फरारी नवरा, लक्ष्मीसारखी बायको
भल्या पहाटे उठून, घागर घेऊन, राधा पाणी आणण्यासाठी गावाबाहेर असलेल्या मळ्यातील विहिरीवर निघाली. अंधार असला तरी सरावाच्या पायऱ्या उतरून राधेने घागर भरली, पण अचानक तिच्या हातून घागर सुटून विहिरीत बुडाली. यामुळे अस्वस्थ चित्ताने पायऱ्या चढून वर येऊन, 'कुणी मदतीसाठी मिळेल का?' या आशेने ती इकडे-तिकडे बघू लागली.
इतक्यात शेजारच्या आंब्याच्या झाडामागून एक युवक बाहेर येत म्हणाला— "इतकी गावे बघितली, पण तुमच्या गावची सर कोणत्या गावाला नाही. डोंगराच्या कुशीत फळांच्या राईंनी, रम्य वनश्रीने नटलेले हे गाव फारच आवडले बुवा आपल्याला." क्षणभर थांबून तिच्याकडे निरखून बघत तो म्हणाला— "इतक्या पहाटे एका बाईने एकटीनेच अशा निर्जन जागी येणे..."
भांबावलेल्या अवस्थेत त्याच्याकडे क्षणभर बघून स्वतःला सावरत राधा म्हणाली— "दररोज माझी आत्याच पाण्याला येते, पण तिला ताप येतो आहे. ती जागी झाली तर मला पाणी आणू देत नाही, म्हणून अंधार असतानाच पाणी न्यायला आले होते. पण माझी घागर हातांतून सुटून विहिरीत बुडाली आहे. तुम्हांला पोहता येत असेल तर घागर काढून देता का?"
"पोहणे? अहो, मी तर पट्टीचा पोहणारा आहे." असे म्हणत त्या तरुणाने आपला अंगरखा काढून झाडावर लटकवला व त्या विहिरीत सूर मारला आणि काही वेळातच भरलेली घागर घेऊन वर आला.
राधेला आनंद झाला. घागर डोक्यावर ठेवीत— "तुम्ही मजवर फार मोठा उपकार केला आहे," असे ती म्हणाली व तिने घराचा रस्ता धरला. अंगात सदरा घालीत तो म्हणाला— "मदत करणाऱ्याला आपले नावसुद्धा सांगितले नाहीत, माझे नाव मोहन आहे." पुढे पुढे जात असताना राधा ओरडून म्हणाला— "माझे नाव राधा."
दुसऱ्या दिवशी सुद्धा भल्या पहाटे पाण्याला येऊन राधेने विहिरीतून घागर भरून घेतली व पायऱ्या चढून वर येत असताना शेजारच्या बकुळीजवळ उभा असलेला मोहन तिच्या दृष्टीस पडला. पण पहिल्यासारखे करून ती पुढे निघाली. तेव्हा मोहन हसत म्हणाला— "तुमच्या आत्याचा ताप कमी झाला नाही, देव माझ्या नवसाला पावाला. मी तुम्हाला पुन्हा बघू शकलो!"
"दुसऱ्याला त्रास व्हावा असे ज्यांना वाटले त्यांच्या तोंडी देवाचे नाव?" असे राधा उद्गारली. यावर मोहन म्हणाला— "माझ्या नवसामुळे तुम्हाला त्रास होतोय की तुमच्या आत्या बाईला?"
"माझ्या आत्याला तुमच्याबद्दल अजून काही माहीत नाही, जर कळले तर डिवचल्या गेलेल्या वधुणीसारखी चवताळून उठेल. आमच्या घराण्यात बायका परक्या माणसाबरोबर अशा बोलत नाहीत." असे म्हणत राधा झपाट्याने निघून गेली.
नंतर दररोज सकाळी विहिरीजवळ बोलून चार दिवसांत मोहनने तिचा विश्वास संपादन केला व एके दिवशी सकाळी म्हणाला— "मी हे निसर्गरम्य गाव सोडून उद्या परत जात आहे. हे गाव, इथले निसर्ग सौंदर्य, वातावरण मला फारच आवडले आहे. तू तर या सगळ्यातून जास्त आवडली आहेस. म्हणून उद्या परत गेल्यानंतर आमच्या घरच्या वडील मंडळीस तुझ्या घरच्या मोठ्या माणसांशी बोलाचाली करण्यासाठी घेऊन येईन व तुला नेहमीसाठी आमच्या गावी घेऊन जाईन."
राधा काहीच न बोलता अडखळणाऱ्या पायांनी घरी पोहोचली. तिचे मन अतिशय बेचैन झाले होते. अशा वेळी बहुधा ती आपल्या मैत्रिणीकडे—नंदिनीकडे—जात असे. त्या दिवशी तिच्या मनाची चलबिचल ओळखून नंदिनीने त्या बेचैनीचे कारण विचारले. राधेने तिला अथपासून इतिपर्यंत सर्व काही सांगितले व त्याची आपल्या बरोबर विवाहबद्ध होण्याची इच्छा असल्याचे सुद्धा सांगितले.
हे सर्व ऐकून नंदिनी म्हणाली— "वेडे, ही तर आनंदाची गोष्ट आहे, अशी हताश का होत आहेस?" यावर विषादयुक्त स्वरांत राधा म्हणाली— "तो राजाच्या शिपायांची नजर चुकवून फिरणारा आरोपी आहे!" तिच्याकडे आश्चर्य व अविश्वासाने पाहत असलेल्या नंदिनीला तिने एक चिठ्ठी दाखविली. नंदिनीने चिठ्ठी वाचली— "मोहन! तुझ्यासाठी राजाचे शिपाई शोध करीत आहेत. कुण्या तरी अज्ञात गावी निघून जा."
