Bookstruck

नीतिमान्

काशीराजा ब्रम्हदत्त याचा पुत्र म्हणून बोधिसत्त्वांनी जन्म घेतला. ब्रम्हदत्ताने त्यांचे नांव शीलवान ठेवले. शीलवानने राजाला उचित अशा विद्यांचे शिक्षण घेतले. धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला आणि मोठेपणी तो काशीराज्याचा राजा बनला. तो प्रजेला आपली मुले मानीत असे. प्रजेवर त्याचे फार प्रेम होते, प्रजाजनांचा तो आदर करीत असे. गुन्हेगारांना तो दयेने वागवीत असे व त्यांची जीवनशैली सुधारावी म्हणून खूप प्रयत्न करीत असे. दारिद्र्य व अज्ञान, या कारणांमुळे जे चोरी करीत होते, त्यांना तो कडक शिक्षा देत नव्हता. उलट त्यांना जवळ बोलावून घेत होता. जरूर पडल्यास त्यांना पैशाची मदत करून, त्यांना उपदेशाचे चार शब्द सांगून, घरी परत धाडत असे. यामुळे त्याच्या राज्यात गुन्हेगारांची संख्या कमी होत गेली व प्रजेत एकमेकांविषयी आदराची भावना व श्रद्धा वाढत गेली. कोसल देश हा काशीराज्याच्या जवळचाच देश होता. त्या देशाच्या मंत्र्याला काशीराजाचा चांगुलपणा हा त्याचा दोष वाटायला लागला. त्याला वाटलं की काशीराज्य सहजपणे जिंकता येईल. त्याने आपल्या राजाला सांगितलं, "काशीचा राजा शीलवान हा अतिशय दुर्बल आहे. चोर, खुनी, यांना तो शिक्षा करीत नाही. असल्या भेदरट राजाला आपण नक्कीच धूळ चारूं शकूं." कोसल राजाचा मंत्र्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याने आपल्या कांही सैनिकांना बोलावून सांगितले, "तुम्ही काशी राज्यांत प्रवेश करा आणि त्यांची गांवें लुटा." जेव्हां कोसलचे सैनिक काशीराज्याच्या गांवात शिरले व त्यांनी हल्ला केला, तेव्हा तिथल्या जनतेने त्यांचा प्रतिकार केला, त्यांना पकडले आणि शीलवान राजाकडे नेले. "तुम्ही परदेशी दिसता. आमच्या गांवावर तुम्ही हल्ला कां केलात?" शीलवानने त्यांना विचारले. "महाराज, पोटासाठी आम्हाला ते करावे लागले." कोसल सैनिकांनी सांगितले. "तुम्ही जर इतके उपाशी असाल तर माझ्याकडे मागायला यायचंत!" असं म्हणून राजाने त्यांना कांही धन दिले व परत धाडले. शीलवानचे हे कृत्य पाहून कोसलराजाला आश्चर्य वाटले आणि पुन्हा एकदा शीलवानची परीक्षा घेण्यासाठी त्याने जास्ती सैनिक पाठवले. जेव्हां ते सरहद्द ओलांडून काशीराज्यांत शिरले, तेव्हा तिथल्या जनतेने त्यांना थांबवले आणि पकडून राजासमोर नेले. पण राजाने त्यांना शिक्षा केली नाही. थोडे धन देऊन परत पाठवले. आता मात्र, कोसलराजाला वाटले की काशीराजा खरंच बावळट व दुर्बल आहे व त्याच्यावर विजय मिळवणे सहज शक्य आहे. तो मोठी सेना घेऊन काशीराज्यावर चालून गेला. ही बातमी काशीच्या मंत्र्यांना व सेनाधिकाऱ्यांना जेव्हां त्यांच्या हेरांमार्फत समजली, तेव्हा ते शीलवान राजापाशी जाऊन काळजीच्या स्वरांत राजाला म्हणाले, "महाराज, कोसलराजाला आपल्या बळाची कल्पना नाही. त्यांच्याशी सामना करण्याची आज्ञा द्यावी, आम्ही त्यांचा पाडाव करूं." शीलवान युद्धाला राजी नव्हता. त्याने विचार करून शांतपणे म्हटले, "विनाकारण रक्तपात नको. त्यांना काशीराज्यच हवं असेल, तर येऊं दे. किल्ल्यांची दारे उघडून त्यांना आंत येऊं द्या." काशीराजाने एका दूतामार्फत संदेश पाठवला. "शत्रू म्हणून यायची आवश्यकता नाही. तुम्ही मित्र बनून या!" कोसलराजा मोठ्या उत्साहाने काशीराज्यांत घुसला. राजशिष्टाचारांचा भंग करीत तो सैनिकांसह