Bookstruck

प्रेमाची किंमत

मगध राज्याच्या गादीवर चंद्रसेन नावाचा राजा बसताच त्याचे सहाध्यायी चौघे मित्र त्याच्याकडे, राजा काही मदत करील या आशेने आले. राजाने त्यांना विचारले— "तुम्हाला नोकरी देऊ की धन सहाय्य हवे?" एकजण म्हणाला— "मला धन सहाय्यच कर, म्हणजे मी स्वतःबरोबर चार चौघांना अन्नाला लावीन." चंद्रसेन राजाने त्या मित्राने मागितले तितके त्याला धन सहाय्य करून त्याला निरोप दिला. दुसरा म्हणाला— "धन घेऊन पुढे त्या भांडवलावर आणखी पैसे मिळविण्या इतका मला कोणताही धंदा येत नाही. तेव्हा मला आपल्या पदरी नोकरीच दे." चंद्रसेनने त्याला एका पदावर नेमून चांगला पगार द्यायची व्यवस्था केली. तिसरा म्हणाला— "शेतीभातीची कामे करून त्यावर आपल्या कुटुंबाचा निर्वाह मला चालविता येईल." चंद्रसेन राजाने त्याला हवी होती तेवढी जमीन दिली. चौथा म्हणाला— "राजा, मला तुझ्या प्रेमाव्यतिरिक्त आणखी कोणत्याही गोष्टीची गरज नाही. तेवढे मिळाले की ते मला अष्टसिद्धी व नवनिधी मिळाल्यासारखंच आहे. शिवाय माझ्यासारखा मित्र मिळाल्याचा तुझ्यासारख्या राजाला सुद्धा काही तरी फायदाच होईल." त्याचे नाव रामदास होते. आपल्या प्रेमाचा रामदासाला कसा काय उपयोग होतो हे पाहू या, असा विचार करून चंद्रसेन राजाने त्याला होकार दिला. चंद्रसेन राजा दररोज संध्याकाळी आपल्या उद्यानात विहार करण्यासाठी रथात बसून जात असे. तेव्हा रामदासाला बरोबर बसवून नेई. ते पाहून तो राजाचा एक आत्मीय असल्याचे नागरिकांना, व्यापाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कळलं. एके दिवशी रथ बाजारातून जात असतां रामदास राजाला म्हणाला— "मला थोडं काम आहे, येथल्या एका दोघां व्यापाऱ्यांना भेटायचं आहे," असे सांगून तो रथातून उतरून गेला. लगेच मोठमोठे व्यापारी रामदासच्या चारी बाजूला घोळका करून उभे राहिले. रामदासाने त्यांना राजा लवकरच नवे कर बसविणार असल्याचे सांगितले. लगेच व्यापाऱ्यांनी रामदासाला अनेक भेटी सादर केल्या व राजाने त्यांच्यावर नवीन कर लावू नये यासाठी सर्व प्रयत्न करायला विनविले. रामदासाने नकार दिला नाही. व्यापारी दर आठवड्यात त्यांना जो फायदा होई त्यातला काही भाग रामदासाला आणून देऊ लागले. थोड्याच दिवसात रामदासाची राजधानीतला एक श्रीमंत म्हणून गणना होऊ लागली. हा सर्व व्यवहार फार गुप्तपणे होई. व्यापाऱ्यांचे हिशोब तपासणारे सरकारी अधिकारी व न्यायाधीश सर्वांना त्यांचा वाटा परस्पर पोचता होई. काही दिवसांनी रामदासाने राजधानीतच एक मोठा वाडा बांधला आणि गृहप्रवेशाच्या वेळी राजाला, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, प्रमुख व्यापाऱ्यांना निमंत्रणे पाठविली. त्याने एक मोठी मेजवानी दिली व त्यावेळी नृत्य गायनाची व्यवस्था केली. राजाने चकित होऊन रामदासाला विचारले— "काय रे, इतक्या थोड्या अवधीत इतके पैसे कसे काय मिळविलेस?" "महाराज, आपली कृपा असली तर मोठमोठी राज्ये सुद्धा मिळतील!" रामदास म्हणाला. "तू हे सर्व वैभव कसे संपादन केलेस हे सांगशील का?" राजाने त्याला विचारले. "उद्या रात्री माझ्या घरात माझ्या खोलीत आपण लपून बसावे आणि सर्व गोष्टी पहाव्या व ऐकाव्या. आपल्या कृपेचा लाभ मला जो झाला तो आपल्या समक्ष आहेच. आपल्याला जो फायदा होईल तोही पहावा." रामदास म्हणाला. दुसऱ्या दिवशी रामदासाने हिशोब तपासणीसास व न्यायाधिशाला कळेल अशी अफवा उडविली. त्या दिवशी रात्री राजा रामदासाच्या घरी त्याच्या बैठकीच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत लपून बसला. काही वेळाने हिशोब तपासणीस आला व म्हणाला— "या खेपेस माझा वाटा सुद्धा तुम्हीच ठेवून घ्या आणि मला एका गोष्टीचं सहाय्य करा." "कोणती मदत पाहिजे तुम्हांला?" रामदासाने त्याला विचारले. "मी मन लावून काम करीत नसल्याचे ऐकून महाराजांनी मला काढून टाकून आणखी एकाला नेमण्याचे ठरविले असल्याचे कळले आहे. मिळकत होत होती, ती एकाएकी बंद होणार की हो! मी मन लावून काम करीत असल्याचे महाराजांच्या कानावर घालून माझी नोकरी कायम राहील असे काहीतरी करा." तपासणीस म्हणाला. "ठीक, करतो काहीतरी!" रामदास म्हणाला. तो निघून गेल्यावर थोड्या वेळाने न्यायाधीश येऊन म्हणाला— "या खेपेस माझा वाटा सुद्धा तुम्हीच ठेवून घ्या आणि महाराज माझी बदली करणार आहेत ती थांबवा. व्यापारी ज्या जागी नाहीत व फक्त शेतकरी जेथे राहतात तेथे काय मिळकत होईल हो?" "ठीक, करतो काहीतरी!" रामदास म्हणाला व त्याला निरोप देऊन राजाला येऊन म्हणाला— "पाहिजेत, महाराज! आपली मर्जी संपादन करून मी सर्व लाचखाऊंना स्वतःकडे लोहचुंबकासारखे आकर्षित करून घेतले आहे. आपल्या सरकारात लाचखाऊ लोकांना बाहेर काढायला आपल्या प्रेमाचा उपयोग झाला की नाही?" चंद्रसेन राजाने ते मान्य केले आणि हिशोब तपासणीसाला व न्यायाधीशाला योग्य कारण सांगून कमी केले.