नशीबवान
गोपालननगर एक लहानसा गाव आहे. खूप वर्षांपूर्वी तेथे रसीला नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याला भाग्यवर्मा नावाचा एक मुलगा होता. त्याच्या जन्मानंतर रसीलाच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु भाग्यवर्माने तारुण्यात प्रवेश करताना सर्व काही उलटे झाले. पत्नी अचानक मरण पावली. व्यापार करण्यासाठी गेलेली जहाजे समुद्रात बुडून खूप नुकसान झाले. जवळपासच्या राज्यांत विकण्यासाठी पाठवला जाणारा माल जंगलामध्ये चोरांनी पूर्णपणे लुटला. अशा रीतीने रसीलाची सर्व संपत्ती नाहीशी होत गेली आणि लवकरच तो निर्धन, गरीब झाला. या सर्व आघातांमुळे तो आजारी पडला.
आपले शेवटचे दिवस जवळ आलेले पाहून त्याने आपल्या मुलाला, भाग्यवर्माला जवळ बोलावले आणि म्हटले - "बाळा, तुझ्या जन्मानंतर माझ्या व्यापारात खूप वाढ झाली, त्यामुळे मी तुझे नाव भाग्यवर्मा ठेवले. परंतु आता आपली सध्याची स्थिती अतिशय गंभीर आहे. आपल्याकडे जे होते ते सर्व आपण गमावले आहे. देव आपल्यावर इतका का निष्ठुर झाला आहे हे मला समजत नाही. कोणते पाप केले म्हणून ही शिक्षा भोगावी लागत आहे हेच मला कळत नाही. आणि आता माझा मृत्यूही अगदी जवळ आला आहे. तुला या जगात एकट्याला सोडून, अनाथ करून मी मरणाला सामोरा जाणार आहे. तुझ्या भविष्याची चिंता मला लागून राहिली आहे, खूप दुःखही होत आहे. पण काय करू? उपाय नाही." डोळ्यांत अश्रू आणि भरल्या कंठाने तो म्हणाला.
भाग्यवर्माने आपल्या वडिलांना धीर दिला आणि म्हणाला - "नारळात ज्याप्रमाणे पाणी येते, त्याप्रमाणे संपत्तीही येते. ती पाहता पाहता नाहीशीही होते. वादळ आले की पिकाची हानी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे अपार नुकसान होते. जर तो वरुणदेवावर आणि पृथ्वीवर नाराज होऊन काहीही न करता स्वस्थ बसला आणि शेती केली नाही, तर त्याचा उदरनिर्वाह कसा होईल? तो आपल्या कुटुंबियांना कसे सांभाळणार? हीच गोष्ट व्यापाराच्या संदर्भातही लागू पडते. व्यापारात नुकसान झाले तर व्यापाऱ्याने हताश होऊन स्वस्थ बसून चालणार नाही. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही मोठ्या प्रेमाने माझे नाव भाग्यवर्मा ठेवले. माझे नाव योग्य आहे की नाही हे भविष्य सांगेल. माझ्या प्रयत्नांना यश मिळो, असाच मला आशीर्वाद द्या."
आपल्या मुलाच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत रसीला म्हणाला, "बाळा, बघ, तू याच गावात राहून व्यापार केलाच पाहिजे असे नाही, आणि मी ज्याचा व्यापार केला, त्याचाच व्यापार तू करावा अशीही काही गरज नाही. तू तुला हव्या असलेल्या वस्तूंचा व्यापार करू शकतोस. सुरुवातीला मी तर लहान लहान जहाजांतून येणाऱ्या वस्तूंवर करवसुलीचे काम करत होतो. चक्रधर नावाचा माझा मित्र आहे, त्याला तू भेट. त्यानेच मला ती नोकरी दिली होती. तो तुला पण नोकरी देईल, ती नोकरी तू मन लावून कर. माझा आत्मा नेहमी तुझ्याबरोबर असेल."
