नुपूरांची छमछम
जयंत गंगबर जमीनदाराच्या कचेरीत काम करीत होता. तो फार हुशार व सुस्वभावी होता. म्हणून कचेरीत लागल्यानंतर थोड्याच दिवसांत त्याने चांगले नाव कमावले. प्रथम त्याचे आई-वडील ललितपुरात राहात होते. त्याला नोकरी लागल्यावर तेही गंगबरला आले व मुलाबरोबर राहू लागले. शहरात असला तरी जयंतला आपल्या गावाची आठवण येत होती. त्याची तिथल्या मित्रांशी मैत्री कायम होती. संधी मिळेल तेव्हा तो त्यांना भेटायला जात असे.
दिवाळीच्या सणानिमित्त जयंत काही दिवस ललितपूरला राहायला आला. महेंद्र, शिवदास, गुणशेखर आणि मनोहर हे त्याचे जानी दोस्त होते. तो गावी आल्यामुळे ते बेहद खूश झाले. त्यांची घरे एकमेकांशेजारीच होती. जयंत चार दिवस राहणार होता, म्हणून त्याने एकेक दिवस प्रत्येक मित्राकडे राहायचे ठरवले.
पहिल्या दिवशी जयंत महेंद्रच्या घरी राहिला. जेवण झाल्यानंतर हे मित्र लहानपणीच्या आठवणींत रंगले होते. गावातल्या गप्पा व देशातली राजकीय परिस्थिती यांचीही चर्चा झाली, त्यानंतर इतर तिघे आपापल्या घरी गेले. रात्री झोपण्यापूर्वी महेंद्रने अत्यंत भक्तीभावाने हनुमानाचे स्मरण केले व हनुमान चालिसाचे पठण केले. जयंत हसत म्हणाला, "अरे वा, तुझी देवभक्ती बरीच वाढलीय. बैरागी वगैरे होण्याचा बेत नाही ना?"
"नाही रे, एकूण वातावरणात भीती वाढते आहे. म्हणून रक्षण करण्यासाठी हनुमानाची प्रार्थना मी करतो, तो संकटमोचन आहे ना?" महेंद्र म्हणाला.
"का?" जयंतने विचारले.
"ती एक मोठी कथा आहे. रात्र फार झालीय, झोप आता." असं म्हणून महेंद्रने विषय टाळला व कारण सांगितले नाही. जयंत काही न बोलता झोपी गेला.
मध्यरात्रीनंतर जयंतला जाग आली. त्याला नुपूरांचा 'छमछम' असा मंद आवाज ऐकू आला. त्याने वळून पाहिले तर महेंद्रने पांघरूण ओढून घेतले होते, तो भीतीने थरथर कापत होता आणि काहीतरी मंत्र पुटपुटत होता. थोड्याच वेळात नुपूरांची छमछम बंद झाली.
सकाळी जयंतने महेंद्रला त्या आवाजाबद्दल विचारले.
"तुलासुद्धा तो आवाज ऐकू आला का? काय सांगू? एक महिना झाला, ही कामिनी डाकीण इथे तिथे फिरत असते. घर सोडूनही जाता येत नाही. स्वतःचे घर सोडून कसं जाणार? त्या डाकिणीपासून सुटका व्हावी म्हणून मांत्रिकाची मदत घेतली. गंडादोरा बांधला. त्यासाठी भरपूर खर्च केला. पण काहीही उपयोग झाला नाही."
"अरे मित्रा, हल्लीच्या या दिवसांतदेखील तू भूत, पिशाच्च यांच्यावर विश्वास ठेवतोस?" जयंतने आश्चर्याने विचारले.
"अरे, नाहीतर काय करू? जेव्हापासून त्या नुपूरांचा आवाज कानावर येऊ लागला, तेव्हापासून घरामध्ये सगळं काही अशुभ होऊ लागलंय." महेंद्र म्हणाला. "पण याबाबतीत तू आपल्या मित्रांशी काही बोलला नाहीस का? त्यांनी काहीतरी उपाय सुचवला असता. ही काय गडबड आहे त्याचा उलगडा झाला असता." जयंतने विचारले.
"याबाबतीत त्यांना काही सांगितलं तर ते मलाच अंधश्रद्धाळू, गावंढळ, जुनाट वगैरे म्हणतील आणि माझी टिंगल करतील, म्हणून मी गप्प बसलो." महेंद्र म्हणाला.
दुसऱ्या दिवशी जयंत शिवदासच्या घरी राहिला. त्या रात्रीदेखील त्याला नुपूरांची छमछम ऐकू आली. इथे तो आवाज जरा मोठा वाटत होता. दुसऱ्या दिवशी जयंतने याबद्दल शिवदासला जेव्हा विचारले, तेव्हा शिवदासने उत्तर दिले, "मोठ्याने बोलू नकोस. या आवाजाबद्दल मी देवळातल्या पुजाऱ्यांजवळ बोललो, तर ते म्हणाले की ही छमछम महालक्ष्मीची आहे आणि ती घरात प्रवेश करायला काचकूच करते आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी खास पूजा व खर्चिक अर्चना केल्या आहेत."
