Bookstruck

पवित्र तीर्थ

पूर्वी कधीं धरणीपूर राज्याच्या गादीवर दिवाकर नावाचा राजा राज्य करीत असे. त्याचें एकदां शत्रूंशीं युद्ध झालें. तो विजय मिळवून धरणीपूरला परत येत असतां राज्याच्या वेशीवरच्या वाळवंटाच्या प्रदेशांत त्याला तहान लागली. सैनिक पाण्याच्या शोधार्थ निघाले. त्यांना एका जागीं एक खड्डा दिसला. त्याच्या तळाला तीन बोटें बुडतील एवढें पाणी होतें. त्यांनीं तें पाणी पिऊन पाहिलें तेव्हां त्यांना तें नारळाच्या पाण्यासारखें गोड लागलें. सैनिकांना फार आनंद झाला. एक तांब्या भरून पाणी घेऊन ते राजाकडे गेले. राजानें पाणी पिऊन पाहिलें व म्हणाला— “या वाळवंटांत इतकें गोड पाणी आहे, हें पूर्वी कधीं आम्ही ऐकलें नाहीं.” असें सांगून तो स्वतः त्या खड्ड्याजवळ गेला. त्यानें व बरोबर गेलेल्या सरदारांनीं व नोकरांनीं त्यांतलें पाणी पोटभर पिऊन घेतलें. तरी खड्ड्यातलें पाणी कमी झालें नाहीं. त्या दिवशीं राजानें त्याच जागीं पडाव टाकायचें ठरविलें. त्याच वेळीं तेथें एक संन्यासी आला. तो खड्ड्यांत उतरला, खड्ड्यांतलें पाणी डोक्यावर प्रोक्षण करून व आचमन करून तो राजाच्या दर्शनाला गेला. राजाला आशीर्वाद देऊन तो म्हणाला— “हें पवित्र तीर्थ आहे. हें पिण्याचें भाग्य तुला इतक्या वर्षांनीं मिळालें.” संन्याशानें त्या पवित्र तीर्थाचें महात्म्य वर्णन केलें तें असें. “एका काळीं येथें हा खड्डा पण नव्हता. उन्हाळ्यांत एकदां पाऊस पडला. दुसऱ्या दिवशीं एका चिमणीला खूप तहान लागली. ती येथें येऊन पडली. तहानेनें तडफडत तिनें या जागीं चोच मारली. तिच्या अंगाला ओलावा भासला. तिच्या जिवांत जीव आला. तिच्या अंगांत शक्तीचा संचार झाला व ती येथून उडून निघून गेली. तेव्हां तेथें एक लहानसा खड्डा झाला. त्या खड्ड्यांत थोडें पावसाचें पाणी सांचले. एक तहानेले गिधाड तेथें आलें. त्यानें पाणी पिऊन खड्डा थोडा मोठा केला. नंतर त्या प्रदेशांतले कोल्हे, लांडगे इत्यादि प्राणी पाणी प्यायला तेथें आले. पाण्यासाठीं खड्डा मोठा करून व पाणी पिऊन ते निघून गेले. हळूहळू रानटी डुकरं हा खड्डा खोल व मोठा करूं लागलीं. नंतर हा खड्डा इतका मोठा झाला कीं त्यांत हत्ती देखील येऊन आपली तहान भागवू लागले. पावसाळ्यांत या खड्ड्यांत पाणी सांचते. किती कडक ऊन पडलें तरी याच्या तळाला पाणी राहतें आणि या वाळवंटांतल्या प्राण्यांची त्यावर तहान भागते. साऱ्या वाळवंटांत हीच एक पाणी मिळायची जागा आहे. याचें पाणी गोड व पवित्र आहे.” तें ऐकून संन्यासी निघून गेल्यावर राजा आश्चर्यानें विचार करूं लागला. इतके लोक व प्राणी येऊन येथलें पाणी पितात पण पाणी कां कमी होत नाहीं? याचें कारण वाळूंत दूरवर हें पाणी पसरलें असावें. येथें जर एक मोठा तलाव बांधून दिला तर वाळवंटांत फिरणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. त्यामुळे माझी कीर्ति पण अमर होईल. असा विचार करून राजानें त्या जागीं एक मोठा तलाव खणविला. त्याच्या काठावर पायऱ्या बांधून