राजसभेत शिरला. आणि आंत येऊन त्याने काशीराजा व मंत्र्यांना दोरखंडाने बांधण्याची आज्ञा दिली. "अतिथीने असे वागणे योग्य ठरत नाही" काशीराजा म्हणाला. त्यावर कोसलराजाला हसू आवरेना. बघता बघता त्याच्या सैनिकांनी शीलवान व त्याच्या मंत्र्यांना बांधले आणि त्यांची राजचिन्न्हे ओढून काढली. शीलवान व त्याचे मंत्री काशीराज्य सोडून निघून गेले. ते अरण्यांतून जात होते. रात्र झाली तशी ते विश्रांतीसाठी झाडाखाली झोपले. त्या रात्री त्यांनी भोजनही केलेले नव्हते. मध्यरात्री कांहीतरी गडबड झाल्याचा आवाज आला आणि त्यांची झोप मोडली. त्यांनी उठून पाहिले तर कांही लुटारू मशाल हातांत घेऊन उभे होते. लुटारूंनी शीलवानला नम्रपणे म्हटलं, "महाराज, आम्ही चोर आहोत. आपण दया दाखवलीत म्हणून आम्ही आजपर्यंत चोरी न करता शांतपणे जगत होतो. पण आता आमचे हाल सुरु होतील. म्हणून आम्ही रात्रीच राजवाड्यांत घुसलो आणि ही संपत्ती तिथून लुटून आणली. ही घ्या, आपले हे पोशाख, राजचिन्हे आणि तलवारी! आम्ही आपल्यासाठी भोजनही आणले आहे. प्रथम आपण ही राजवस्त्रे नेसावीत, भोजन करावे आणि या संपत्तीचे आता काय करायचे त्याविषयी आज्ञा करावी." शीलवान व मंत्र्यांनी ती वस्त्रे नेसली व भोजनही केले. नंतर शीलवान त्यांना म्हणाला, "तुमच्या अडचणी कसल्या आहेत, हे नवीन राजाला समजले पाहिजे. ते तुमच्यासाठी कांहीतरी चांगला निर्णय घेतील याची मला खात्री आहे. पण त्यांच्यासाठी तुम्ही ही संपत्ती लुटलीत, हे मात्र चांगले झाले नाही. हे धन घेऊन राजाला नेऊन द्या, आणि ते तुमच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत ते विचारा." "तो राजा नाही, दरोडेखोर आहे. त्याने आपले राज्य लुबाडले. आमचा त्याच्यावर विश्वास नाही. महाराज, कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. आमचे महाराज आपणच आहात आणि नेहमीच असाल." चोरांनी सांगितले. पहाटेच निघून काशीराजा मंत्र्यांबरोबर राजसभेत पोचला. शीलवानला तिथे पाहून कोसलराजाला कांही सुचेना. तो अवाक् झाला. जे घडलं ते सविस्तर सांगून शीलवान म्हणाला, "महाराज, माझ्यापेक्षा आपण जास्त चांगल्याप्रकारे राज्य चालवाल, म्हणून आपण मला माझ्या राज्यांतून काढलंत आणि माझ्या सिंहासनावर बसलात. हे बिचारे पूर्वी चोरी करीत होते. त्यांना सत्य काय ठाऊक नव्हते, म्हणून त्यांनी रात्री आपला खजिना लुटला. आपल्या राज्यांत त्यांचे हाल होतील अशी त्यांना भीती वाटते. आपण त्यांच्या समस्येचे योग्य ते निराकरण कराल असे मी त्यांना आश्वासन दिलेले आहे. उनके सोबत आपली संपत्ती आपल्याकडे सुपूर्द करण्यासाठी मी इथे आलो आहे. या राज्यांत यापेक्षां मी जास्त काय करूं शकणार?" शीलवानचे शब्द ऐकून राजाचे एकदम हृदयपरिवर्तन झाले. तो चटकन सिंहासनावरून खाली उतरला आणि शीलवानच्या पायांवर त्याने डोके ठेवले. तो शरमून म्हणाला, "महात्मा, आपण महान आहात. चोरांनादेखील आपण प्रिय आहात. आपण असाधारण व्यक्ती आहात, याचा यापेक्षां दुसरा कोणता सबळ पुरावा हवा? माझ्याहातून पाप घडलं. मला क्षमा करावी. माझ्या दुष्ट मंत्र्याने मला चुकीची माहिती दिली. आपण आपले राज्य घ्यावे. आपल्या राज्यांत प्रजा सुखी आहे आणि त्यांना न्याय मिळतो. मला फक्त आपली मैत्री हवी आहे, आपले राज्य नको!" शीलवान पुन्हा त्या गादीवर बसला आणि कोसलराजाला त्याने सन्मानाने परत पाठवले.