All Marathi Stories

दगडांच्या ढिगावरचा कंदील

जमीनदार केतनवर्मा काही जरुरी कामासाठी हेलापुरीहून विशालनगरकडे जात होता. मध्यरात्रीची वेळ असली, तरी आपले समाजातले उच्च स्थान तो विसरू शकत नव्हता. म्हणून तो आपल्या बग्गीतूनच निघाला होता. बग्गी जंगलातल्या मार्गाने चालू लागली. चहूकडे अंधारच अंधार होता. सईस मोठ्या सावधपणे बग्गी हाकत होता. अचानक रस्त्यात मध्येच असलेल्या दगडांच्या मोठ्या ढिगाला धडक देता देता थांबला. अगदी शेवटच्या क्षणी ढिगाच्या अगदी वर ठेवलेल्या कंदिलाच्या उजेडात सईसाला तो ढीग दिसला अन् त्याने लगाम खेचला. तसे घडले नसते तर ढिगाशी टक्कर होऊन बग्गी उलटली असती. जमीनदार बग्गीतून उतरला. जवळच झाडाखाली अंगाचे मुटकळे करून झोपलेला एक म्हातारा त्या आवाजाने जागा होऊन, उठून जमीनदाराजवळ आला. जमीनदाराला त्याने नमस्कार केला. जमीनदाराने त्याला विचारले, "तूच त्या ढिगावर कंदील ठेवला आहेस का?" "होय महाराज, मीच ठेवलाय. गडद अंधार आहे ना, म्हणून ठेवलंय," म्हातारा उत्तरला. "तुझ्यामुळे वाचलो बघ आज आम्ही अपघातातून! हे घे बक्षिस." असे म्हणत जमीनदाराने काही रुपये म्हाताऱ्याच्या हातावर ठेवले. रुपये मिळाल्याने म्हातारा फारच खूश झाला. तो तेथून जाऊ लागला, तेंव्हा मनात काही शंका येऊन जमीनदाराने त्याला विचारले, "पण रस्त्याच्या मध्येच हा दगडांचा ढीग कसा काय आला?" "महाराज, हे ही काम मीच तर केलं. कंदील खाली ठेवला, तर नीट दिसणार नाही ना! मी अगोदर हा ढीग बनवला अन् येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसावा, म्हणून वर कंदील ठेवला," म्हातारा आत्मविश्वासाने म्हणाला.