जयसिंह
श्यामसिंह हा विजयपुरीचा राजा होता. जयसिंह हा त्याचा एकुलता एक मुलगा त्याचा वारस होता. आसपासच्या अनेक लहानलहान राज्यांना श्यामसिंहाने आपल्या अंकित करून घेतले होते व विजयपुरीचे राज्य वाढवून सामर्थ्यशाली बनवले होते.
जयसिंहाने युद्धकला व राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले होते व त्यांत तो निष्णात बनला होता. जयसिंहदेखील एक चांगला राज्यकर्ता व्हावा अशी त्याच्या पित्याची तीव्र इच्छा होती. पण जयसिंहाला राज्यकारभार करण्यांत स्वारस्य नव्हते. तो नेहमी आपल्याच तंद्रीत असायचा. त्याला चित्रे काढण्यांत रस होता आणि तो जास्त वेळ राजवाड्यांतच बसून घालवीत असे.
आपला मुलगा जास्त उत्साही व आनंदी असावा हे पाहण्यासाठी श्यामसिंहाने अद्भुत नृत्य करणाऱ्या नर्तकींना निमंत्रण दिले. संगीतज्ञ मंडळींना खास बोलावून संगीत सभांचे आयोजन केले. पण कांहीही उपयोग झाला नाही. जयसिंहाच्या वृत्तीत व वागण्यांत कांही फरक झाला नाही.
कधीकधी राज्याच्या दक्षिण भागांत असलेल्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी म्हणून जयसिंह त्या भागांत जायचा व कांही दिवस तिथेच मुक्काम करायचा. त्याचं हे भ्रमंतीच वेड राजाला माहीत होतं.
एक दिवस श्यामसिंहाने जयसिंहाला म्हटलं, "पुत्रा, तुझी ही जीवनाबद्दल अनासक्ती, राजकारणाबद्दल उदासीनता, याचे कारण मला कांही समजत नाही. समुद्राच्या लाटांसारखे उचंबळून येण्याचे तुझे हे तरुण वय आहे. पण तू तर सदा गप्पगप्प असतोस. कुणाविषयी तुला खास प्रेम वाटत नाही. तू सदा कांहीतरी विचारांत गुंग असतोस. याचं कारण तरी काय आहे ते मला सांगशील कां?"
जयसिंहाने संथ आवाजांत म्हटलं, "पिताश्री, याचं कांही एक खास कारण नाही. मला अंतःपुरातल्या या विलासी, थाटामाटाच्या आयुष्यांत विश्वास वाटत नाही. त्याचा मला वीट आला आहे. कांहीतरी वेगळं, नवीन शोधायच्या प्रयत्नांत मी आहे. मला राजभवनापासून कुठेतरी दूर जायची इच्छा आहे. कृपा करुन आपण याची मला अनुमती द्यावी."
श्यामसिंहाने चटकन उत्तर दिले नाही. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, "पुत्रा, तू विजयपुरीचा भावी राजा आहेस. माझं ऐक. कांही तरुण मुलींची चित्रे पहा आणि त्यांतून तुला जी कन्या आवडेल तिच्याशी तू लग्न कर. तुझं लग्न झाले की तुला संसाराविषयी आसक्ती वाटेल आणि राज्याबद्दलही तुझी अनिच्छा कमी होईल. ही माझी खात्री आहे आणि हीच माझी आज्ञाही."
एवढं सांगून श्यामसिंह आपल्या मुलाला कलामंदिरात घेऊन गेला. तिथे अनेक राजकुमारींची चित्रे सुरक्षित ठेवलेली होती. एकापेक्षां एक अशा सुंदरींची चित्रे तिथे ठेवली होती. परंतु जयसिंहाने मात्र कोणत्याही राजकुमारीचे चित्र उत्सुकतेने पाहिले नाही. जेव्हां श्यामसिंहाने मुलाचा निरुत्साह बघितला, तेव्हां त्याने साकेतपुरीच्या राजकुमारीशी जयसिंहाचा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
कांही दिवसानंतर हा विवाहसोहळा थाटांत साजरा झाला. लग्नानंतर रात्रीं जेव्हां नववधू आपल्या पतीची वाट पहात अंतःपुरात बसली होती, तेव्हां जयसिंह गायब झाला. तो कुठे गेला ते कुणालाच कळले नाही. या घटनेमुळे त्याची पत्नी मरुद्धतीदेवी ही दुःखांत बुडली. तिने फक्त जयसिंहाचे चित्र पाहिले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज आणि साहसी वृत्ती पाहून तिने मनांतल्या मनांत जयसिंहाची पूजा करायला सुरवात केली होती.
त्या रात्रीं कुणालाही न सांगता जयसिंह घोड्यावर स्वार होऊन वाट फुटेल तिकडे जात राहिला. एक दिवस तो खूप थकला होता, त्याला भूक लागली होती; पण निदान पाणी तरी प्यावे म्हणजे तृषा भागेल असा विचार करून तो पाणी शोधायला लागला. शेवटी त्या अरण्यांत त्याला एक सरोवर दिसले.
