All Marathi Stories
नोकरीच्या शोधात
धनगुप्त श्रीपुरमधील एक प्रसिद्ध जव्हेरी होता. त्याच्या दुकानाचे व्यापाराबद्दलचे हिशोब लिहिण्याचे काम श्रीधर नावाचा एक तरुण करीत असे. श्रीधर प्रामाणिक व कष्टाळू होता. आपले काम तो खूप मनापासून करी. मालकाची इमाने-इतबारे सेवा करणे हेच तो आपले कर्तव्य समजे. श्रीधरच्या बुद्धिमत्ता व चतुराईमुळे धनगुप्त व्यापारात अधिक फायदा होत असे. असूनही धनगुप्ताने श्रीधरचा पगार कधीही वाढवून दिला नाही.
श्रीधरचा पगार त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेमतेम पुरेसा होता, पण तरीही आपल्या बायको मुलांच्या काही बारीकसारीक मागण्या पुरवण्यासाठी श्रीधरला खूप कष्ट करावे लागत. मालक एक ना एक दिवस आपला पगार वाढवील अशी आशा श्रीधर करीत राहिला. पण असे घडले नाही. शेवटी निराश होऊन तो दुसऱ्या जव्हेऱ्यांकडे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू लागला.
कोमलपूरच्या रत्नांचा व्यापारी अनंतगुप्त याने श्रीधरला व्यापाराबद्दल अनेक प्रश्न विचारले. आणि त्याची उत्तरे ऐकून तो फार खुश झाला. श्रीधर सारखा सेवक आपल्याला मिळाला तर व्यापारात आपल्याला याहूनही अधिक फायदा निश्चित मिळेल असे त्याला वाटले. उत्तम व्यापारासाठी चांगले नोकर आजकाल कोठे? श्रीधरला काही दिवसांनी येऊन भेटायला सांगितले आणि त्याच्याबद्दल नीट माहिती मिळवण्यासाठी अनंतगुप्त धनगुप्ताला भेटला.
धनगुप्ताने सांगितले की - "श्रीधर केवळ विश्वासू आहे इतकेच नव्हे, तर तो फार हुशार आहे. त्याच्यामुळे मी माझा व्यापार वाढवू शकलो."
अनंतगुप्ताने श्रीधरला बोलावून घेतले व कामावर रुजू होण्यास सांगितले. परंतु त्याने जो पगार देऊ केला तो धनगुप्त देत असलेल्या पगारापेक्षाही कमी होता, म्हणून श्रीधरने ही नोकरी नाकारली.
यानंतर श्रीधर कामाक्षीपूरच्या चंद्रगुप्त नामक जव्हेऱ्याला भेटला. चंद्रगुप्तालाही त्याने सर्व माहिती दिली. चंद्रगुप्ताला श्रीधरचे वागणे-बोलणे पसंत पडले. असा सेवक मिळाला तर आपल्या व्यवसायात आणखी प्रगती करता येईल याची त्याला खात्री पटली. तो मनाच्या मनात म्हणाला - "श्रीधर स्वतःच्या बुद्धीचातुर्याने स्वतःचा व्यापार सुरू करू शकतो इतका हुशार आहे."
यानंतर चंद्रगुप्ताने श्रीधरला बोलावून कामावर हजर होण्यास सांगितले. चंद्रगुप्ताने सांगितले 'पगार धनगुप्ताकडील पगारापेक्षा चार रुपयांनी अधिक असेल' परंतु कामाक्षीपूर श्रीधरच्या गावावरून फार दूर असल्याने श्रीधरने ही नोकरीही स्वीकारली नाही.
तिसऱ्या प्रयत्नात श्रीपुरच्या जवळील धर्मपुरीहून विकासदत्त नावाच्या व्यापाऱ्याकडून श्रीधरला बोलावणे आले. इथेही श्रीधरच्या उत्तरावर खुश होऊन तो धनगुपकडे गेला व श्रीधरसंबंधी विचारू लागला.
धनगुप्त हसून म्हणाला - "श्रीधर अत्यंत आळशी आहे! शिवाय तो विसराळूही आहे. त्याला नोकरी दिल्यामुळे माझं आतापर्यंत व्यापारात पुष्कळच नुकसान झालं. आपण विचारलंत म्हणूनच आपणाला मी ही खरी माहिती देत आहे." मला मुद्दाम त्याची बदनामी करण्याची इच्छा नाही. यावर आपणास त्याला संधी द्यायची असेल तर पहा. पण नंतर मला दोष देऊ नका.
"वा, वा! खरी माहिती देऊन आपण मजवर उपकारच केलेत." असे म्हणून विकासदत्त तेथून निघून गेला.
श्रीधरने त्या दोघांचा संवाद दुकानातील बाजूस बसून ऐकला होता. त्याला फार वाईट वाटले. धनगुप्ताला त्याने विचारले - "महाराज, आपण माझी एक चांगली संधी घालवलीत. आपण असं का बरं केलं?"
धनगुप्त श्रीधरच्या खांद्यावर थापटत म्हणाला - "असं पहा, तू यापूर्वीही दोन व्यापाऱ्यांकडे नोकरीसाठी प्रयत्न केला होतास. त्यांनी तुला जो पगार देऊ केला तो, मी देत असलेल्या पगारापेक्षा काही विशेष जास्त नव्हता. मी वेळोवेळी मुकाट्याने सर्व माहिती काढत होतो. हा विकासदत्त तुला जरा अधिक पैसे द्यायला तयार आहे."
"मग आपण माझ्याबद्दल खोटी तक्रार करून माझं नुकसान का केलंत?" श्रीधरने विचारले.
"श्रीधर, जेव्हापासून तू माझ्याकडे कामाला आहेस, तेव्हापासून तू जसं हित पाहिलंस तसंच मीही नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करत आलो. तू मुला-बाळांचा धनी आहेस, तेव्हा मी तुला थोडा पगार वाढवला असता तरी तू त्यातून काही बचत करू शकला नसतास. कोणता खर्च आवश्यक अन् कोणता अनावश्यक हे समजणं फार कठीण असतं. तुझी मुलगीही आता लग्नाला योग्य झाली आहे, म्हणून मी तुझ्या नावे थोडी थोडी रक्कम जमा करत आलो आहे. शिवाय विकासदत्त तुला जो पगार द्यायला तयार आहे, तेवढा पगार मीही याच महिन्यापासून तुला देईन. मान्य आहे तुला?" धनगुप्ताने विचारले.
आतापर्यंत आपण आपल्या मालकाबद्दल चुकीची समजूत करून घेतली याबद्दल पश्चात्ताप होऊन श्रीधरने धनगुप्तजवळ कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीधर म्हणाला - "मालक, आपले माझ्यावर खरे खरे प्रेम आहे हे जाणून मला फार आनंद झाला. आपण माझे खरे हितचिंतक आहात. आपण मला पगार वाढवून दिला असता तरी ते पैसे असेच खर्च झाले असते. कसे आपले आभार मानू?"