Bookstruck

पुरें कर पुराण

विजयनगर साम्राज्याचा अधिपति श्री कृष्णदेवराय यांच्या दरबारी अष्टदिग्गज कवि होते. त्यांत तेनाली रामलिंग नावाचा एक विद्वान कवि होता. तो हजरजबाबी पण तसाच होता. एकदा कृष्णदेवरायाने रामलिंग कवीला एका राजकीय कार्यासाठी दिल्लीच्या बादशहाकडे पाठविले. सुभद्र नामक एका मित्राबरोबर रामलिंग कवि दिल्लीला निघाला. वाटेत एकदा ते सायंकाळी 'भर्गदुर्ग' नावाच्या गावी येऊन पोहोचले. एका ब्राह्मणाच्या घरी ते उतरले. बोलत असता त्या गावच्या जमीनदाराच्या विचित्र गोष्टी त्यांच्या ऐकिवात आल्या. त्या जमीनदाराचे नाव दुष्टवर्मा असे होते. तो जमीनदार त्या गावच्या ब्राह्मणांना आपल्या घरी पुराण सांगायला पाळीपाळीने बोलवी. कोणी पुराण वाचून त्याचा अर्थ सांगितला की तो म्हणे— "अहो पुराणिक बुवा! तुम्ही सर्वांना माहीत असलेलाच अर्थ सांगता आहात! काही विशेष गूढार्थ असेल तो सांगा!" कोणी गूढार्थ सांगितला तर तो सांगे— "म्हणजे तुम्हांला काहीच कळले नाही म्हणावयाचे!" त्याच्या घरी पुराण सांगायला कोणी येत नाही म्हणून उत्तर दिले, तर तो त्यांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन भंडावून सोडी. दुष्टवर्माच्या या दुष्टपणाचे वर्णन ऐकून रामलिंग कवीने त्याची खोड मोडण्याचे मनाशी ठरविले. त्याने व त्याचा मित्र सुभद्र दोघे दुसऱ्या दिवशी सरळ दुष्टवर्माच्या घरी गेले. रामलिंग कवीला पाहून दुष्टवर्माने विचारले— "कोण रे बुवा तू?" "आम्ही दोघे काशीहून आलो आहोत. 'अद्भुत पुराणिक' म्हणतात आम्हाला!" रामलिंग कवि म्हणाला. "मला ओळखलेले दिसत नाही तुम्ही, नाही तर अद्भुत पुराणिक म्हणून गर्वाने आपली ओळख सांगितली नसती," दुष्टवर्मा म्हणाला. "आपली कीर्ती काशीला ऐकली आम्ही. पुराण ऐकून आपण पुराणिकाचा यथोचित सत्कार करता हे कळले म्हणूनच तर आलो आहोत मोठी आशा धरून! एकशे दहा पद्धतीने पुराण प्रवचनाचा अभ्यास केला आहे आम्ही. जुन्या प्राचीन कथा सांगताना ऐकणाऱ्याला त्या कालपरवा घडल्यासारख्या भासतील अशा तऱ्हेने आम्हांला सांगता येतात. महाभारतात रामायण व रामायणात महाभारत बसविण्याची कला अवगत आहे आम्हांला. याहून जास्त स्वतःचा परिचय आता आम्ही काय देणार?" रामलिंग कवीच्या ह्या वल्गना ऐकून दुष्टवर्मा गार झाला व त्याने त्याचे पुराण ऐकण्याची व्यवस्था त्याच दिवशी केली. रामलिंग ज्या गृहस्थाच्या घरी उतरला होता त्याच्याकडे आला. पूर्वी ठरल्याप्रमाणे त्या गृहस्थाकडे जमलेल्या ब्राह्मणांना जे काही सांगावयाचे होते ते सांगून त्या दिवशी संध्याकाळी मित्राबरोबर निघून गेला. ब्राह्मण त्याच्या मागोमाग एकेक काठी घेऊन निघाले. सर्व दुष्टवर्माच्या घरी येऊन पोहोचले. तेथे दुष्टवर्मा गावच्या इतर ब्राह्मणांसह प्रथमच हजर झाला होता. रामलिंग कवि व त्याचा मित्र सुभद्र यांच्यासाठी निराळी आसने ठेवण्यात आली होती, त्यावर दोघे बसले. दुष्टवर्माने महाभारताच्या युद्धाचे पुराण सुरू करायला सांगितले. सुभद्र महाभारतातला एक प्रसंग