकटात सापडलास. तुला वाटतं होतं की भुतं मूर्ख असतील, परंतु ती वस्ताद निघाली व तू मूर्खात काढला गेलास. निदान या अनुभवावरून तरी आपला शहाणपणा सोडून दुसऱ्याशी प्रामाणिकपणाने वागायला शीक!"
सदाशिवने चुकीची माफी मागितली आणि पाटलाच्या मदतीने भाड्याची गाडी करून आपल्या मित्राच्या बहिणीच्या लग्न समारंभाला हजर राहण्यासाठी निघाला.