Bookstruck

प्रोत्साहन - पारितोषिक

कुसुमपूर गावात दरवर्षी चित्रकला स्पर्धा होत असत. देशातले अनेक चित्रकार या स्पर्धेत भाग घेत. विजेत्यांना मूल्यवान पारितोषिके दिली जात. प्रत्येकाला वाटे की हे पारितोषिक त्याच्या प्रतिष्ठेचे चिन्ह आहे. या वर्षीही चित्रकलास्पर्धा आयोजित झाली. देशातल्या सर्व प्रांतांमधून चित्रकारमंडळी आपापल्या चित्रांसह कुसुमपूरला पोचली. सुगंधपूरचा विश्वास नावाचा एक तरुण चित्रकारही आपल्या चित्रांसह स्पर्धेसाठी कुसुमपूरला पोचला. तो जेव्हा परत सुगंधपूरला गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी विचारले, "काय रे, मिळालं का तुझ्या एखाद्या चित्राला पारितोषिक?" जरा चिंता प्रकट करत विश्वास म्हणाला, "मला फक्त 'प्रोत्साहन-पारितोषिक'च मिळालं." यावर मित्र म्हणाले, "अरे प्रोत्साहन-पारितोषिकच मिळाल्याबद्दल वाईट वाटायचं काय कारण? कित्येक असेही चित्रकार असतील, की त्यांना हे पारितोषिकही मिळालं नाही." अशा प्रकारे त्यांनी विश्वासाचे सांत्वन केले. "अरे, पण मला त्याबद्दल वाईट नाही वाटत आहे! मला पुरस्कार म्हणून मिळालेलं पुस्तक पाहून वाईट वाटतंय!" विश्वासाने सांगितले. "कसले पुस्तक आहे पाहू!" मित्रांनी विचारल्यावरून त्याने पुस्तक दाखवले. त्या पुस्तकाचे नाव होते - ‘चित्र कसे काढावे?’ — रामचन्द्र भंडारी