Bookstruck

प्रद्युम्नाची गोष्ट

जटासुराच्या मुलाचे नाव शंबरासुर असे होते. आकाशवाणी झाली की, कृष्ण व रुक्मिणीच्या मुलाच्या हस्ते शंबरासुराला मृत्यू येईल. ते ऐकून शंबर काकरूप धारण करून द्वारकेला गेला. प्रद्युम्नाचा जन्म होऊन फक्त आठच दिवस झाले होते. त्याला उचलून नेऊन त्याने समुद्रात टाकले व 'आता आपल्याला यापुढे मरण नाही' असे मनाचे समाधान करून घेऊन तो परत घरी आला. शंकराच्या शापाने भस्म झालेला कामदेव कृष्ण-रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न होऊन जन्मला होता. मन्मथाची बायको रती, शंबराची मुलगी होऊन जन्मली. तिचे नाव मायावती असे होते. शंबराने प्रद्युम्नाला समुद्रात टाकल्यावर त्याला एका माशाने गिळून टाकले. त्या माशाला एका कोळ्याने धरले. त्याने तो मासा शंबराची मुलगी मायावती हिला विकला. मासा कापला तेव्हा त्यातून एक मूल निघाले. तिने त्या मुलाचे पालनपोषण स्वतःच्या मुलासारखे केले. शंबराला ती गोष्ट फार उशिरा कळली. स्वतःचा मृत्यू ज्याच्या हाती लिहिलेला आहे, तो शत्रू आपल्याच घरी आपल्या मुलीकडे वाढावा, हे शंबराला कसे आवडणार? तो त्याला ठार करण्यासाठी गेला, परंतु दोघांचे युद्ध झाले त्यात शंबरच मारला गेला. मायावतीने प्रद्युम्नाला आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला. दोघे एकत्र काही काळ सुखाने राहिले, परंतु पुढे काही दिवसांनी तिने प्रद्युम्नाला द्वारके येथे पोहोचते केले. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याला रुक्मावती नावाची मुलगी होती. दोघांचे स्वयंवर ठरले. स्वयंवराला इतर राजकुमारांबरोबर प्रद्युम्न पण हजर होता. परंतु स्वयंवर होण्यापूर्वीच तो रुक्मावतीला उचलून रथात बसवून पळून गेला. दोघांचे लग्न झाले. त्यांना अनिरुद्ध नावाचा एक मुलगा झाला. वज्रपुराला वज्रनाभ नावाचा एक राजा राज्य करीत असे. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि 'कोणी देव त्याला जिंकू शकणार नाही व त्याच्या परवानगीशिवाय कोणी त्याच्या राजधानीत प्रवेश करू शकणार नाही' असा वर मिळविला. तो वर मिळाल्यावर तो देवलोकात शिरून देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राला धमकी दिली की त्याने सिंहासन सोडावे. त्याच्याशी युद्ध करून त्याला जिंकण्याची हिम्मत इंद्रात नव्हती. म्हणून तो व वज्रनाभ कश्यप मुनीकडे गेले. दोघांनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे करण्याचे कबूल केले. त्यानंतर इंद्र कृष्णाला भेटला व गुप्तपणे काहीतरी कारस्थान ठरले. ते काम प्रद्युम्न करील असे कृष्णाने वचन दिले. वज्रनाभला प्रभावती नावाची एक मुलगी होती. तिची व प्रद्युम्नाची भेट घडवून आणून प्रद्युम्न तिच्याकडे ओढला जावा यासाठी इंद्राने त्याला वज्रपुरला पोहोचविण्याची व्यवस्था करून दिली. त्याने त्या कामावर शुचिमुखी नावाच्या एका