बदललेले जोडपे
एका गावी रंगनाथ आणि रत्ना नावाचे नवरा-बायको रहात असत. त्या जोडप्याचे लहानसहान कारणावरून दररोज भांडण होत असे. रात्रंदिवस त्यांचे भांडण होई. गावातल्या काही वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांना किती समजावून सांगितले. परंतु कोणाच्या उपदेशांचा त्यांच्या मनावर यत्किंचितदेखील परिणाम झाला नाही.
दोघांचे भांडण होत राही. परंतु परस्परांना दोघं धरून होती. त्यांना रामू नावाचा एक मुलगा झाला. तो दोघांना जीव की प्राण होता. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे भांडण थांबले. रामू लहानाचा मोठा होत गेला तसतसे आईवडिलांचे रोज होणारे भांडण त्याला मुळीच आवडतनासे झाले. ते तो पहात होता. तेव्हा हे भांडण कसे थांबवायचे याचा तो विचार करू लागला. त्याला फक्त बारावेच वर्ष लागले असेल तो गुरे चरायला नेई तेथे देखील तो हीच चिंता करीत बसे.
एकदा तो असा बसला असता त्यांच्या गावचा भूतबाधा दूर करणारा मांत्रिक आला. त्याने त्याला विचारले-"काय रे, फार विचारात दिसतो आहेस?"
रामू त्या मांत्रिकाला आईवडिलांच्या भांडणाची गोष्ट सांगून म्हणाला-"त्या दोघांचे भांडण चालू असले म्हणजे मला काही सुचतच नाही."
तो म्हणाला-"बाबा रे, तुझ्या आई-वडिलांचा स्वभाव बदलण्यासाठी तुला थोडे बदलावे लागेल. मी एक युक्ती सांगतो, तसे कर." असे सांगून त्याने रामूला काहीतरी समजावून सांगितले.
संध्याकाळी रामू गुरांना घेऊन घरी परतल्याबरोबर आईला म्हणाला-"आई, माझा एक सदरा धुवून वाळत टाकायला तुला सांगितला नव्हता का सकाळी? इतकं कसं ग विसरतेस तू? तुला एकच एक मुलगा आहे, ही गोष्ट तरी तुझ्या लक्षात आहे की नाही, शंकाच!" असे म्हणत वाकड्या-तिकड्या उड्या मारू लागला.
त्याचे हे विचित्र वागणे पाहून रत्ना घाबरून गेली. रामू पूर्वी कधी असे उलट बोलला नव्हता आणि आज एकाएकी त्याला काय झाले तिला कळेना. त्याने सदरा धुवून ठेव म्हणून सांगितलेच नव्हते. काही तरी विशेष कारण असले पाहिजे असा विचार करून ती काही बोलल्याशिवाय बाजारातून सामान घेऊन यायला निघाली.
काही वेळाने रंगनाथ शेतावरून परतला. त्याने मुलाला ढोपरात मान खुपसून बसलेला पाहून विचारले-"काय रे, असा कां बसला आहेस? बरं नाही का?"
"बरं नसायला काय झालं आहे? डोकं वर करून चालणंदेखील कठीण वाटू लागलं आहे!" रामू म्हणाला.
"तसं वाटू लागायला कारण काय, सांगशील तरी?" रंगनाथाने विचारले.
"अंगात घालायला चांगले कपडे नाहीत, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, अनवाणी चालावे लागते. एकुलत्या-एका मुलाला असंच वागवायचं असतं नाही का?" रामूने चिडल्यासारखे उत्तर दिले.
ते ऐकून रंगनाथाची भूक तहानच उडाली. रामू बापाजवळ असे उर्मटपणाने चुकूनदेखील कधी बोलला नव्हता.
इतक्यात रत्ना बाजार करून घरी आली. बापाजवळदेखील तो नेहमीसारखा बोलत नाही आहे हे पाहून तिच्या छातीत 'धस्स' झाले. रात्री जेवतानासुद्धा रामू आईवडिलांशी विचित्रपणेच वागला, बोलला. कारण तो मांत्रिकाच्या सल्ल्याप्रमाणे सर्व नाटक करीत होता. एक आठवडा लोटला.
रत्ना विचारत म्हणाली-"याला काही तरी भूतपिशाच बाधा तर झाली नसेल. मांत्रिकाला बोलावून पाहू या का?"
"मत्रतंत्र काय घेऊन बसली आहेस? औषध देवविले पाहिजे वैद्याचे!" रंगनाथ म्हणाला.
