देवनाथच्या दिव्य शक्ती
निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हा झाडाजवळ गेला, त्याने झाडावरून शव खाली उतरवले आणि आपल्या खांद्यावर घेतले. नेहमीप्रमाणे त्याने स्मशानाची वाट धरली. तेव्हा प्रेतात लपलेल्या बेताळाने राजाला विचारले, "राजन्, या घनघोर अंधारात तू निर्भयपणे पुढे चालतच राहिला आहेस. तुझे हे अपार कष्ट व मेहनत पाहिले की कुणाच्याही मनात तुझ्याविषयी दयेचा पाझर फुटेल. तू एवढे परिश्रम घेतो आहेस तेव्हा त्याच्या पाठीमागे तुझा काहीतरी सुप्त हेतू असेलच. तुझे ध्येय गांठण्यासाठी तू जी ही साधना करतो आहेस, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. पण हे ध्येय साधण्यासाठी तू जो मार्ग निवडला आहेस तो मात्र श्रेष्ठ असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच तुझी ध्येयसिद्धी योग्य मार्गाने जाते आहे असं म्हटलं जाईल. हे धर्मसूत्र आणि त्याची सक्षमता ओळखून योगी देवनाथने उतावळेपणाने जो निर्णय घेतला, तो पूर्णपणे विसंगत होता. आणि म्हणूनच त्याचा परिणामही अशुभ व वाईट झाला. तुला सावध करण्यासाठी मी तुला त्या योग्याची गोष्ट सांगतो. ती ऐकताना तुझा थकवादेखील दूर होईल." आणि बेताळाने देवनाथ योग्याची पुढील गोष्ट सांगितली.
सिंगबर नावाचे एक गांव समुद्रकिनाऱ्यावर बसलेले होते, त्या गांवाच्यालगत एक अरण्य होते. त्यांत योगी देवनाथने आश्रम स्थापन केला आणि जरूर पडेल तेव्हा तो लोकांना मदत करीत असे. त्या योग्याजवळ अनेक दिव्य शक्ती आहेत अशी बहुतेक लोकांची श्रद्धा होती. सिंगबर गांवात आणि त्याच्या जवळपासच्या प्रदेशात वेळेवर पाऊस पडत होता व उत्तम पीक येत होते. आपल्या कष्टांचे भरपूर फळ मिळते आहे हे पाहून गांवकरी समाधानी व तृप्त होत असत. काही दिवसांनंतर बलराज नावाच्या एका स्वार्थी माणसाची तिथे ग्रामाधिकारी म्हणून नेमणूक झाली. जास्त पैसा मिळवण्यासाठी त्याने गांवात दारूची दुकाने व जुगाराचे अड्डे सुरु केले. त्यामुळे गांवातली तरुण मुले या वाईट सवयींची शिकार बनली.
या संकटाला निमंत्रण दिल्याबद्दल गावकऱ्यांनी बलराजला दोष दिला, पण त्याने त्यांना उत्तर दिले, "काळ बदलत चालला आहे. काळाबरोबर आपणही बदललं पाहिजे. अनेक गावकऱ्यांनी मागणी केली म्हणून मी ही व्यवस्था केली." बलराजच्या या कृतीबद्दल जे लोक क्षुब्ध झाले त्यांच्यामध्ये गिरीराज नावाचा एक शेतकरी होता. त्याच्या घरी त्याची बायको मालती व सहदेव व रमानथ हे दोघे तरुण मुलगे राहात होते. थोरला सहदेव सुशील व सरळ स्वभावाचा होता. गांवातले सगळे सज्जन तरुण त्याच्याशी मैत्री ठेवून होते. पण रमानथ मात्र पोरकट व बेजबाजदार होता. टवाळखोर व उनाड मुलांचा तो नेता होता. रमानथच्या आईवडिलांना नेहमी त्याची काळजी वाटत असे, पण सहदेव त्यांना शांत करीत नेहमी सांगत असे, "तो अजून लहान, अल्लड आहे. त्याच्यावर मी लक्ष ठेवीन. तुम्ही काळजी करू नका."
आपल्या मित्रांच्या मदतीने सहदेव कथाकीर्तन, व लहानसहान प्रहसनांचे कार्यक्रम करीत होता. या करमणुकीतून दारूचे प्रकृतीवर किती वाईट परिणाम होतात, जुगाराचे दुष्परिणाम व नुकसान कसे होते, ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. सहदेवाचे हे कार्य रमानथला मुळीच पसंत नव्हते. त्याबाबत बोलताना त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले, "तुझा भाऊ लोकांचा आवडता आहे. तुला त्याचे काम पसंत नाही पण हे आम्ही लोकांना सांगितलं तर ते चिडतील. सहदेवाच्या विरुद्ध आपल्याला ग्रामाधिकारी बलराजच मदत करू शकतील." बलराजलाही सहदेवाची लोकप्रियता खुपत होती. रमानथ मित्रांना घेऊन जेव्हा त्याच्या घरी आला, तेव्हा तो म्हणाला, "हिरा हिऱ्यानेच कापला जातो. काट्यानेच काटा काढायला हवा. आपण रमानथच्या चांगुलपणाचा उपयोग करून त्याच्यावरती असे काम करून घेऊ, की सगळे ग्रामस्थ त्याचा तिरस्कार करतील." असं सांगून बलराजने एक सविस्तर योजना आखली.
