Bookstruck

न्यायनिवाडा

विशाल देशाचा राजा शतानन याला आपल्या राज्यात न्यायनिवाड्यात कोणत्याही प्रकारे गडबड होता कामा नये व हंसासारखा पाण्याचे पाणी आणि दुधाचे दूध दर्शविणारा शुद्ध न्याय व्हावा असे वाटत होते. त्याने ती गोष्ट आपला प्रधान बृहन्मती यास सांगितली, तेव्हा त्याने ती गोष्ट असाध्य व अशक्य असल्याचे सांगितले. त्या काळात रघुनाथ नावाचा एक थोर वैज्ञानिक होता. मोठमोठे प्रयोग करून तो काही अपूर्व वस्तू तयार करून निरनिराळ्या देशांच्या राजांना दाखवून म्हणे— "तुम्हाला या वस्तूचा काही उपयोग होईल का पहा." तो त्या वस्तूचा उपयोग कसा करावयाचा हे प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवी. त्याला त्याबद्दल मोठमोठी बक्षिसे मिळत. या रघुनाथाने शतानन महाराजांच्या मनातील इच्छा कित्येकांच्या तोंडी ऐकली होती. एकदा रघुनाथ विशाल देशात आला आणि शतानन महाराजांना भेटून त्याने एक पेटी त्यांना दाखविली. त्या पेटीत एक यंत्र होते. त्या यंत्राविषयी रघुनाथ शतानन महाराजांना म्हणाला— "फार पूर्वी आपण एकदा प्रधानांना म्हटल्याचे मी कोणाकडून तरी ऐकले की बिनचूक नि:संशय असा न्याय-निवाडा कसा होईल याला काही उपाय आहे का? मी अनेक प्रयोग करून हे यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने मनुष्याच्या शरीरात होणारा सूक्ष्मात सूक्ष्म कंप प्रकट होतो. पहा, यात एक काटा आहे. शून्यापासून दहा पर्यंत आकडे आहेत. कोणी हे यंत्र हातात धरून किंवा त्यावर हात ठेवून बोलला तर हा काटा बाराच्या आकड्याच्या पुढे जात नाही. परंतु जर तो त्यापुढे गेला तर तो खोटं बोलतो आहे, हे कळते. या यंत्राच्या मदतीने न्यायाधीशाला त्याच्या समोर आलेला अपराधी खरोखर आरोपी आहे की नाही हे कळेल. तो खरे बोलतो आहे की खोटे, हे यंत्र बिनचूक सांगेल." ते ऐकून प्रधान बृहन्मती म्हणाला— "विद्वतवर! अपराध हा मनात असतो आणि हे यंत्र भौतिक देहात होणारा कंपच दर्शवू शकते. म्हणून या यंत्राच्या साहाय्याने अपराधी ओळखणे कठीण आहे. मानसिक बदल व शारीरिक बदल दोन्ही या यंत्राने कळणे शक्य नाही." रघुनाथ स्मित करून म्हणाला— "प्रधान! मनात होणाऱ्या विकारांचा परिणाम भौतिक देहावर नक्कीच होतो आणि तो कंपनाने प्रकट होतो. तेव्हा या यंत्राद्वारे ते शक्य का होणार नाही? अपराध हा मनात असतो हे मी मानतो. परंतु आपले शरीर हे मनाच्या आज्ञेप्रमाणेच नाही का चालत? मनात लपविलेल्या गोष्टीमुळे सारा देह लहान मोठ्या फरकाने थर थर कापत असतो. म्हणून न्यायनिवाडा करण्यात या यंत्राचा फार उपयोग होईल. तुम्ही या यंत्राच्या साहाय्याने प्रयोग करून पाहावा!" लगेच राजाने व मंत्र्याने त्या यंत्राची परीक्षा करून पाहिली. राजा एक खोटे बोलला आणि यंत्राचा काटा सातावर जाऊन थांबला. मंत्री खोटे बोलल्यावर पाचावर थांबला. "अद्भुत!" राजाने वाखाणणी केली. प्रधान म्हणाला— "पण महाराज! ज्या यंत्राचा काटा आपल्या खोटे बोलण्याला सातावर जाऊन थांबला, तोच माझ्या खोटे बोलण्याला पाचावरच थांबला. आणखी एखाद्याच्या बाबतीत दोनावर