झाडाने दिलेला निवाडा
दीनानाथाने, त्याच्याकडे जी थोडी इस्टेट होती ती आपल्या मागे बायकोला आणि दोघां मुलांना सोडली आणि परलोकी प्रयाण केले. मोठा काशीनाथ अठ्ठावीस वर्षांचा होता. गावातल्या जमीनदाराकडे करवसूलीचे काम करी. धाकटा निशिनाथ अजून शाळेतच शिकत होता.
काशीनाथ स्वभावाने चांगला नव्हता. बाप वारल्याबरोबर त्याने इस्टेटीचे वाटे करून घ्यायचे ठरविले व धाकट्याच्या बाबतीत थोडा अन्यायच करायला तो सिद्ध झाला. त्याने काही गावप्रमुखांना बोलाविले आणि इस्टेटीचे दोन समसमान भाग करून घेतले. आईला धाकट्या लेकाकडे राहणेच आवडेल म्हणून सांगून तिला धाकट्या भावाकडेच रहायला सांगितले. त्याबद्दल तिला सुद्धा काही देण्याचे त्याने कबूल केले.
घराच्या आवारात एक सफरचंदाचे झाड होते. त्याची फळे चांगल्या जातीची होती. त्यांचा रंग, वास आणि चव फारच छान होती. सफरचंदाचे झाड दोघांच्या वाट्याला आलेल्या भागाच्या हद्दीवर होते. काशीनाथ खरं पाहिलं तर करता सवरता व मिळविता होता. त्याला स्वतःच्या मिळकतीवर कुटुंबाचा निर्वाह उत्तम प्रकारे चालविता येणे शक्य होते. निशिनाथला काहीच मिळकत नव्हती. म्हणून गावप्रमुखांनी सफरचंदाचे झाड निशिनाथला सोडावे अशी सूचना केली. काशीनाथ त्या गोष्टीस कबूल झाला नाही. "झाडाला जी फळं लागतील त्यातली अर्धी निशिनाथला द्यावी" असे गावप्रमुख म्हणाले.
"फळे कशाला हो? झाड तोडून टाकावे आणि लाकडे अर्धी अर्धी वाटून घ्यावी म्हणजे झाले." असे म्हणत काशीनाथ तेथून निघाला.
"असला हट्ट नाही चालायचा. लिलाव करून टाका!" एक गावप्रमुख म्हणाला.
"अहो, त्याची गरज नाही. मला ते झाड किंवा त्याची फळं मिळाली नाहीत तरी चालेल. माझा देवावर भरवसा आहे. संकटसमयी तोच धावेल मदतीला." निशिनाथ म्हणाला.
"बरं तर आम्ही तुझ्या फायद्याचे काही करू शकू असे वाटत नाही." गावप्रमुख म्हणाले.
असेच काही दिवस लोटले. आपल्या वाट्याच्या थोड्या मिळकतीवर निशिनाथ दोघांचा खर्च भागवीत असे. त्याने मन लावून अभ्यास केला आणि शाळेचे शिक्षण पुरे करून वरच्या परीक्षेसाठी अभ्यासाला शहरात जाऊ लागला. दररोज तीन मैल जावे यावे लागे. सायकल असेल तर सोयीचे होईल, असे त्याला वाटले पण सायकल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते.
योगायोगाने त्या वर्षी सफरचंदे खूप लागली. "वाट्याची अर्धी फळे मिळाली तरी ती विकून सायकल विकत घेता येईल" असे त्याला वाटले. "देवा, तुझ्यावरच माझा सर्व भार आहे!" निशिनाथ मनातल्या मनात देवाला नमस्कार करून म्हणाला.
एका आठवड्याने काशीनाथ एकाएकी आजारी पडला. रोगाचे निदान होऊ न शकल्याने काशीनाथची 'आज आहे उद्या नाही' इतकी प्रकृती बिघडली. आपल्या मोठ्या भावाची प्रकृती सुधारावी म्हणून निशिनाथने देवाला मागणे घातले. त्याच्या नवसाचे फळ म्हणूनच की काय, काशीनाथचा आजार बरा होऊ लागला. तो चांगला बरा झाला परंतु फार अशक्त झाला होता आणि मनाने सुद्धा फार दुर्बल झाला होता.
गावप्रमुख त्याला भेटायला येऊन म्हणाले— "हे पहा, काशीनाथ! देवाच्या कृपेने तू मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलास. ते सफरचंदाचे झाड धाकट्या भावाला देऊन टाक. तुझ्या आईला सुद्धा किती कष्ट सहन करावे लागत आहेत. कोणी परके तर नाहीत ना?"
"मला वाचविणारा देव निशीला सफरचंदाचे झाड देणार नाही का? मध्ये मी कशाला?" काशीनाथ म्हणाला.
गावप्रमुखांबरोबर निशिनाथचा सहाध्यायी हरकुमार आला होता. त्याने विचारले— "तर मग देवाचा निवाडा तू मानायला तयार आहेस का?"
"ते झाड कोणाला मिळावे याचा निवाडा देवच करणार असेल तर नक्कीच तो मी मान्य करीन." काशीनाथ म्हणाला.