"या रोगाला औषध कोण देणार? चांगला मांत्रिक कोणी असेल तर क्षणाभरात मंत्र टाकून मुलाला शुद्धीवर आणील." रत्ना म्हणाली.
"वैद्याशिवाय या आजाराला इतर कोणतीही चिकित्सा कामाची नाही." रंगनाथ म्हणाला.
दोघा नवरा-बायकोची बरीच बाचाबाची झाली. रामू काही वेळ ऐकत राहिल्यावर म्हणाला-"मी सांगतो त्या मांत्रिकाकडेच पाहिजे तर मी यायला तयार आहे!"
मी कोणाकडे येत नाही, असे न सांगता त्या वेडातही एका मांत्रिकाकडे यायला तयार आहे हे ऐकून नवरा-बायकोच्या मनाचे थोडे समाधानच झाले. दोघं मांत्रिकाकडे त्याला घेऊन गेली.
त्यांनी सांगितले ते सर्व ऐकून घेऊन मांत्रिक म्हणाला-"तुमच्या मुलाचा हा आजार बरा होणे तितकेसे कठीण वाटत नाही. मी तुम्हां दोघांना एकेकट्याने एक प्रश्न विचारीन. त्या प्रश्नाचे तुम्ही खरे ते उत्तर सांगितलेत तर मी एका क्षणात त्याचा आजार बरा करून दाखवितो."
त्याने प्रथम रंगनाथाला निराळे बोलावून विचारले-"रामू तुझाच मुलगा ना खरं सांग?"
तो प्रश्न ऐकून रंगनाथ चकितच झाला. पण रागावल्याशिवाय म्हणाला-"होय!"
नंतर त्याने रंगनाथाला परत पाठवून त्याच्या बायकोला बोलावून तोच प्रश्न विचारला-"रामू तुझाच मुलगा ना?" ती देखील चकित होऊन म्हणाली-"होय! नाही तर काय?"
नंतर त्याने दोघांना एकत्र बोलावून म्हटले-"तुम्ही दोघांनी बरोबर उत्तर दिले नाही. एका आठवड्याने विचार करून येऊन पुन्हां याच प्रश्नाचे उत्तर द्या."
एक आठवडा लोटला. दोघे मांत्रिकाकडे आले. त्याने दोघांना निरनिराळे बोलावून पुन्हां तोच प्रश्न विचारला.
या खेपेस रंगनाथाने बराच विचार केल्यासारखे उत्तर दिले-"तो माझ्या बायकोचा मुलगा आहे हो!"
रत्नाने उत्तर दिले-"तो माझाच मुलगा हो!"
या खेपेस मांत्रिक थोडे स्मित करून म्हणाला-"पुन्हां दोघांची उत्तरे बरोबर नाहीत. आणखी खूप विचार करून एका आठवड्यानंतर येऊन बरोबर काय ते उत्तर द्या."
रामूचे वेड दिवसेंदिवस वाढतच गेले. या खेपेस काय उत्तर द्यावे, याचा परस्परांशी विचार करून दोघे काही तरी ठरवून उत्तर द्यायला एका आठवड्याने आले. मांत्रिकाकडे पोचल्यावर दोघांनी निरनिराळे भेटूनही एकच एक उत्तर दिले-"तो आमचा दोघांचा मुलगा आहे हो!"
या वेळी मांत्रिक मोठ्याने हसला आणि म्हणाला-"फक्त याच वेळी तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेत. इतक्या दिवसांनी तुमच्या मानेवरचे भूत पळाले आणि तुम्ही दोघे परस्परांशी डोके ठिकाणावर ठेवून बोललात. नवरा-बायकोने परस्परांशी बोलायचे नाही, जे बोलायचे ते भांडणासाठीच! परस्परांचा सल्ला घेण्यासाठी नाही तर ते बोलणे म्हणजे परस्परांविरुद्ध ओढाताणच नाही का? आयुष्यभर भांडतच राहणार का? रामूला काही झालेले नाही. त्याने माझ्या सल्ल्यानेच हे सर्व नाटक केले होते. दोघं परस्परांच्या हिताच्या गोष्टी बोला. परस्परांचा सल्ला घ्या. तुमचा मुलगा म्हणजे एक रत्न आहे. तुम्ही आपल्या भांडणामुळे त्याला नको जीव करून सोडले होते."
रंगनाथ आणि रत्नाची चांगलीच कान-उघाडणी झाली. त्यांनी भांडायचे सोडले. रामूचे पुढील आयुष्य सुखाचे झाले.