रसीलाच्या मृत्यूनंतर भाग्यवर्मा चक्रधरला भेटला. त्याच्याजवळ छोट्या छोट्या अनेक नावा होत्या. व्यापारी लोक आपल्या वस्तू एका गावाहून दुसऱ्या गावी पोहोचवण्यासाठी आणि त्या विकण्यासाठी या नावांचा उपयोग करत असत. या विक्रीसाठी आलेल्या मालावर आणि विकून गेलेल्या वस्तूंवर कर वसूल केला जात असे, आणि तो वसूल करण्यासाठी काही लोकांना नियुक्त केले जात असे. वसूल केलेल्या रकमेतला काही हिस्सा सरकारी खजिन्यात भरला जात असे. हे सारे काम चक्रधर सांभाळत असे.
चक्रधरने भाग्यवर्माचे प्रेमाने स्वागत केले. तो म्हणाला, "मी यामध्ये जो थोडाफार नफा मिळाला, त्यातून काही नावा घेतल्या. तुझ्या वडिलांनीही अशीच जी कमाई केली, त्यातून व्यापार सुरू केला आणि मग मोठा व्यापारी झाला, आणि नंतर लाखों रुपये कमावले. अशा रीतीनेच आम्ही आमच्या जीवनात प्रगती केली. तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस, तुला ही छोटीशी नोकरी द्यायची माझी इच्छा नाही. तुला हवी असेल तेवढी संपत्ती मी तुला कर्ज म्हणून देतो, त्याचा उपयोग करून तू व्यापार सुरू कर आणि भरपूर धन कमव, आणि आपले वैभव पुन्हा मिळव. मी तुला सर्व प्रकारची मदत करेन."
हात जोडून भाग्यवर्मा नम्रपणे म्हणाला, "काका, तुमच्या या मदतीबद्दल मी अत्यंत आभारी आहे, पण मोठ्या लोकांनी सांगितले आहे की जिथे हरवले आहे तिथेच शोधावे. मी माझ्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करू इच्छितो. माझ्या वडिलांचा आशीर्वादच माझी मोठी संपत्ती आहे. माझी खात्री आहे की जी नोकरी करून माझे वडील मोठे व्यापारी झाले, तीच नोकरी मलाही जीवनात यश देईल. म्हणून तीच नोकरी तुम्ही मला द्या. तेच तुम्ही दिलेले कर्ज असे मी मानीन. तुमच्या मित्राचीही तीच इच्छा होती."
चक्रधरने भाग्यवर्माच्या इच्छेनुसार त्याला ती नोकरी दिली. असेच काही महिने लोटले. एक दिवस नावेवर तीन पेट्या आणल्या गेल्या. पेट्यांच्या मालकाने पेट्या उघडल्या आणि भाग्यवर्माला दाखवत म्हटले - "साहेब, या पेट्या रिकाम्या आहेत. नियमानुसार यांना कर द्यायला हवा, पण या पेट्या रिकाम्या असल्यामुळे त्यांच्यावर कर द्यायची गरज नाही असे मला वाटते."
भाग्यवर्माने पेट्यांची सूक्ष्मपणे परीक्षा केली आणि म्हटले - "या एकेका पेटीत तीन मण माल भरता येतो. आणि या पेट्या विकल्या तर भरपूर संपत्ती मिळू शकते."
पेट्यांचा मालक आर्त स्वरात म्हणाला, "कृपा करून मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. व्यापार करण्यासाठी खूप सारी सामग्री घेऊन व्यापाऱ्यांचा एक जथा जंगलातून जात होता. त्या जथ्यात मी एक नोकर होतो. जंगलात चोरांनी व्यापाऱ्यांचा सर्व माल लुटला. आम्ही सर्व जिवाची पर्वा न करता त्यांच्यावर तुटून पडलो, पण काही उपयोग झाला नाही. मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. गाढवाच्या पाठीवर बांधलेल्या या तीन पेट्या अस्ताव्यस्तपणे पडल्या होत्या. काही मूल्यवान वस्तू इकडे तिकडे पडली असेल म्हणून आशेने मी सर्वत्र शोधले, पण मला या रिकाम्या पेट्यांव्यतिरिक्त काही मिळाले नाही. वाटेत मी ऐकले की या तीन पेट्या गोपालननगरचा व्यापारी, रसीलाच्या आहेत, म्हणून मी या त्यांना परत द्यायला निघालो आहे. त्याचबरोबर ते मला कदाचित त्यांच्याकडे नोकरी देतील अशी आशा बाळगूनही मी तिकडे चाललो आहे. त्या पेट्या विकण्याचा माझा काही इरादा नाही."
