परोपकारी गोपाळ
एकदा गोपाळ आपल्या सासुरवाडीला गेला. तिथे त्याची थोडी जमीन होती. जमिनीचे उत्पन्न सुमारे तीनशे रुपये येईल ते शेतकऱ्याकडून वसूल करून तो आपल्या गांवीं निघाला. वाटेत हृदयाला हालवून सोडणारी एक गोष्ट घडली.
त्याला एक गाडी येत असलेली दिसली. गाडींत तांदळाची पोतीं भरलेलीं होतीं. एकटा बैल इतकीं पोतीं कशी ओढू शकला याचें गोपाळाला आश्चर्य वाटले. त्या निर्जनस्थानीं गोपाळाला येत असलेला पाहून गाडीवाला त्याला म्हणाला— "मी जरा पाणी पिऊन येतो त्या कालव्यावरून, तुम्ही गाडीवर लक्ष ठेवतां का जरा?"
"बरें जाऊन ये!" गोपाळ म्हणाला आणि गाडीजवळ उभा राहिला. थोड्यावेळाने गाडीवाला पाणी पिऊन आला. म्हणाला— "फार उपकार झाले माझ्यावर आपले! या कलियुगांत आहे कोण विचारणारा? मी चार आणे देऊन दोघांना गाडी ढकलायला सांगितलें ते घेऊन आले ढकलत गाडी व येथें मध्ये वाटेवर सोडून निघून गेले. आतां तुम्हीच सांगा, मी एकटा काय करूं?" असें सांगून त्यानें बैलाला एक चाबूक मारला.
एकटा बैल, इतकें ओझें काय ओढणार? म्हणून गाडीवाला बैलाला बडवू लागला. गोपाळाने गाडीवाल्याच्या हातांतला चाबूक ओढून घेतला व म्हणाला— "अरे, तूं तरी बराच दिसतोस की रे! स्वतः पाणी पिऊन ताजा तवाना होऊन आला आहेस म्हणजे बैलाला पण पाणी मिळालें असें वाटले होय तुला. त्याला देखील भूक तहान आहेच की नाही?" तो बैलाला सोडून कालव्याकडे घेऊन जाऊं लागला.
गाडीवाल्याला लाज वाटली. म्हणाला— "माफ करा! चुकलों. तुम्ही कशाला एवढी तसदी घेतां? मी घेऊन येतो पाणी पाजून." असें सांगून बैलाची दोरी स्वतःच्या हातांत घेऊन जाऊं लागला. "तहानेबरोबर बिचाऱ्याला भूक पण लागली असेल! थोडा वेळ चरायला पण सोड! तूं येईपर्यंत मी पाहतो गाडी!" गोपाळ म्हणाला.
काही वेळाने गाडीवाला बैलाला घेऊन परत आला. त्याला गाडीला जुंपून पुन्हा हांकू लागला. पण बैल जागचा हालेच ना. तें पाहून गोपाळ म्हणाला— "तुम्ही इतकीं पोतीं भरली आहेत! अहो दोन बैलांच्या गाडींत तरी कोणी इतकीं पोतीं भरतो का? तो एकटा जीव कशी ओढणार गाडी? अर्धी पोती उतरवून ठेवा. पहिली खेप पोचती करून मग घेऊन जा दुसऱ्या खेपेत. मी राहातो येथें राखण करायला."
"खरोखर देवासारखे पावलांत बघा. परंतु इतकीं पोतीं एका खेपेत पोचती करण्याचें ठरलें आहे." गाडीवाला म्हणाला. गोपाळाने विचारलें— "ऐकू तर दे की काय ठरलें होतें तें."
गाडीवाल्याचें नांव विठ्या होतें. तो गाडींत सामान पोचते करून पैसे मिळवी, तोच त्याचा धंदा होता. बैल विकून कांही सामान विकत घ्यावें व तें गाडींत घालून स्वतः ती ओढून घेऊन जावी असा विचार त्याच्या मनांत आला. जवळच्या गांवचे भिकूशेट यांनी बैलाची किंमत विचारली, तेव्हां विठ्याने ती शंभर रुपये सांगितली. त्यावर भिकूशेट त्याला म्हणाला— "या मरतुकड्या बैलाला शंभर रुपये द्यायला मी काय वेडा आहे काय? हातांचें एक पोतें ओढून न्यायला जीव आहे का तुझ्या बैलाच्या अंगांत? मी शंभर रुपये देतो तुला जर हा बैल जितकें वजन ओढू शकेल, तितकें ओढून दाखविलें तर."