"तसे असेल तर आपला मुलगा रामनाथ याच्या नावाची शपथ घे!" हरकुमार म्हणाला.
"तशी शपथ घेतो." काशीनाथ म्हणाला. सर्वजण आपापल्या घरी निघून गेले.
"तुझ्या भावाने शपथ घेतली तसा वागला तर सफरचंदाचे झाड तुझेच समज." हरकुमार निशिनाथला म्हणाला.
"देवाचा माझ्यावर इतका अनुग्रह व्हायला मी देवाचा एवढा मोठा भक्त थोडाच आहे?" निशिनाथ म्हणाला.
"देव स्वतः कधी काही करीत नाही, त्याने ज्यांना थोडी फार बुद्धी दिली आहे त्यांच्या द्वारा सर्व करवितो. तुझ्या बाबतीत आपल्या वर्गातला नकुल आहे ना, त्याच्याशी मी सर्व बोलतो. त्याला इंद्रजाल (जादू) चांगले माहीत आहे. तुझी समस्या तो नक्कीच सोडवील." हरकुमार म्हणाला.
दोन दिवसांनी गावप्रमुख काशीनाथच्या सफरचंदाच्या झाडाखाली जमले. हरकुमार उभा राहून म्हणाला— "हे झाड निशिनाथला देण्याची देवाची इच्छा आहे की नाही याचे प्रमाण या झाडामध्ये किंवा झाडाच्या फळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी झाडावर चढून तीन-चार फळे काढून आणतो. त्यांत काही प्रमाण मिळते का, पाहू या!"
त्याने झाडाला नमस्कार केला आणि झाडावर चढून निरनिराळ्या फांद्यांची दोन तीन फळे काढली आणि ती आपल्या खिशात ठेवून खाली उतरला. त्याने खिशातून फळे काढून तेथे जमलेल्या सर्वांना दाखविली. फळे पाहून काही प्रमाण मिळाले नाही.
"फळांच्या आत काही आहे का पाहूया!" असे म्हणत हरकुमारने काशीनाथच्या हातात एक फळ दिले व एक चाकू देऊन, त्याचे साल काढून आत काही प्रमाण मिळते का पाहायला सांगितले.
काशीनाथने सफरचंदाचे साल काढल्याबरोबर आत फळाचे दोन भाग झालेले दिसले. आणखी एका फळाचे साल सोलून पाहिले तर ते सुद्धा दोन भागांत विभागलेले दिसले.
"खरंच हो, देवाची लीला अगाध आहे!" सर्व म्हणाले.
गांवप्रमुखांपैकी एक वृद्ध होता त्याने काशीनाथला विचारले— "हा देवाचा निवाडा आहे. आतां तरी हे सफरचंदाचे झाड आपल्या धाकट्या भावाला द्यायला तयार आहेस का?"
"तुम्ही म्हणाल तसे! आतां नाही कसं म्हणू? मी मुलाच्या नावाने शपथ घेतली नव्हती का? आतां ते झाड निशीचेच!" काशीनाथ म्हणाला.
निशिनाथने त्या झाडाची फळे विकून सायकल विकत घेतली. एकदा त्याच सायकलीवर बसून तो व हरकुमार दोघे शहरात जात असता वाटेत निशिनाथने त्याला विचारले— "मित्रा! सफरचंद आतून कापलेले कसे होते मला नाही कळले. देवाने खरोखरच माझ्यावर कृपा केली होती का रे?"
"तू तेवढे पुण्य कोठे केले आहेस रे? हे सर्व आपला मित्र नकुल आहे ना, त्याचे काम आहे!" हरकुमार म्हणाला.
"ते कसं काय केलं रे त्याने?" निशिनाथने विचारले.
"त्याने सांगितल्याप्रमाणे मी रात्री तुमच्या झाडावरून कोणाला कळू दिल्याशिवाय काही सफरचंदे काढून घेऊन गेलो होतो. नंतर सुईत बळकट दोरा ओवून ती सुई फळाच्या आतल्या बाजूने सालाला लागल्याशिवाय आतल्या आत फिरवीत नेऊन फळाच्या पलीकडच्या बाजूला ओढून बाहेर काढली. नंतर सुई दुसऱ्या बाजूने पुन्हा फळात घालून फळाच्या आत सालाच्या आतल्या बाजूने फिरवीत सरकवीत पहिल्याने जेथून खुपसली होती तेथून बाहेर काढली. म्हणजे सालाखाली दोरा फळाला गुंडाळला गेला. नंतर दोऱ्याची दोन्ही टोके धरून दोरा ओढला. फळाचा आतला भाग दोऱ्याने आतल्या आत कापला गेला आणि दोरा बाहेर आला. नंतर फळ फडक्याने छान पुसले आणि त्याच्यावरच्या सुई टोचल्याच्या खुणा नाहीशा करण्याचा प्रयत्न केला. अशी तयार करून ठेवलेली सफरचंदे खिशात ठेवूनच झाडावर चढलो होतो आणि समोर काढलेल्या फळांऐवजी पूर्वी तयार करून ठेवलेली फळे खिशातून काढून दाखविली." हरकुमारने हातचलाखीचे या शब्दांत वर्णन केले.