बाभूळ तलावांतली हडळ
कमला सासरी आल्यानंतर आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच तिच्या लक्षात आले की तिचा नवरा रमेश एक नंबरचा आळशी आहे. शेतीवाडीचे सगळे काम तिचे साठ वर्षांचे माधव सासरा पाहत होता.
रमेश उशिरापर्यंत लोळत पडायचा. जेवण झाले की गावात इकडेतिकडे टवाळकी करायला जायचा. अंधार पडला की घरी येऊन जेवायचे नि झोपी जायचे! रमेशचा हा दिनक्रम कमलेला सहन होईना, म्हणून ती त्याला म्हणाली, "मामंजींचे आता वय झालंय. तुम्ही आता जरा शेतीवाडीचे काम पाहायला लागा आणि त्यांना विश्रांती द्या."
तिचा हा सल्ला ऐकून रमेश हसतच सुटला व तिला म्हणाला, "तू आल्यानंतर त्यांना आता काही स्वयंपाक करावा लागत नाही. त्यांचा आरामच चाललाय की!"
रमेशला सांगून त्याचा काही फायदा होत नाही हे बघितल्यावर ती सासऱ्यांना म्हणाली, "तुम्ही शेतावर निघाला आहात तर तुमच्या मुलालाही घेऊन जा. तुम्ही एकटेच किती दिवस कष्ट करीत राहणार?"
माधवने हसतच म्हटले, "त्याची आई त्याच्या लहानपणीच वारली, तेव्हापासून मी त्याला अगदी लाडात वाढवलंय. त्याने शेतात राबणे हे मलाच पसंत नाही. झोपू दे त्याला!" आणि तो शेतावर निघून गेला.
त्याच दिवशी संध्याकाळी माधवलाल साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एक आठवडा उलटला तरी रमेशच्या दिनक्रमात काडीचा बदल झाला नाही.
एक दिवस जेवण वाढताना कमला रमेशला म्हणाली, "आता जर तुम्ही शेतीच्या कामात लक्ष घातले नाहीत तर कामे कशी होतील? बियाणे पेरायची कामे सुरू झाली आहेत."
"हे बघ, यापुढे शेतीच्या कामासंबंधी तू मला काही एक सांगायचे नाहीस." रमेशने चिडून सांगितले.
"मग घर कसं चालेल? तुमचा विचार बदलायला हवा." कमला म्हणाली.
"मी बदलणार नाही. ती सगळी कामे तूच सांभाळ की!" असं गुर्मीत उत्तर देऊन भरपेट जेवून तो गावात फिरायला निघून गेला.
कमला थक्क झाली. तिने खूप विचार केला, पण नवऱ्याची ही बेपर्वा वृत्ती कशी बदलता येईल हे काही तिला सुचेना. विचारांत ती इतकी गुंगली होती की रात्रीचा स्वयंपाक करायला ती विसरून गेली. अंधार पडल्यानंतर रमेशने घरात पाय ठेवला आणि म्हणाला, "पोटात कावळे ओरडताहेत, लवकर पान मांड."
कमलानेही रागाने उत्तर दिले, "तुम्ही शेतीवाडीचे काय बघायला स्पष्ट नकार दिलात, मीही जेवण बनवले नाही. शेतात काम करायला लागलात की त्या वेळी जेवण मिळेल."
रमेश रागावून तिच्याकडे बघतच राहिला आणि थोडा वेळ वाट पाहून घरातून बाहेर पडला. अंधारात तो कुठल्या दिशेला जातो आहे याचे त्याला भान नव्हते.
अखेरीस जंगलालागत असलेल्या 'बाभूळ तलावा'जवळ तो आला. तलावाच्या काठावर बाभळीची खूप झाडे होती, म्हणून त्या तलावाला बाभूळतलाव म्हणायला लागले. काठावर काही खूप पारंब्या असलेली मोठी वडाची झाडेही होती.
"मीही एका चांगल्या शेताचा मालक आहे आणि अशा रात्री उपाशीपोटी मला गावाबाहेर भटकत राहावे लागते आहे. असं कसलं आहे हे माझं आयुष्य?" स्वतःशीच बडबडत तो चालला होता. अंधारात त्याला समोरचा वृक्ष दिसला नाही. तो सरळ त्याच्या बुंध्यावर आपटला आणि तलावात पसरून पडला.
पण दुसऱ्याच क्षणी वडाची एक पारंबी त्याच्या हातात आली, ती पकडून तो काठावर येऊ शकला. तिथे एका हडळीने त्याला विचारले, "कशासाठी मरणार होतास रे? मी जर ती पारंबी तुझ्याकडे फेकली नसती तर एव्हाना तू मेलेला असतास."