थांबणार नाही कशावरून?" रघुनाथ आता मात्र रागावला. म्हणाला— "या यंत्राविषयी मला तिळमात्र शंका नाही. आपण पाहिजे तितक्या वेळा प्रयोग करून खात्री करून घ्यावी." राजाने प्रधानाला गप्प राहायला सांगितले आणि रघुनाथाला म्हणाला— "मला तरी या यंत्राची खात्री पटली आहे. हे यंत्र असल्यावर निरपराध्यांना मुळीच भिण्याचे कारण नाही." रघुनाथाचा राजाने सत्कार केला आणि त्याला यथोचित पारितोषिक देऊन निरोप दिला. राजाने त्या यंत्राच्या साहाय्याने अनेकांवर प्रयोग केले. ते विश्वासार्ह असल्याचे रुजू झाले. राजा आरोप सिद्ध होण्यास त्या यंत्रावरच अवलंबून राहू लागला. 'त्या यंत्रावर पूर्णपणे अवलंबून न्यायनिर्णय करणे बरोबर नाही', असे प्रधानानाने कित्येकारा वेळा सांगितले तरी राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. एकदा एका गावी सिद्धेश्वर नावाच्या एका शेतकऱ्याने भर दुपारी चार प्रवासी वाटेने जात असताना त्यांच्यापैकी नारुशेट नावाच्या एका व्यापाऱ्याचा खून केला. त्याला लोकांनी धरून आणले आणि न्यायालयात उभे केले. सिद्धेश्वर स्वखुशीने न्यायालयात हजर व्हायला तयार झाला. एवढेच नव्हे तर त्याने काही अपराध केला नसल्याचे म्हटले. सिद्धेश्वरला राजासमोर हजर केल्याबरोबर राजाज्ञेने दोघे शिपाई सिद्धेश्वरचे दोन्ही हात धरून उभे राहिले. तिसऱ्या शिपायाने यंत्र सिद्धेश्वरच्या गळ्यात घातले. "तू अपराध केलास की नाही?" राजाने सिद्धेश्वरला विचारले. सिद्धेश्वर तत्क्षण म्हणाला— "नाही!" त्या शिपायाने यंत्रातला काटा कोणत्या आकड्यावर थांबला हे पाहिले आणि म्हणाला— "एकावर थांबला आहे!" "सोडा त्याला!" राजा म्हणाला. हत्या करताना ज्यांनी डोळ्यांनी पाहिले होते ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले— "हे काय महाराज!" ते ऐकून राजाने सिद्धेश्वरला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न केला आणि यंत्रातला काटा एकावरच उभा राहिला. ते सर्व पाहून प्रधानाने सिद्धेश्वरला विचारले— "तू खून केलास की नाही?" सिद्धेश्वर म्हणाला— "होय, केला!" राजा ते उत्तर ऐकून थबकच झाला. सिद्धेश्वर स्वतः तोंडाने खून केल्याचे कबूल करतो आहे, परंतु यंत्र अपराध न केल्याचे सांगत आहे. दोन्ही गोष्टी बरोबर कशा होऊ शकतील? "तू खून केलास म्हणजे अपराध केलास, असेच नाही का?" राजाने विचारले. सिद्धेश्वर म्हणाला— "त्याने माझ्या बायकामुलांचा खून केला ही गोष्ट फक्त मला एकट्यालाच माहीत आहे! म्हणून मी त्याचा खून केला. मग तो अपराध कसा होईल?" बृहन्मती राजाकडे पाहून स्मित करीत म्हणाला— "यंत्र खोटे बोलले नाही. त्याने खून केला पण तो त्याचा अपराध नव्हता हे तो मनापासून मानतो आहे. म्हणून त्याने अपराध न केल्याचे यंत्र म्हणते आहे. तो शिक्षा करण्यायोग्य अपराधी आहे की नाही, हे ठरविणे यंत्राचे काम नाही." राजाच्या लक्षात त्याची चूक आली. यंत्राच्या सुद्धा काही मर्यादा आहेत हे ओळखून राजाने सिद्धेश्वरला योग्य ती शिक्षा केली. नंतर यंत्रावरच अवलंबून न्याय निवाडा करण्याचा हट्ट सोडला.