हे सर्व ऐकून भाग्यवर्माला जरा उत्साह वाटला. याचा अर्थ असा की त्याच्या वडिलांच्या रिकाम्या पेट्या त्याला परत मिळाल्या आणि कुणास ठाऊक, यांच्यामुळे त्याचे भाग्य पुन्हा उजळेल. हा विचार मनात येताच तो त्या माणसाला म्हणाला, "मी त्यांचाच मुलगा आहे. तुझी इमानदारी मला आवडली. यापुढे मी तुला मदत करीन. माझ्या नशिबाने मला साथ दिली तर मी लवकरच व्यापार सुरू करेन आणि तुला माझा प्रामाणिक मदतनीस बनवीन."
पेट्या घेऊन तो चक्रधरजवळ गेला आणि म्हणाला, "जरी या माणसाने या पेट्या माझ्या वडिलांच्या म्हणून सांगितल्या तरी आपली अनुमती असल्याशिवाय मी त्यांना माझ्या म्हणणार नाही. तुम्हीच सांगा की त्या माझ्या कशा होतील?"
चक्रधरने पेट्या लक्षपूर्वक पाहिल्या आणि आनंदातिशयाने चुटकी वाजवत म्हटले - "खरंच, तुझ्या वडिलांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचा आत्मा सदैव तुझ्याबरोबरच असेल. त्यांचे म्हणणे अगदी खरे ठरले. तुझे वडील सोन्यासारख्या चमकणाऱ्या नकली दागिन्यांचा व्यापार करत असत. त्या ठेवण्यासाठीच त्यांनी या पेट्या बनवून घेतल्या होत्या. या प्रत्येक पेटीत तीन तीन सोन्याच्या गोट्या आहेत. देवी लक्ष्मीची कृपा सतत व्हावी म्हणून सोन्याची पूजा केली आणि त्या सोन्याच्या गोट्या करून त्या या पेट्यांत बसवल्या. त्यावर बसलेली धूळ बाजूला केलीस तर तुला दिसेल. त्या गोट्याच आज रक्षक बनून या पेट्यांना तुझ्याकडे घेऊन आल्या आहेत. देव तुझे भले करो."
भाग्यवर्माने त्या गोट्या काढायला लावल्या. त्या खरेच सोन्याच्या होत्या. चक्रधर म्हणाला, "तुझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे जिथून तू आपला व्यापार सुरू करावा म्हणून विचार करत होतास त्याच जागेवर तुला या पेट्या मिळाल्या. हे सोनेच तुझी आता संपत्ती आहे. आपल्या वडिलांसारखा तूही इथूनच व्यापार सुरू कर."
भाग्यवर्मा खुषीत म्हणाला, "माझ्या वडिलांनी आशीर्वाद देताना म्हटले होते की माझा आत्मा सदैव तुझ्याजवळ राहील. या माणसाच्या रूपाने या पेट्यांबरोबर ते माझ्याजवळ आहेत. त्यांच्या नावावरच मी व्यापार सुरू करतो. खरंच, नशिबाने मला साथ दिली आहे."
भाग्यवर्माने व्यापार सुरू केला. दोन तीन वर्षांतच तो एक मोठा व्यापारी झाला. चक्रधर त्याच्या व्यापारी कौशल्यावर खूप खूश होता. लवकरच त्याने आपल्या मुलीचा विवाह त्याच्याबरोबर केला. भाग्यवर्माने त्या मदतनीसाला आपल्या वडिलांसमान मान दिला. आता दोघेही सुखाने राहू लागले. त्यांचे नशीब उजळले.