असा मजकूर वाचून ती स्तब्ध राहिली. पण तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह कायम होते. राधा तिला म्हणाली— "ही चिठ्ठी पहिल्याच दिवशी त्याने आपला सदरा काढून झाडावर टाकला होता, तेव्हा त्यातून खाली पडली होती व मी कुतूहलाने ती उचलून स्वतः जवळ ठेवली."
क्षणभर विचार करून नंदिनी म्हणाली— "तो गुन्हेगार आहे, शिपाई त्याच्या मागावर आहेत, हे कळून सुद्धा तू त्याच्याशी बोलत राहिलीस, यावरून सिद्ध होते की हा तरुण तुला आवडला आहे. तर आता असे कर, उद्या सकाळी तो भेटेल तेव्हा त्याला— 'लग्नाआधी आपणास एकमेकांची संपूर्ण माहिती असणे इष्ट, तेव्हा तुमची सगळी माहिती सांगा', असे म्हण."
मैत्रिणीच्या सल्ल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राधेने मोहनला तसे विचारले. त्यावर किंचित हसून तो म्हणाला— "हे मात्र छान आहे, स्वतःबद्दल किती सांगितलंस तू मला? आई-वडिलांना पारख्या असलेल्या तुला तुझी आत्या नानाप्रकारे छळते, हे साधे सत्य तरी तू मला सांगितलेस का?"
हे ऐकताच राधेचे डोळे भरून आले, तिने आपले तोंड हातांनी झाकले. समजावून सांगण्याच्या सुरात मोहन म्हणाला— "तुझ्याबद्दल सर्व माहिती कळ्याबरोबर मी तुला जीवनसंगिनी बनवण्याचा निश्चय केला आहे. इतका जाच सहन करीत तू हसतमुख कशी राहतेस, देव जाणे!"
डोळे पुसत निश्चयी स्वरांत राधा म्हणाली— "नशिबी जे कष्ट आहेत ते सहन करताना खचून जाणे बरे नव्हे."
मोहन म्हणाला— "तुझ्या या सद्गुणांवर मोहित होऊनच तर मी तुझ्याशी लग्न करू इच्छितोय."
त्याच्याकडे मंद नजरेने बघत राधा म्हणाली— "तुम्ही म्हणता त्या लक्षणांनी युक्त असलेली मुलगी एका फरारी गुन्हेगाराशी लग्न करण्यास तयार होईल असे तुम्हाला कसे वाटले?"
या प्रश्नामुळे आश्चर्यचकित झालेल्या मोहनला तिने ती चिठ्ठी दाखविली. चिठ्ठी पाहून जोराने हसत तो म्हणाला— "ह्यात लिहिलेला मजकूर मला उद्देशूनच आहे, पण ही चिठ्ठी कुणी लिहिली का लिहिली हे तर जाणून घे." असे म्हणत मोहनने स्वतःबद्दलची समग्र माहिती सांगण्यास सुरुवात केली.
त्याचे वडील लक्षाधीश असून त्यांना पैशापलीकडे काहीच महत्त्वाचे वाटत नाही. आईचा स्वभाव मात्र एकदम विरुद्ध. वडिलांनी घरात कुणालाही न विचारता मोहनचे लग्न गावातील एका फार श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीबरोबर ठरविले. ती मुलगी अतिशय कुरूप होती. मोहनला त्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा संन्यास घेणे इष्ट वाटले. मुलाचे मन आईला कळत होते, तिने सल्ला दिला की चार दिवसांवर मुहूर्त येऊन ठेपला आहे, हे चार दिवस मोहनने कुणातरी मित्राकडे लपून राहावे— म्हणजे मुलीचा बाप ऐन वेळी इज्जत वाचवण्यासाठी वाटेल तितका पैसा खर्चून आपल्या मुलीचे लग्न कुणाशी तरी लावून देईल व त्याच्या मागची पीडा टळेल.
त्यानुसार मोहन गावातील एका मित्राकडे लपून राहिला होता, पण त्याच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद सरकार दरबारी नोंदविली. मोहनच्या आईला हे वृत्त कळताच तिने विचार केला की गावातच राहिल्यास राजाचे शिपाई त्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाहीत, म्हणून कुण्यातरी दूर ठिकाणी पळून जाऊन लपून राहण्याबद्दल आपल्या एका वृद्ध व विश्वासू सेवका हाती आईने ती चिठ्ठी पाठविली होती.
"ही आहे माझी समग्र माहिती. आता तुला सर्व सविस्तर कळले आहे, आता तरी आपल्या विवाहास तुझी संमती आहे ना?" खाली मान घालून पायाच्या बोटांनी जमीन उकरीत असलेल्या राधेस मोहनने विचारले.
राधेने हसत विचारले— "मी मूर्ख म्हणा की अडाणी म्हणा, पण जेवढे कळणे आवश्यक आहे ते समजून घेण्याची अक्कल तर देवाने मला दिली आहे ना?"
"या प्रश्नाचे उत्तर लग्नानंतर माझी आई देऊ शकेल. वडील मात्र स्वतः बरोबर लक्ष्मी घेऊन येणारी सून न मिळाल्याची नाराजी विसरू शकतील व त्यांना आनंद होईल याची खात्री मला आहे, कारण त्यांना लक्ष्मीसारखी सून लाभली आहे." असे सांगून मोहन म्हणाला— "आताच निघतो आणि आई-वडिलांना घेऊनच पुढील गोष्टी ठरविण्यासाठी घेऊन येतो." आणि तो गावी जाण्यासाठी निघाला.