त्याच्या सांगण्यानुसार रमानथचा एक मित्र साधूच्या वेषात सहदेवाकडे जाऊन भेटला आणि त्याला म्हणाला, "मी एकलंय की रमानथ घरात सगळ्यांचा लाडका आहे. तो खोडकर व उडाणटप्पू आहे हेही ऐकलंय. त्याला सुधारायचं असेल तर एक साहसी योजना आहे. तू ते धाडस करशील का?" सहदेवाने चटकन होकार दिला. "बरं तर, आजच मध्यरात्र झाली की तू एकटाच रामाच्या मंदिरात जा. गाभाऱ्यांत श्रीरामचंद्राची मुकुटधारी मूर्ती आहे. तो मुकुट घरी घेऊन जा आणि तुझा भाऊ झोपलेला असेल तर त्याच्या डोक्यावर थोडा वेळ ठेव. नंतर लगेच तो मुकुट घेऊन मंदिरात परत जा, आणि प्रभूच्या मूर्तीच्या मस्तकावर होता तसा ठेवून दे. पण हे काम अत्यंत गुप्तपणे व सावधानतेने करायला हवं. असं केलंस तर तुझा धाकटा भाऊ श्रीरामचंद्रासारखा थोर व गुणवंत होईल." त्या कपटी साधूच्या बोलण्यावर सहदेवाने विश्वास ठेवला. त्याच रात्री तो राममंदिरात गेला. बलराजच्या योजनेप्रमाणे मंदिराची दारे बंद नव्हती. त्यामुळे सहदेवाला वाटलं की प्रभू रामचंद्रदेखील या कामांत त्याला मदत करीत आहेत. त्याने मूर्तीला प्रणाम केला आणि तिच्या मस्तकावरचा मुकुट काढला. पण तेवढ्यांत रमानथचे मित्र आणि ग्रामाधिकारी बलराज तिथे बोलत बोलत पोंचले. हातांत देवाचा मुकुट घेतलेल्या सहदेवाला त्यांनी पकडले. बलराजने सहदेववर प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा रमानथने उत्तरादाखल फक्त म्हटले, "हे माझं केवळ दुर्भाग्य आहे!"
दुसऱ्याच दिवशी रामाच्या मंदिरात सर्व ग्रामस्थांना बोलावण्यांत आले. बलराजने सर्वांच्यासमक्ष सहदेववर चोरीचा आरोप केला आणि त्याला पन्नास फटके मारावेत अशी शिक्षा सुनावली. सहदेवाच्या आईला जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा ती थरथर कापत मुलाजवळ येऊन म्हणाला, "बाळ, तू सज्जन आहेस. तू कधीही वाईट काम करत नाहीस. तू देवाचा मुकुट घेतलास खरा, पण मग त्याच्यामागे काहीतरी सबळ कारण असलंच पाहिजे. मला हे पहावत नाही. तू असं कां केलंस ते सर्वांना सांग." आईच्या विनवणीचा सहदेववर कांही परिणाम झाला नाही. शांत स्वरांत त्याने उत्तर दिले, "आई, माझ्यावर विश्वास ठेव. जर मी मुकुट कां घेतला याचे खरे कारण सांगितले, तर त्यामुळे साऱ्या गावाचे अकल्याण होईल." त्याचे उत्तर ऐकून बलराज मोठ्याने हसला व म्हणाला, "आपल्या गोड बोलण्याने आमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न हा करतो आहे. चांगुलपणाचा बुरखा याने पांघरला आहे. याची शिक्षा तावडतोब अंमलात आणली पाहिजे." असं म्हणून त्याने एका पहिलवानाच्या हातांत चाबूक दिला.