विठ्याने मूर्खपणाने तें कबूल केलें होतें. "यादीप्रमाणे सामान गाडींत भरलें. पण गाडी जागची हाले ना. म्हणून दोघा मजुरांना गाडी ढकलायला ठरवून घेतलें. एक मैल कशीबशी गाडी आली. त्यानंतर ते मजूर म्हणाले, आतां नाही आमच्याने ढकलवत, आणि निघून गेले. अजून एक मैल जायचें आहे. सामान पोचतें नाही केलें तर गाडीचें भाडें मारलें जाईल आणि वर बैल फुकटांत द्यावा लागेल."
तें सर्व ऐकून गोपाळाला विठ्याच्या खुळेपणाची कीव आली. "अरे तूं कांही कबूल केलें म्हणून बैलाचा असा जीव घेणार का? येऊन जाऊन तुला बैलाची किंमत शंभर रुपयेच पाहिजे आहे. मी देतो शंभर रुपये. मला दे बैल." विठ्या चकित मुद्रेने गोपाळाकडे पाहूं लागला. गोपाळाने शंभर रुपये काढून दिले व ते विठ्याने घेतले पण. गोपाळाने बैलाला चरायला मोकळा सोडला. "मी जाऊन दोन बैलांची गाडी पाठवून देतो. तूं त्या गाडींत सामान पोचतें कर. सांग, वाटेंत तूं बैल विकून टाकलास म्हणून." गोपाळ म्हणाला.
"तें बरोबर! पण तुमचे हे उपकार मी कधी विसरणार नाही. ती पहा एक गाडी रिकामी येते आहे. मी पोचतें करतो सर्व सामान." विठ्या म्हणाला. गोपाळ निघून गेल्यावर विठ्याने ती गाडी थांबवून सर्व सामान आपल्या गाडींतून काढून त्या गाडींत भरलें व त्या गाडी बरोबर स्वतःची रिकामी गाडी ओढून घेऊन भिकूशेटच्या घरी गेला.
"काय रे सामान पोचतें झालं, पण बैल कोठे आहे?" भिकूशेटने विचारलें. "मी तुमचें सामान घेऊन अर्धी वाट चालून आलो असेन की वाटेत एक गृहस्थ भेटला व त्याने बैल कोणाचा म्हणून विचारलें. इतकें सामान ओढून सहजी नेणारा बैल पाहून त्याला आश्चर्य वाटले. मी शंभर रुपयाला बैल द्यायला कबूल झालं आहे, हें त्याला सांगितलें, तेव्हां तो वर वीस रुपये द्यायला तयार झालं व बैल घेऊन गेला. तुमचें सामान पोचविण्याची जबाबदारी मी घेतली होती ना! म्हणून त्यांनी आपली गाडी घेऊन जायला सांगितलें व निघून गेले." विठ्याने तिखटमीठ लावून बैलाच्या विक्रीचें वर्णन केलें.
भिकूशेटला आश्चर्य वाटलें व त्याने कोणी बैल विकत घेतला म्हणून चौकशी केली. विठ्या म्हणाला— "मला नाही माहीत त्या गृहस्थाचें नांव. कोणी असो, बैलाची जात त्याला कळते," असें सांगून व भिकूशेटचा निरोप घेऊन विठ्या निघून गेला. भिकूशेटला तें खरें वाटले व एक चांगला बैल हातचा गेल्याबद्दल वाईट पण वाटलें.
आणखी कांही दिवसांनी संक्रांत आली. बैलाचें प्रदर्शन भरलें. तीन महिने गोपाळाने बैलाला खूप खायला घातले होतें म्हणून बैल छान माजला होता. इतर बैल त्याच्यासमोर काय टिकणार? त्या बैलालाच पारितोषिक मिळालें. प्रदर्शन पाहायला विठ्या व भिकूशेटपण आले होते. विठ्याने भिकूशेटची गोपाळाशी ओळख करून दिली व म्हणाला— "पाहिलात माझा पाडा? यांनीच विकत घेतला होता तो बैल!"
भिकूशेट गोपाळाला म्हणाला— "मी घेणार होतों हा बैल. पण तुम्ही घेतलांत. चूक माझीच होती म्हणा. कारण मी बैलाची परीक्षा घ्यायचें ठरविलें होतें. तुम्हांला हा बैल विकायचा असेल तर मी घ्यायला तयार आहे."
"पाहिजे तर जा घेऊन. माझी ना नाही!" गोपाळ म्हणाला. भिकूशेटने दीडशें रुपये दिले व बैल घेऊन गेला.