शेजारीं एक मोठी धर्मशाळा पण बांधली. धर्मशाळेत येऊन राहणाऱ्यांना रानटी श्वापदांचा त्रास होऊं नये यासाठीं त्याने धर्मशाळेच्या चारी बाजूला उंच भिंत बांधली. रात्रंदिवस पाहारा देण्यासाठीं त्यानें पाहारेकरी नेमले आणि त्या तलावाचें नांव 'दिवाकर सरोवर' असें ठेवलें. सर्व बांधकाम संपल्यावर समारंभानें पूजा प्रार्थना वगैरे झाली. नंतर तीर्थ म्हणून तें पाणी घेऊन राजानें तोंडांत घातलें तेव्हां त्याला तें कडवट लागलें. त्याला थोडा वास पण येत होता. राजाला वाटलें कीं तलाव नुकताच बांधून झाला आहे म्हणून वास येत असावा. राजाला वाटत होतें कीं हा तलाव बांधल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढेल. म्हणून तो मधून मधून चौकशी करी कीं पाण्याचा उपयोग कसा काय होत आहे? तेव्हां त्याला कळलें कीं पाण्याचा उपयोग आंघोळीला व धुण्याला भरपूर होत आहे. कोणी तें पाणी पीत नाहीं. पाहारेकऱ्यांना तेंच पाणी प्यावें लागे. त्यांनाच कष्ट सहन करावे लागत. म्हणून सैनिक कांहीं ना कांहीं तरी सबब सांगून तेथून निघून जाऊं लागले. त्यांच्या जागीं कोणी काम करायला तयार होत नसे. राजाला वाईट वाटलें. राजानें सैनिकांना सांगितलें कीं तेथें रोज जो एक संन्यासी येतो त्याला माझ्याकडे बोलावून घेऊन या. “तलाव बांधून झाला तेव्हापासून तिकडे कोणी संन्यासीच काय दुसरा मनुष्य किंवा चिटपाखरूं देखील आलेलें नाहीं.” सैनिक म्हणाले. राजाला जास्तच आश्चर्य वाटलें. राजा सैनिकांना म्हणाला— “त्या तलावाच्या आसपास कोठेंतरी तो संन्यासी भेटेल. त्याला भेटून मी बोलाविलें आहे म्हणून सांगा.” कांहीं दिवसांनीं संन्यासी आला. म्हणाला— “राजा! तूं मला बोलाविलें आहेस, असें तुझे शिपाई सांगत आहेत?” “आपल्या सारख्या थोर पुरुषांच्या सोयीसाठीं मी हा तलाव बनविला. तेथें सर्व सुखसोयी करून ठेवल्या आहेत. पण आपण त्या बाजूला फिरकत सुद्धां नाहीं. असा राग का?” राजानें विचारलें. “होय, अलीकडे मी दुसऱ्या जागीं जात आहें. तूं कारण विचारलेंस म्हणून सांगतो. आतां हें पवित्र तीर्थ राहिले नाहीं. मूक प्राण्यांनीं आपल्या शक्तीच्या बळावर देवावर विश्वास ठेवून जो खड्डा खणला तो तूं आपल्या शक्तिसामर्थ्यानें कीर्तिलाभ व्हावा म्हणून इतका मोठा केलास. त्यांत कांहीं गैर नाहीं. परंतु यांत पूर्वी सर्व प्राणी येऊन पाणी पीत. ते मोठी भिंत चारीबाजूला बांधल्यापासून यायचे बंद झाले. तूं वर पाहारेकरी पण नेमलेस. तूं याचें नांव दिवाकर सरोवर ठेवलेंस. म्हणून हें पाणी आतां पवित्र राहिलें नाहीं. कलुषित झालें.” संन्यासी म्हणाला. राजाच्या डोक्यांत लख्ख प्रकाश पडला. त्यानें सरोवराच्या चारीबाजूला बांधलेली भिंत तोडून टाकविली आणि पाहारेकरी काढून स्वतःच्या नांवाची शिळा पण काढविली. पुढें कांहीं दिवसांनीं त्या सरोवराचें पाणी पुन्हा गोड झालें व लोक म्हणूं लागले कीं पाणी अमृतासारखें गोड लागते आहे. वाळवंटाच्या मध्यभागीं तसें गोडपाणी मिळू लागल्यामुळे वाटसरूंची उत्तम सोय झाली.