जयसिंह घोड्यावरुन खाली उतरला आणि सरोवराच्या दिशेने पुढे जाताजाता अचानक थबकला. त्या सरोवरांतल्या स्वच्छ पाण्यांत एखादी कळी दिसावी तशी एक सुंदरी जलविहार करीत होती ती त्याच्या नजरेस पडली. त्या तरुणीला पाहून तो स्वतःलाच विसरला. थोड्या वेळाने ती तरुणी पाण्यांतून बाहेर आली. एका पुरुषाला तिथें पाहून ती जोराने ओरडणार होती. पण जयसिंहाने तिला 'ओरडूं नकोस' असे खुणेने सांगितले. त्याचबरोबर तिला कुठल्याही प्रकारे तो त्रास देणार नव्हता हेही त्याने खुणेने सुचवले.
नंतर तिच्याजवळ जाऊन अतिशय मृदु स्वरांत त्याने त्या युवतीला म्हटले, "हे सुंदरी, तूं भिऊं नकोस. मी परदेशी आहे. मला तहान लागलीय. तू कोण आहेस ते मला कळेल कां? तू गंधर्वकन्या आहेस कीं किन्नर कन्या आहेस? तुझ्याबद्दल अधिक माहिती मला मिळावी अशी माझी तीव्र इच्छा आहे."
त्या युवतीने भानावर येत म्हटले, "माझे नांव चांदणी आहे. मी इथेच जवळ राहाते. एका लहान सामंत राजाची मी मुलगी आहे. आपण इथून लगेच निघून गेलात तर ते योग्य ठरेल."
तिचा आवाज ऐकून त्याचे मन उल्हसित झाले. त्याचा निरुत्साह पार पळाला. त्याच क्षणीं त्याने मनोमन निश्चय केला कीं कांहीही होवो, कांही दिवस तरी त्या अरण्यांत, तिथल्या जवळपासच्या डोंगरदऱ्यांत, या वृक्षराजीच्या छायेंत आपण शांतपणे आयुष्य व्यतीत करावे. आपला विचार त्याने त्या सुंदरीला सांगितला. तेव्हां ती त्याला म्हणाली कीं कदाचित तिची माणसें त्याला त्रास देऊं शकतील. पण तिच्या सूचनेकडे लक्ष न देता जयसिंहाने तिथेच राहायचा विचार केला. तेव्हां त्या सुंदरीने त्याला तिथल्या एका गुहेत राहायचा सल्ला दिला. ती रोज त्याच्यासाठी भोजन घेऊन येईल असाही तिने त्याला शब्द दिला. नंतर ती तिथून निघून गेली.
त्या दिवसापासून जयसिंहासाठी साध्या भोजनाबरोबर चांदणी आपल्या घरुन स्वादिष्ट फळे व मधुर मधही घेऊन येऊं लागली. एके दिवशी तिने चित्रकाराला लागणाऱ्या वस्तू बरोबर आणल्या. ते सारं सामान तिला अरण्यांत सांपडलं असं तिने सांगितलं. ती सामुग्री मिळाल्यानंतर जयसिंह जास्तच खुशींत आला. त्याने लागलीच चित्रे काढायला सुरवात केली. आणि चांदणीची निरनिराळ्या प्रकारची चित्रे रेखाटली.
असाच एक आठवडा गेला. एके दिवशी अगदी सूर्योदय होण्याच्या वेळेला चांदणी जयसिंहाला भेटायला आली. ती अतिशय व्याकुळ व दुःखी दिसत होती. कांहीतरी गंभीर समस्या निर्माण झाली असावी असे वाटत होते. तिने भेदरलेल्या स्वरांत जयसिंहाला म्हटले, "महाराज, आपण त्वरित इथून निघून जावे. माझ्या घरच्या लोकांना आपला ठावठिकाणा समजला आहे. आपल्यापाशी कांही हत्यारही नाही तेव्हां आपण त्यांच्याशी सामना कसा करणार?"
तिच्या बोलण्यावर न घाबरता जयसिंहाने म्हटले, "चांदणी, तू माझा निरुत्साह घालवला आहेस, माझा एकलकोंडेपणा दूर केला आहेस, माझ्यांत तू पुन्हां चेतना जागी केली आहेस. आता मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मी तुला राजधानीला घेऊन जाईन आणि माझ्या मातापित्यांना सांगून, त्यांची अनुमती घेऊन तुझ्याशी विवाह करीन."
क्षणभरांतच झाडाच्या मागून श्यामसिंह महाराज पुढे येऊन म्हणाले, "मुला, तुझी ही इच्छा अवश्य पूर्ण होईल. ही दुसरी कुणी नव्हे, तुझी धर्मपत्नी मरुद्धतीच आहे."
आश्चर्यचकित झालेल्या जयसिंहाला प्रणाम करीत मरुद्धती म्हणाली, "स्वामी, मला क्षमा करावी. मी मरुद्धती आहे. आपला पाठलाग करीत या अरण्यांत आले आणि मी आपला पत्नीधर्म इथे राहून पाळला. जर त्यांत कांही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा करावी. हे जे कांही घडलंय, ते थोरल्या महाराजांच्या आज्ञेनुसारच झालंय."
यानंतर महिनाभरांतच श्यामसिंहाने राज्याचा कारभार जयसिंहावर सोपवला. त्याने समर्थपणे राज्य सांभाळले, प्रजेला सुखी ठेवले आणि पित्याप्रमाणेच पुत्रही चांगला आदर्श राजा असतो, हे सिद्ध करुन दाखवले.