मालती सहदेवाच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, "ज्या गावाचं अमंगल होऊ नये असं माझ्या मुलाला वाटतं, त्याच गांवाकडून त्याला शिक्षा होते आहे! ह्या गांवाचं अकल्याण नक्की होईल; हा माझा शाप आहे." रागाने जमिनीवर पाय आपटून ती म्हणाली. योगायोगाने दुसऱ्याच क्षणी तिथे धरणीकंप झाला. गांवातली सारी घरे कोसळली, जवळच असलेल्या समुद्राचे पाणी गांवात शिरले आणि गांवाची जमीन पाण्याखाली गेली. "आपली सगळी जमीन खारी झाली. कित्येक वर्षे तिथे कांहीच पीक येऊ शकले नसते. सहदेवाच्या बाबतीत आपली फार मोठी चूक झाली. आपण सारेजण समुद्रात बुडून मरून जाऊया, हाच एकमात्र मार्ग आहे." एका गांवकऱ्याने पश्चात्तापाच्या स्वरांत म्हटलं. तेव्हा मालतीने त्याला म्हटलं, "या आपत्तीत कितीतरी लोक मेले आहेत. पण आमच्या घरांतले मात्र सगळे वाचले! आता दिव्यरामच्या योगी देवनाथ यांच्या दर्शनाला जाऊं. तेच कांहीतरी मार्गदर्शन करूं शकतील."
सर्वांनी त्याला संमती दर्शवली. योगी देवनाथांकडे गांवकरी गेले व त्यांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा देवनाथांनी सांगितलं, "तुमचे गांव पुन्हा पूर्वीसारखे चांगले होण्यासाठी माझ्याकडे काही दिव्य शक्ती आहेत. पण त्या शक्ती वापरण्यासाठी काही नियम आवश्यक असतात. ज्या व्यक्तीने आजपर्यंत कोणतेही वाईट कृत्य केलेले नाही, अशा व्यक्तीलाच या दिव्य शक्ती वापरता येतील. असा एकमेव उत्तम माणूस तुमच्या गांवात आहे - तो म्हणजे सहदेव! तोच तुमच्या गांवाला पूर्वीसारखा समृद्ध बनवू शकेल." हे ऐकून सहदेवाचा भाऊ रमानथ पुढे येऊन म्हणाला, "योगीराज, माझ्या मोठ्या भावाने आमच्या गांवातल्या राममंदिरातल्या मूर्तीचा मुकुट चोरला होता. त्या कृत्यामागे त्याचा स्वार्थी हेतू होता. हे माहीत असूनही आपण त्याला योग्य व्यक्ती ठरवता आहात? आपला हा निर्णय सुसंगत व न्यायी आहे कां?"
देवनाथने रमानथकडे रोखून बघत म्हटले, "मला सारं कांही माहीत आहे. सहदेव ह्या दिव्य शक्ती वापरण्यासाठी योग्य व्यक्ती आहे." असं म्हणून देवनाथने सहदेवला जवळ बोलावले व आपल्या दिव्य शक्ती त्याला प्रदान केल्या.
बेताळाने ही गोष्ट सांगून पुढे विचारले, "राजन्, दिव्य शक्ती देण्याच्या बाबतीत देवनाथकडून चूक झाली कां? आपल्या सख्ख्या भावाला सन्मार्गावर परत आणावा म्हणून त्याने देवाचा मुकुट घरी नेण्याचा प्रयत्न केला. हा स्वार्थ, वाईट साहस किंवा अपहरण नाही कां? ही काय उत्तम मनुष्याची लक्षणे आहेत कां? एक चांगले कार्य साधण्यासाठी वाईट मार्ग स्वीकारणे योग्य आहे कां? त्याला दिव्य शक्ती देण्यात देवनाथने पक्षपात केला की नाही? माझ्या या शंकांची उत्तरे माहीत असूनदेखील जर तू गप्प राहिलास तर तुझ्या मस्तकाची अनेक शकले होतील."
विक्रमाकाने म्हटलं, "सहदेवाचा भाऊ रमानथ याचा बलराजने आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला. रमानथला परत चांगल्या मार्गावर आणायचे असेल तर तो व त्याचे मित्र यांचा दुष्टपणा नष्ट करायला हवा! आपल्या भावाला सुधारण्यासाठी, एका चांगल्या कामासाठी त्याने मुकुटाची चोरी केली नव्हती. त्याने आपल्या भावाच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यासाठी त्या साधूच्या आज्ञेनुसार मंदिरातून तो मुकुट घेतला होता. तो बलराजच्या जाळ्यांत सांपडला. ही गोष्ट इतरांना समजली तर गावाचे अकल्याण होईल ही त्याची श्रद्धा होती. स्वतः दोषी नसतानादेखील तो शिक्षा भोगायला तयार झाला. यांत त्याचा निस्वार्थीपणा व त्यागी भावना दिसून येते. चांगले-वाईट याचा निर्णय त्या काम करणाऱ्याचा हेतू काय आहे, त्यावर ठरतो. सहदेवाच्या दुर्भाग्याचा इथे प्रश्नच नाही. योगी देवनाथ यांना सारी खरी वस्तुस्थिती माहीत होती, म्हणून त्यांनी आपल्या शक्ती त्याला दिल्या. त्यांत कोणताही पक्षपात नाही. किंवा कोणतीही त्रुटी नाही."
राजाचे मौन भंग करण्यांत सफल झालेला बेताळ शवासहित अदृश्य झाला आणि झाडावर जाऊन बसला.