Bookstruck

नुसता गोंधळ

विद्यावती आळशी नव्हती, परंतु तिला कोणतेही काम करावयाचे झाले की ती गोंधळून जाई. तिला वाटे की तिला एक डोंगरच उचलावा लागणार आहे. तिचा नवरा राजाच्या पदरी नोकरी करीत असे. सकाळी कामावर जाई तो रात्रीच परत येई. तो कामावर गेल्याबरोबर ती आपल्या शेजारपाजारच्या घरी गप्पा मारायला निघून जाई. ती आली म्हणजे सर्वांना गप्पा मारायला बरं वाटे. ती आली म्हणजे सर्व बायका तिला "बसा हो, काय घाई आहे" म्हणत आणि आग्रहाने बसवून घेत. "कसं बसा म्हणता हो? ते येतील त्याच्या आधी स्वयंपाक नको का करायला?" असे सांगून तिच्या डोक्यावर जणू काही फार मोठे काम येऊन पडल्याचा आव आणून ती बोले. "स्वयंपाक काय हो? तुम्ही दोघंच की!" असं म्हणत एक बाई तिला वाटीभर भाजी देई, दुसरी एकादी चटणी देई. तरी नवरा यायच्या आधी भात उकडणे तरी शक्य होईल का, असं तिला वाटे आणि नवरा आला की त्याच्या मदतीने तिचे काम पुरे होई. कोणी तिला मदतीला बोलाविले की म्हणे— "अहो, आज त्यांचे कपडे धुवायचे आहेत हो!" म्हणून किंवा अजून भांडी-कुंडी घासली नाहीत म्हणून सांगे. सर्वांना तिच्या स्वभावाची चांगली ओळख झाली असल्याने कोणी तिला मदतीला बोलावीत नसे की तिच्या मदतीला जात नसे. विद्यावतीला दोन नणदा होत्या. दोघींची लग्ने झाली होती व त्या सासरी नांदत होत्या. विद्यावतीच्या नवऱ्याचे बहिणींवर फार प्रेम होते. दोघींना भुईमुगाचे दाणे आणि लाह्या फार आवडत. त्यांच्या सासरच्या गावी त्या दोन वस्तू मिळत नसत. विद्यावतीचा नवरा बहिणींसाठी एक डबा भरून शेंगा आणि एक डबाभर भात घेऊन आला आणि बायकोला म्हणाला— "माझ्या बहिणी येणार आहेत. त्या यायच्या आत तू या शेंगा सोलून आणि या भाताच्या लाह्या करून ठेव. त्या आल्यावर तुझ्या कामसूत्त्वाची प्रशंसा करतील व आमची वहिनी किती मायेची आहे, म्हणतील. नुसती बसून तर असतेस, एवढे काम तरी तू कर!" विद्यावतीने होकार दिला खरा, परंतु केवढे मोठे कामाचे ओझे डोक्यावर येऊन पडल्यासारखे तिला वाटले. त्या कामाचीच गोष्ट तिला गोंधळून जायला पुरली. कोणाच्या घरी गेली की ती म्हणे— "माझ्या नणदा येणार आहेत हो. डबाभर शेंगा निवडावयाच्या व भाजून ठेवावयाच्या आहेत. डबाभर भाताच्या लाह्या करावयाच्या आहेत." ती कोणाला कधी मदत करीत नसे म्हणून कोणी मदतीला यायला उत्साह दाखविला नाही. दररोज हे काम आज सुरू करावयाचे आहे असा ती विचार करी व कामाला हात घालण्याऐजी केवढं काम आहे हो, असा विचार करून हिम्मत हारून बसे. "केवढं काम आहे बाई! सुरू केले तर होऊन जाईल म्हणा!" असा विचार करी आणि गप्पा मारायला शेजारी पाजारी निघून जाई. परंतु स्वस्थपणे कोठेही बसत नसे. सर्वांना सांगत सुटे की नणदा येणार आहेत व केवढी कामे पडलेली आहेत! नणदा यायला आणखी आठ-दहा दिवसच उरले आहेत असा विचार करून विद्यावतीने कोणाच्या घरी बसायला जायचे बंद केले. बिचारीच्या डोक्यावर केवढी कामे येऊन पडली आहेत, म्हणून सर्व मैत्रिणी तिच्यावर कीव करीत. काही जणींना ती आली म्हणजे वेळ जायला बरे वाटत असे, म्हणून त्या तिला बोलवायला जात. परंतु विद्यावती कामाच्या गर्दीत आहे असे दाखवून त्यांना अंगणातूनच निरोप देई. एके दिवशी दुपारी एक गारुडी आला. गल्लीतल्या सर्व बायका गंमत पाहायला धावल्या, परंतु विद्यावती त्या बाजूला फिरकलीसुद्धा नाही. "अहो, माझ्या नणदा यायच्या आहेत ना, पुष्कळ कामे आहेत." ती म्हणाली. त्याचप्रमाणे काशीहून एक कासार आला किंवा कांचीपुराहून कोणी रेशमी लुगडी घेऊन आला तरी त्याच्याशी बोलायला किंवा भाव करायला सुद्धा विद्यावती घराबाहेर येत नव्हती. "नणदा येणार आहेत आणि एका क्षणभराची ही फुरसत नाही हो" असे सांगून सर्वांना पाठवून देई. नणदा बऱ्याच डोईजड असल्या पाहिजेत तर, असे सर्वांना वाटे. तिच्या नणदा कशा आहेत, पाहिलं पाहिजे बाई, असा विचार करून त्या केव्हा येतात याची त्या वाट पाहत होत्या. नणदा आल्या. त्या विद्यावतीशी कसे बोलतात, कशा वागतात पाहण्यासाठी गल्लीतल्या सर्व बायका विद्यावतीच्या घरी गेल्या. पहिल्याने डोकावून पाहून व नंतर घरात जाऊन तिथे दृश्य पाहून थक्क झाल्या. तिच्या नणदांपैकी एक शेंगा सोलीत बसली होती तर दुसरी लाह्या भाजीत बसली होती. विद्यावती इकडून तिकडे गर्दीने हिंडत होती. गंमत पाहायला आलेल्या बायकांपैकी एक म्हणाली "बाई बाई! इतके दिवस ही बाई एवढाच करता का घर डोक्यावर घेत होती आणि घराच्या बाहेर सुद्धा पडली नाही!" "कामाचं नाव काढलं की माझे हातपाय गोठून जातात बाई! म्हणून मी घराच्या बाहेर पडले नाही." विद्यावती म्हणाली. "आमची वहिनी म्हणजे नुसता गोंधळ हो!" नणदा सर्व कथा ऐकल्यावर म्हणाल्या आणि हसू लागल्या.