त्यावर जयंत काहीच बोलला नाही. "काही झालं तरी ही गोष्ट आपल्या मित्रांना मात्र सांगू नकोस हं!" एखादे गुपित सांगावे अशा थाटात शिवदास बोलला.
तिसरी रात्र जयंतने गुणशेखरच्या घरी घालवली. त्या रात्री तो नुपूरांचा छमछम आवाज जरा मोठ्याने ऐकू येत होता. जयंतने बघितलं तर गुणशेखरही जागाच होता. जयंतने विचारलं, "नुपूरांचा आवाज ऐकू येतोय ना?"
"हो, अरे, काही दिवसांपासून मीही हा आवाज ऐकतोय. आमच्या घराच्या मागच्या अंगणातल्या जमिनीत गुप्तधन आहे. ते बाहेर येण्यासाठी धडपडते आहे. हा त्याचाच आवाज आहे. म्हणून मी रोज मागच्या अंगणात थोडेफार खणतो. पण अजून ते काही सापडलेले नाही. पण हे मात्र कुणालाच सांगू नकोस." गुणशेखरने हळू आवाजात सांगितले.
जयंत पडल्या पडल्या विचार करीत होता. त्याच्या मित्रांनी या आवाजाची जी कारणे सांगितली, ती काही खरी नव्हती, पण त्याच्यामागे काहीतरी वेगळेच कारण असावे असे जयंतला वाटले. प्रत्येकाने आपापल्या स्वभावानुसार काहीतरी अनुमान काढले होते, खरं काय असेल ते पाहण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नव्हता.
चौथ्या दिवशी जयंत मनोहरच्या घरी राहिला, तेव्हा त्या रात्री तर नुपूरांची छमछम फारच जवळून ऐकू येत होती. जयंतने पाहिले तर जेव्हा आवाज आला तेव्हा मनोहर शेजारच्या खोलीत गेला होता. थोड्या वेळानंतर छमछम आवाज बंद झाला. मनोहर परत आला आणि निमूटपणे पलंगावर झोपला.
सकाळी जयंतने मनोहरला नुपूरांच्या त्या छमछम आवाजाबद्दल विचारले, तेव्हा मनोहरने खाली मान घालून सांगितले, "तुला तर ठाऊक आहे की माझं नुकतंच लग्न झालंय. माझ्या बायकोला झोपेत चालण्याचा आजार आहे. आता रोज मी जागा राहून तिच्यावर काही रात्रभर लक्ष ठेवू शकणार नाही. म्हणून मीच तिच्या पायांत नुपूर बांधण्याची युक्ती केली. जेव्हा ती झोपेत चालायला लागते, तेव्हा त्या नुपूरांच्या आवाजाने मी जागा होतो. मी उठून तिला परत घेऊन येतो आणि तिला पलंगावर झोपवतो. एकदा ती झोपली की मग मात्र पुन्हा उठत नाही."
"पण मग तुझ्या बायकोच्या नुपूरांचा आवाज दिवसा कसा ऐकायला येत नाही?" जयंतने शंका व्यक्त केली.
"तिला पायांत नुपूर, साखळ्या घालायला मुळीच आवडत नाही. म्हणून ती झोपली की नंतरच मी तिच्या पायांत नुपूर बांधतो आणि ती उठण्यापूर्वी ते काढून ठेवतो. आताच तर आमचं लग्न झालंय. हळूहळू तिला समजावून सांगेन आणि मग तिला नुपूर घालण्याची सवय करायला लावीन." मनोहर म्हणाला.
नुपूरांच्या छमछम आवाजाचे रहस्य आता उलगडले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण एकत्र भेटले, तेव्हा जयंतने त्यांना सांगितले, "तुम्ही जो आवाज ऐकलात, तो ना कामिनी पिशाच्चाचा होता, ना महालक्ष्मीचा होता. तो होता मनोहरच्या पत्नीच्या पायांतल्या नुपूरांचा! आता तरी तुम्ही आंधळेपणाने उगीच पैसे खर्च करू नका. पुन्हा असा काही प्रसंग ओढवलाच, तर तर्कशुद्ध व संगतवार विचार अगोदर करा आणि नंतर त्यावर उपाय करा. आता निवांत व शांत मनाने तुम्हाला जगता येईल."
आपल्या अविचारीपणाबद्दल त्याचे मित्र शर्मिंदे झाले होते. पण नंतर मात्र एकमेकांकडे बघितल्यावर त्यांना हसू आवरेना.