हंसकुमारीला नेमले. ती प्रभावतीच्या उद्यानात गेली व प्रद्युम्नाच्या सौंदर्याचे वर्णन प्रभावतीसमोर केले. ते वर्णन ऐकून ती प्रद्युम्नावर इतकी भाळली की तिने त्याच्याशीच लग्न करण्याचे आपल्या मनाशी ठरवून टाकले. तिने त्या हंसकुमारीला विनवण्या केल्या की कशाही प्रकारे प्रद्युम्नाच्या मनात देखील तिच्याशीच लग्न करण्याची इच्छा उत्पन्न कर. शुचिमुखी प्रद्युम्नाकडे गेली व म्हणाली— "तुझ्या हातून एक महत्कार्य होणार आहे. तुझ्या हातून वज्रनाभ याचा वध करविण्यासाठी तुझे वडील श्रीकृष्ण यांनी इंद्राला वचन दिले आहे. तू वज्रनाभाची राजधानी वज्रपुर येथे पोहोचलास तर तुला आणखी एक फायदा होईल. वज्रनाभाची मुलगी प्रभावती एक त्रिलोकसुंदरी आहे. तिचा लाभ होईल." प्रद्युम्नाला हंसकुमारीने जे काही सांगितले तेवढे आवडल्यासारखे दिसले नाही. परंतु हंसकुमारी निघून गेल्यावर तिने प्रभावतीचे जे रूपवर्णन केले होते, त्याचे त्याला वारंवार स्मरण होऊ लागले व तिच्या प्रेमामुळे त्याला दुसरे काही काम सुचेनासे झाले. त्याने एका पोपटाबरोबर एक चिठ्ठी लिहून ती हंसकुमारीकडे पाठविली. शुचिमुखी वज्रनाभाकडे गेली व म्हणाली— "भद्र नावाचा एक नट आहे. त्याचे नृत्य ज्याने पाहिले नाही त्याचा जन्म व्यर्थ असेच म्हणावे लागेल." वज्रनाभाच्या मनात नटाचे नृत्य पाहण्याची इच्छा उत्पन्न झाली व त्याने त्याला घेऊन येण्यासाठी हंसकुमारीला सांगितले. शुचिमुखी प्रद्युम्नाला जाऊन भेटली व त्याला एक नटरूप घेऊन बरोबर यायला आणि आपले नाव 'भद्र' आहे असे सांगायला सांगितले. वज्रनाभाच्या अनुमतीशिवाय वज्रपुरमध्ये कोणी प्रवेश करू शकणार नाही असा वर मिळाला होता, परंतु त्याने स्वतःच आपल्या मृत्यूचे आवाहन केले. प्रद्युम्नाने नाचत असताना संकेत करून असे दर्शविले की तो प्रभावतीला भेटणार आहे. प्रभावतीला अर्थातच ते कळले, परंतु वज्रनाभाला मात्र ते काही कळले नाही. त्या दिवशी प्रभावतीकडे फुलांचे हार नेण्यात आले, त्यात एका भ्रमराचे रूप धारण करून प्रद्युम्न तिच्या महालात गेला. प्रभावती एकटी आहे असे पाहून तो प्रकट झाला. दोघांचा गांधर्व विवाह झाला. त्यानंतर प्रद्युम्न प्रभावतीच्या महालातच कित्येक दिवस लपून-छपून राहिला. पुढे काही दिवसांनी प्रभावतीला एक मुलगा झाला, त्याचे नाव प्रभांवात असे ठेवण्यात आले. इतके दिवस लोटल्यावर वज्रनाभला कळले की त्याच्या राजवाड्यात कोणी अनोळखी मनुष्य शिरला आहे. त्याने हुकूम सोडला की जो कोणी त्याच्या अंत:पुरात शिरला असेल त्याला धरून आणावे. प्रद्युम्न व वज्रनाभ यांचे युद्ध झाले. वज्रनाभाला वर मिळाला असल्यामुळे त्याला जिंकणे इंद्राला शक्य नव्हते, पण त्याने प्रद्युम्नाला सर्व प्रकारे मदत केली. त्या युद्धात वज्रनाभ ठार झाला. प्रद्युम्नाने प्रभावतीचा मुलगा प्रभांवात याला वज्रपुरच्या गादीवर बसविले व स्वतः प्रभावतीसह द्वारकेला आला.