Bookstruck

नारळ चोरणारा चोर

एका गावात जुगल किशोर नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याने एका मगन नावाच्या तरुण मुलाला माळघ्याच्या कामाकरिता महिना ४ रु. पगार ठरवून आपल्या जागेत एक बाग लावली. त्या बागेत बरीच केळी, आंबे, नारळ यांची झाडे लावली. भाजीपाला लावला. हळूहळू बागेत फळभाज्या फोफावू लागल्या. त्यामुळे मगनने दोन रुपये पगारात वाढ मागितली. "अरे इतक्या लगेच कसे पैसे वाढवून मागतोस! घाई करू नकोस! जरा नारळाला नारळ तरी लागू देत, मग पाहतो!" जुगल म्हणाला. काही दिवसांनी नारळाला खूप मोहोर आला तेव्हा त्याने मालकाकडे हट्टच केला की आता तरी पैसे वाढवून द्या. "अरे जा रे जा! आता बागेत तुला करण्यासारखे काही काम तरी राहिले आहे का? आता तर एक पैसा सुद्धा भर मिळणार नाही. तुला पाहिजे तर काम कर नाहीतर चालू लाग," मालक गर्वाने म्हणाला. मगनला खराच पेच पडला कारण बागेत जेवढे काम होते ते त्याने सर्व संपवले होते. ही गोष्ट माहित पडताच मालकाने आपले म्हणणे हाणून पाडले. आजपर्यंत मगन मेहनतीने बागेत राबून काम करत होता. त्याच्या मनाने आता बागेत चोरी करण्याचा निश्चय केला. तो रोज रात्री बागेतून दोन नारळ तोडून नेऊ लागला. तीन दिवसाने जुगलला कळले की, बागेतील नारळांची चोरी होत आहे. परंतु त्याला चोराचा शोध लागला नाही. त्याने मगनला विचारले की तू तर नारळ चोरून नेत नाहीस ना! तेव्हा त्याने आपल्याला काही एक माहित नसल्याचे स्पष्ट सांगितले. "ठीक आहे, तर तू एक काम कर. रात्रीच्या वेळी बागेत पहारा देण्याचे व चोराला पकडून देण्याचे काम कर," जुगलकिशोरने त्याला बिनविले. "साहेब, आपण माझा पगार दोन रुपये वाढवून द्या. मी रात्री पहारा देण्याचे व चोराला पकडून देण्याचे काम नक्की करतो," मगनने उत्तर देत म्हटले. "ते काही चालायचे नाही! मी स्वतःच रात्री पहारा देतो," असे म्हणत जुगल किशोर देवळात जायला निघाला. देवळात पोहोचताच त्याने देवाला सांकडे घातले की, "देवीमाते, नारळाची चोरी करणाऱ्याला जर माझ्या दृष्टीस घालशील तर तुला एका बकरीचा बळी देईन." असे म्हणत त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्याचवेळी मगन सुद्धा देवळात देवीचे दर्शन घेण्याकरिता आला होता. त्याने भिंतीआड लपून मालकाचा नवस ऐकला व मालक निघून जाताच देवीला साष्टांग नमस्कार करीत म्हणाला- "देवी मला माझ्या मालकाच्या नजरेपासून वाचवशील तर तुला मी एका कोंबडाचा बळी देईन." त्याच दिवशी मगन अर्ध्या रात्र उलटल्यावर बागेत शिरून विहिरी आडच्या एका नारळाच्या झाडावर चढला व एक नारळ तोडून त्याने दूर भिरकावला. त्याने असा विचार करून नारळ लांब फेकला की, जर मालक खरोखरच बागेत चोराच्या शोधाकरिता जागा असला तर नारळाच्या आवाजाने तो नारळ पडेल तिथे जाईल. परंतु दुर्दैवाने जुगलकिशोरने आधीच नारळाच्या झाडावर कोणीतरी चढत असताना पाहिले होते. त्यामुळे तो काठी व दोरी घेऊन मगन चढला होता त्या झाडाखाली आला व जोरात ओरडून म्हणाला- "अरे हरामखोर चोरा मला असा धोका देत होतास का? खाली उतर, तुला याच झाडाला बांधून तुझी चामडी सोलतो बघ!" मगन भयाने थरथर कांपू लागला व झाडावरच गुपचूप बसून राहला. त्याचक्षणी झाडावरून कोणी तरी धप्प आवाजाबरोबर विहीर पडलेला त्याला दिसला. "अरे चोरा माझ्या डोळ्यात धूळ फेकून विहिरीत उडी मारून माझ्यापासून पळून जायला पाहतोस काय? मी एक निष्णात पोहणारा आहे. असे म्हणत जुगलने विहिरीत उडी मारली. त्याला कोणाचे तरी डोके हाताला लागले परंतु त्याला ते पकडता आले नाही. चोराची चलाख बुद्धी पाहून त्याला अत्यंत अचंबा वाटला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जुगल त्या गावदेवीच्या देवळात आला व देवीची प्रार्थना करीत म्हणाला- "हे देवी माते, तू मला धोका दिलास चोर माझ्या हातात यायच्या ऐवजी सुटून पळून गेला. मी तुला बकरीचा बळी देणार नाही." "तू चोर दृष्टोस घालण्याची मला प्रार्थना केलीस मी तुला चोर दाखवून दिला. तू तुझ्या नोकराला सुद्धा दोन रुपये वाढवून न देणारा एक महाकंजूस आहेस. असे असतांना तू मला काय बकरीचा बळी देऊ करणार रे? काय ह्यावर मी विश्वास ठेवू?" देवीने पुजाऱ्याच्या तोंडी आपले म्हणणे त्याला बोलून दाखविले. देवीचे बोलणे ऐकल्यावर जुगलच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने त्याच दिवशी मगनचा पगार वाढवून दिला त्यानंतर त्यांच्या बागेत पुन्हा कधी चोरी झाली नाही.