धोक्याची आगाऊ सूचना
सुदीप त्या ऑफिसमधे नव्यानेच नोकरीला आला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी, तेथे आधीपासून काम करणारा सुरेश त्याला एकान्तात म्हणाला - "हे बघ सुदीप, ही जागा तुला नवखी आहे. इथल्या लोकांशी जरा सांभाळूनच वाग. जरा कुणाजवळ पैसे दिसले की बास, लगेच उधार मागायला लागतात! एकदा का पैसे दिले, की संपलंच! ते वसूल करायला फार त्रास होतो! माझं हे बोलणं नीट लक्षात ठेव हं!"\n\nइथूनच सुदीप आणि सुरेश यांच्यातली मैत्री वाढू लागली. पहिली तारीख आली अन् सुदीपने सुरेशची सूचना लक्षात ठेवून निश्चय करून टाकला, की कोणी उधार पैसे मागितले तर मुळीच द्यायचे नाहीत. पण बरेच दिवस गेले, तरी त्याच्याकडे कोणीच उसणे पैसे वगैरे मागितले नाहीत.\n\nएक दिवस सुदीप अन् सुरेश काही खरेदीसाठी बरोबरच बाजारात गेले. सुरेशने काही सामान घेतले. पण बिल देताना त्याला पन्नास रुपये कमी पडू लागले.\n\nसुरेश सुदीपला म्हणाला - "आता मला यातलं काही सामान कमी करावं लागेल. तू जरा मला पन्नास रुपये दे न. उद्या सकाळी ऑफिसला आल्याबरोबर तुझे पैसे देऊन टाकीन मी."\n\nसुदीपने चटकन आपल्या खिशातून पन्नासची नोट काढून आपल्या प्रिय मित्राला दिली. पण नंतर बरेच दिवस सुरेशने त्याचे पैसे परत दिलेच नाहीत. शेवटी एक दिवस सुदीपने त्याला पैशांबद्दल विचारले.\n\nयावर सुरेश म्हणाला - "मी तर तुला अगोदरच सुचवलं नव्हतं का, की कुणाला उसणे पैसे दिलेस तर लवकर वसूल होणार नाहीत? आता काही दिवस वाट पाहा; माझ्याकडे तुला देण्यासारखे पैसे जमले, की परत करीन मी तुझे पन्नास रुपये!"\n- प्रकाश परांजपे