घेऊन एक श्लोक म्हणू लागला. संस्कृत भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. रामलिंग कवीने श्लोकाचा अर्थ सांगितला की— "रावणाने पांडवांची मदत मागितली आणि युद्धात कर्णाने रावणाचा पराभव केला. वायुसुत हनुमानाने सुशर्माचा वध केला. गुरु द्रोणाचार्य पुत्र शोकाने शस्त्र खाली ठेवून बसले असता धृष्टद्युम्नाने त्यांचे केस धरून छाटून टाकले." रामलिंग कवीने त्या प्रसंगाचा अर्थ निराळाच लावला. 'गुरु' शब्दाचा अर्थ गुरु द्रोणाचार्य न लावता 'बृहस्पति' लावून, बृहस्पतीचे केस धरून धृष्टद्युम्नाने ते छाटून टाकले असा अर्थ लावला. 'हरि' शब्दाचा अर्थ वानर असा देखील आहे, म्हणून कंसाचा वध करण्यासाठी हरिने पुढे पाऊल टाकले याचा अर्थ रामलिंग कवीने "सुग्रीवाने कंस वध केला" असा लावला. दुष्टवर्मा ते पुराण ऐकून थक्क झाला. म्हणाला— "हे काय पुराण झाले? पिंपळाच्या झाडाला असे आंबे लागतात का कधी कुठे?" "रामायणात महाभारत व महाभारतात रामायण आहे व दोन्ही मध्ये भागवत आहे, हे मी सुरुवातीलाच सांगितले होते." रामलिंग म्हणाला. "पण पुराणातल्या गोष्टी कालपरवा घडल्यासारख्या तुला सांगता येतात असे देखील म्हणाला होतास तू! ते कसे ते दाखव व त्यानंतर पुरे कर तुझे पुराण!" दुष्टवर्मा ओरडला. "आपली आज्ञा शिरसावंद्य आहे!" असे सांगून रामलिंग पुढे म्हणाला— "कर्णाने रावणाला अशी...," असे म्हणत त्याने दुष्टवर्मालाच लाथ मारली. "धृष्टद्युम्नाने बृहस्पतीचे केस धरून असे छाटले" असे म्हणत त्याने तलवार घेऊन दुष्टवर्माचे केस छाटले. "मारुतीने सुशर्माचे घर असे...." सांगत त्याने दुष्टवर्माच्या घराला आग लावली. दुष्टवर्मा रामलिंग कवीला मारण्यासाठी धावला. पण ब्राह्मणांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आपापल्या काठ्यांनी दुष्टवर्मालाच चोपून काढले व रामलिंगचे रक्षण केले. दुष्टवर्माने पंचासमोर गाऱ्हाणे नेले व रामलिंग कवीने दुष्टपणाने त्याचे घर कसे जाळले व त्याचे केस कापून त्याला लाथ मारली हे सांगून त्याला शिक्षा करायला सांगितले. ग्रामपंचायतीने रामलिंगाला तसे करण्याचे कारण विचारले तेव्हा रामलिंग म्हणाला— "मी दुष्टवर्माच्या आज्ञेप्रमाणेच सर्व केले आहे. पाहिजे तर हजर असलेल्या ब्राह्मणांना विचारून पहा!" "चोर आणि वर शिरजोर! माझे केस कापून व माझ्या घराला आग लावून वर हे बोलतो आहेस होय?" असे म्हणत दुष्टवर्मा रामलिंगाला मारायला धावला. तेव्हा रामलिंग म्हणाला— "खबरदार! मी पुराण चुकीचे सांगितले आहे असे कोणी म्हणेल तर मी त्याचे डोके उडवीन! मला तुम्ही ओळखले नाही वाटते? मी विजयनगरच्या चक्रवर्तीचा दूत आहे व दिल्लीच्या बादशहाकडे राजाचा निरोप घेऊन जात आहे." रामलिंगाने सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात सर्व सांगितले. त्याचे अधिकार पत्र वाचून सर्व थक्क झाले. 'शेरास सव्वाशेर' भेटलेला पाहून सर्वांना आनंदच झाला. सर्वांनी मिळून राजाच्या विचक्षण प्रतिनिधीला आदरपूर्वक निरोप दिला.