नियमभंग करणारा
नियमभंग करणारा
विंध्य पर्वताच्या प्रदेशात एका सरोवराच्या काठी एक गुरुकुल होते. मातंगस्वामी नावाचे एक विद्वान गुरु ते गुरुकुल चालवीत असत. त्यांच्या गुरुकुलात मोठमोठ्या श्रीमंतांची मुले विद्याभ्यास करीत. त्यांच्यात विरूप नावाचा एक मुलगा होता. तो त्या देशाच्या राजाच्या मेहुण्याचा मुलगा होता.
विरूप हा थोडा खोडकर व खट्याळ मुलगा होता. गुरुकुलातली शिस्त व नियम मोडण्यातच त्याला एक तऱ्हेचा आनंद वाटे. मातंगस्वामींचा उजवा पाय थोडा लंगडा होता. ते पाहून विरूप आपल्या मित्रांना गुरुजींची थट्टा करी. सहपाठी त्याला 'पंगुस्वामी' म्हणून हाक मारत. काही दिवसांनी ती गोष्ट मातंगस्वामींना सुद्धा कळली.
एके दिवशी मातंगस्वामींनी त्या दिवसाचा अभ्यास संपल्यावर मुलांना एक गोष्ट सांगितली, ती अशी:
"गोष्टीला होऊन सुमारे पन्नास वर्षे झाली असतील. या सरोवराच्या पलीकडच्या तीरावर भैरवानंद नावाचे एक विद्वान गुरु एक गुरुकुल चालवीत असत. त्यांना षडशास्त्रांतील पांडित्याबरोबर मंत्रशास्त्रातही चांगली गती होती. विद्याभ्यास पुरा करून विद्यार्थी जाऊ लागले, तर त्यातील कोणी इच्छा व्यक्त केली तर भैरवानंद त्या विद्यार्थ्यांना मंत्र-तंत्र सुद्धा शिकवीत असत.
एकदा सुभान आणि मातंग नावाच्या दोघा विद्यार्थ्यांनी शिक्षण संपल्यावर मंत्रशास्त्रात थोडा प्रवेश करून देता का, म्हणून गुरुजींना विचारले. भैरवानंदांनी आनंदाने ते कबूल केले आणि त्यांना एक मंत्र शिकविला. नंतर त्यांनी त्यांना बजावून सांगितले— 'बाबांनो! तुम्हाला हा मंत्र म्हटला तर वाटेल ते रूप घेता येईल. मात्र एक दोन नियमांचे कडकपणे पालन केले पाहिजे. अगदी अत्यावश्यक असेल अशाच वेळी या मंत्राचा उपयोग करावा. फक्त मंत्रशक्तीची परीक्षा घेण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी या मंत्राचा उपयोग करता कामा नये. कोणत्याही कारणाने अंगात काही व्यंग आले तर या मंत्राचा उपयोग होणार नाही.'
दोघा शिष्यांनी गुरुजवळ तो मंत्र शिकून घेतला आणि राजदरबारात नोकरी मिळावी म्हणून राजधानीच्या शहराच्या वाटेने निघाले. वाटेत एक नदी होती. ती पार करून जायचे म्हणजे एक तरी होती. परंतु नाववाला पलीकडच्या तीरावर गेला होता. तो परत या तीरावर आल्याशिवाय तरीत बसून नदी पार जाणे शक्य नव्हते.
तेव्हा मातंग सुभानला म्हणाला— 'त्या काठावर पुरेसे प्रवासी जमेपर्यंत तो नाववाला काही निघणार नाही. आपल्या गुरुजींनी शिकविलेला मंत्र आहे ना, आपण माशाचे रूप घेऊन पैलतिरी जाऊ या!'
'परंतु गुरुजींनी आपल्याला बजावून एक नियम सांगितला आहे ना, की फक्त परीक्षा म्हणून मंत्राचा उपयोग करू नये!' सुभानने आठवण करून दिली.
त्या नियमावर चिडून जाऊन मातंग म्हणाला— 'तर मग तू तर येईपर्यंत थांब. मी मासा होऊन पलीकडे जातो.' असे सांगून तो माशाचे रूप घेऊन पैलतिरी गेला.
काही वेळाने सुभान नावेत बसून पलीकडे जाऊन मातंगला भेटला. तिथून चालत राजधानीपर्यंत जाणं मातंगच्या जिवावर आलं. तो सुभानला म्हणाला— 'काय रे, आपण एखाद्या पक्षाचे रूप घेऊन राजधानीपर्यंत उडत गेलो तर? काय ठीक होईल ना?'
सुभानला ते बरोबर वाटले नाही. मातंगने त्याला मूर्ख, अविवेकी मानले आणि मंत्र म्हणून कबुतराच्या रूपे आकाशात उडू लागला. कबूतर होऊन तो बराच वेळ उडत राहिल्यावर थोडा दम घ्यायला एका झाडाच्या फांदीवर उतरून बसला. त्याच वेळी आकाशातून एक ससाणा उडत जात होता. त्याला ते कबूतर दिसले. त्याने जोराने झडप मारली आणि आपल्या पंजात धरून पुन्हा आकाशात उडू लागला. ससाण्याच्या तोंडातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मातंग परत माणसाच्या रूपे प्रगटला.
आपल्या पंजात साप असलेले कबूतर माणूस झालेले पाहून ससाणा घाबरला आणि त्याने पंजे ढिले केले. म्हणून फार उंचावरून खाली जमिनीवर एका झुडपावर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला असला तरी अंगाला पुष्कळ लागले आणि उजवा पाय मोडला.
वाटेने जाणाऱ्या काही तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांनी त्याला पाहिले. त्यांच्या मदतीने मातंग काही दिवसांनी गुरु भैरवानंद यांच्या गुरुकुलात येऊन पोचला. त्याने जे घडले ते सर्व गुरूला सांगितले व फार दु:खी झाला. भैरवानंदांनी त्याचे सांत्वन केले व त्याचे औषधपाणी केले. त्यामुळे जखम भरून आली तरी मातंगचा लंगडेपणा कायम राहिला. शिवाय गुरूने दिलेला मंत्र कायमचा निरुपयोगी झाला. सुभानला मात्र राजदरबारात नोकरी मिळाली. तो राज्याचा मुख्य शिक्षणाधिकारी झाला.
मातंगस्वामी कथा संपल्याचे सांगून म्हणाले— 'गुरूने घातलेला नियम भंग केल्याने मातंग कायमचा लंगडा झाला आणि मंत्राने लाभलेली अपूर्व शक्ती कायमची घालवून बसला. तो मातंग मीच मातंगस्वामी म्हणून तुम्हाला आज शिकवितो आहे. गुरुभक्ती नसलेल्या शिष्याला कधीच विद्या लाभत नाही.' असे सांगत मातंगस्वामी लंगडत लंगडत आपल्या कुटीरात गेले.
त्या दिवसापासून विरूपने गुरुकुलाच्या एकाही नियमाचे उल्लंघन केले नाही. मातंगस्वामींची 'लंगडेस्वामी' म्हणून कधी पुढे थट्टा सहपाठ्यांसमोर केली नाही.