परधन
एका गावी एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दररोज चार घरी जाऊन पंचांग वाचून त्या दिवसाचे विशेष सांगे. त्याला त्याच्या यजमानांकडून जे मिळे, त्यावर त्याचा उदरनिर्वाह चाले. राजाला त्या ब्राह्मणाच्या दारिद्र्याची गोष्ट कळली, तेव्हा त्याने त्याला मदत करण्याचे ठरविले. म्हणून राजाने त्या ब्राह्मणाला मुद्दाम राजवाड्यात बोलावले.
ब्राह्मणाने राजवाड्यात जाऊन त्या दिवसाची तिथी, नक्षत्र, शकुन-अपशकुन, कर्तव्य-अकर्तव्य वगैरे गोष्टी सांगितल्या. राजाने प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणाला एक भोपळा भेट दिला. ब्राह्मण तो भोपळा घेऊन निघाला. वाटेत तो आणखी एका ओळखीच्या ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहिला आणि म्हणाला— "अहो, मला हा भोपळा मिळाला आहे! आमच्या घरी कोणी भोपळा खात नाही, म्हणून तुम्ही याचा उपयोग करा." असे सांगून गरीब ब्राह्मण तो भोपळा त्या ब्राह्मणाला देऊन आपल्या घरी परतला.
त्यानंतर दुसऱ्या ब्राह्मणाच्या बायकोने तो भोपळा फोडला, तर त्यातून सोन्याचा एक गोळा बाहेर येऊन पडला. ती म्हणाली, "अरेरे! बिचाऱ्याने भोपळा समजून आपल्याला देऊन टाकला, पण ह्यात सोने आहे. तुम्ही लवकर जाऊन त्याची वस्तू त्याच्याकडे पोहोचती करा. परधन बाळगणे किंवा उपभोगणे हे महापाप आहे." परंतु तो ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणाला— "तुझे म्हणणे बरोबर आहे, पण त्या ब्राह्मणाच्या नशिबी गरिबीच लिहिलेली दिसते आहे. नाहीतर चालून आलेले धन तो असे आपल्या घरी टाकून गेला नसता. घरी आलेल्या लक्ष्मीला घराबाहेर घालवणारा माणूस मूर्ख ठरतो."
बायको पुन्हा म्हणाली, "परंतु परधन हे नागासारखे आहे, हात लावला तर केव्हा आणि कसे डसेल हे सांगता येणार नाही. मी म्हणते ते ऐका." पण त्या लोभी ब्राह्मणाने तिच्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण पुन्हा पंचांग सांगायला राजाच्या घरी आला. तेव्हा राजाने त्याला विचारले— "काय हो गुरुजी! काल तुम्ही भोपळ्याची भाजी करून खाल्लीत का? कशी होती?"
खरी गोष्ट सांगितली तर राजा रागावेल, या भीतीने ब्राह्मणाने सपशेल खोटे सांगितले. तो म्हणाला— "होय महाराज! भाजी केली होती, सर्वांना फार आवडली." ब्राह्मण त्यात सोने सापडल्याबद्दल काहीच बोलला नाही, हे पाहून चतुर राजाला वाटले की, त्या ब्राह्मणाच्या नशिबात ते धन नसावे आणि त्याने तो भोपळा कोणाला तरी जशाचा तसा दान करून टाकला असावा. म्हणून राजा म्हणाला— "काल जो भोपळा दिला होता तो लहान होता. आज आणखी एक मोठा देतो. तो कसा आहे, हे उद्या सांगा." असे सांगून राजाने ब्राह्मणाला आणखी एक मोठा भोपळा (कोहळा) दिला.
तो गरीब ब्राह्मण पुन्हा त्याच लोभी ब्राह्मणाकडे गेला आणि तो भोपळा त्याला देऊन घरी निघून गेला. लोभी ब्राह्मणाला आता मोह आवरेना. त्याने लगेच तो कोहळा जमिनीवर आदळून फोडला. परंतु त्यातून सोन्याऐवजी एक जिवंत नागसाप निघाला आणि ब्राह्मणाला चावण्यासाठी फुत्कार टाकू लागला. तो ब्राह्मण घाबरून ओरडू लागला, "अग, हा तर नागसाप आहे! चावायला धावतो आहे, याला ठार केले पाहिजे."
त्याची बायको म्हणाली, "मी कालच तुम्हाला सांगितले होते की, परधन हे नागासारखे भयंकर असते, पण तुम्ही ऐकले नाही." असे म्हणत ती बाई धावत त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी गेली आणि म्हणाली— "अहो भावजी! आमच्या घरी लवकर या आणि आपले सोने घेऊन जा अन् आमच्या यांना वाचवा! त्यांच्या पाठीमागे नागसाप लागला आहे, मी तुमच्या पाया पडते!" त्या बिचाऱ्या गरीब ब्राह्मणाला 'सोने काय' आणि 'साप काय' हे काहीच समजेना. तो चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ती त्याला हात धरून ओढत आपल्या घरी घेऊन गेली.
तोपर्यंत तिथे खूप गर्दी जमली होती. लोभी ब्राह्मण थरथर कापत घडलेली गोष्ट सांगत होता. गर्दी पाहून तो साप कुठेतरी पळून गेला. गरीब ब्राह्मणाला पाहताच लोभी ब्राह्मण म्हणाला— "मी तुझे कालचे सोने गडप केले होते, म्हणून आज हा साप माझ्या पाठीस लागला होता. पण देवाच्या कृपेने तो पळून गेला. तू आपले सोने घेऊन जा!"
राजाने पंचांग सांगणाऱ्या ब्राह्मणाच्या पाठोपाठ आपले शिपाई पाठवले होते. त्यांनी सापाला शोधून ठार केले आणि घडलेली सर्व हकीकत राजाला सांगितली. राजाने त्या गरिबाला मदत करण्यासाठीच हा सर्व खटाटोप केला होता. कथेचा शेवट गोड झालेला पाहून राजाला खूप आनंद झाला.