हडळीला बघून रमेश घाबरला होता. पण तिचे बोलणे ऐकून त्याला जरा धीर आला. तिला आता काय उत्तर द्यावे याचा तो विचार करू लागला. ती पुढे म्हणाली, "मी इथे बसल्याबसल्या देवाची प्रार्थना करीत होते की काही चांगलं काम करून पुण्य कमावीन आणि परलोकांत जाईन. तुझ्यामुळे माझ्या प्रार्थनेत व्यत्यय आला की!"
हडळीचे बोलणे ऐकून रमेशला वाटलं की ही कुणी धर्मपरायण हडळ असावी. त्याने मुद्दामच दुःखभरल्या आवाजात म्हटलं, "मला वाचवून तुम्ही मोठं पुण्य केलं आहे. माझ्याजवळ एक पैसादेखील नाही. मी माझ्या पत्नीचा सांभाळ कसा काय करणार?" आणि जणू त्याच्यासाठी तो तलावात आत्महत्या करायला निघाल्याचे त्याने नाटक केले. "अरे, थांब, असं नको करूंस!" असं म्हणून हडळ उडत झाडावर गेली आणि तिने एक गाठोडे आणून रमेशला दिले.
"हे धन घेऊन मी आता सुखाने जगेन. आम्ही सारेजण तुझ्यासाठी अवश्य प्रार्थना करू." असं म्हणून रमेश मोठ्या खुर्चीत (तोऱ्यात) घराकडे परतला.
घरी पोचल्याबरोबर त्याने ते गाठोडे कमलासमोर फेकले आणि सांगितले, "मनांत आलं तर क्षणांत मी असे धन कमावू शकतो. आणि हा काही चोरीचा माल नाही, समजलं?"
कमला अतिशय आनंदून गेली. पण दुसऱ्या दिवशी रमेशने त्यांतली थोडी रक्कम घेतली आणि जुगारात ते पैसे घालवले. जेव्हा तो घरी परतला तेव्हा कमलाने मोठ्या कडवटपणाने म्हटले, "असे खर्च करीत बसलात तर घर कसं चालेल? शेती करण्यांत तुमचं मन लागत नसेल तर एखादा लहानसहान व्यापार तरी सुरू करा." कमलेने सुचवलं.
"कुणी मला सूचना करायला लागलं की मला खूप राग येतो. यापुढे तू मला शिकवत जाऊ नकोस." रमेशने कमलाला ताठरपणे सांगितले.
महिनाभरांतच हडळीने दिलेले सारे धन संपून गेले. रमेश पुन्हा एका रात्री बाभूळतलावाकडे गेला. तलावात बुडण्याचे नाटक पुन्हा त्याने केले आणि हडळीकडून पुन्हा धनाचे गाठोडे घेतले. त्याच्या हातातले गाठोडे पाहून कमला स्तंभित झाली.
रमेशच्या चैनीच्या सवयी दिवसेंदिवस वाढतच गेल्या. या खेपेला त्याने वीस दिवसांतच सगळे पैसे उडवले. नवऱ्याला रागावून काहीच उपयोग होणार नाही हे कमलाला माहीत होतं. ती शांतपणे म्हणाली, "घरात फुटकी कवडीदेखील नाही, तेव्हा काय करायचं?"
त्या रात्री तो बाभूळतलावाकडे जायला निघाला. कमला पाळतीवर होतीच. यावेळी त्याच्या पाठोपाठ जाऊन तो हे धन कुठून आणतो याचा छडा लावायचा असा तिने निश्चय केला. एका झाडाच्या मागे ती लपून बसली आणि रमेशने त्या हडळीकडे कसं धन मागितलं ते तिने बघितलं. रमेश जसा बांधावरून खाली उतरला, तसे कमलानेही तलावात उडी मारायचे नाटक केले.
हडळीने तिला लगेच थांबवून विचारले, "थांब, तुझ्यावर असं कोणतं संकट आलंय की ज्याच्यामुळे तुला मरावंसं वाटतंय?"
"माझ्यावर आलेलं संकट तुझ्यामुळे आलंय!" कमलाने सांगितले.
"माझ्यामुळे तुझ्यावर संकट आलंय? म्हणजे मी काय केलंय?" हडळीने आश्चर्याने विचारले.
"तुझ्यामुळे माझा नवरा एकदम आळशी झाला आहे. त्याला असलेल्या व्यसने कमी होती, म्हणून नव्या व्यसनांच्या तावडीत तो सांपडला आहे. अयोग्य माणसाला मदत करणे याच्यापेक्षा मोठे पाप कोणतेही नाही. तुला इतकेदेखील माहिती नाही?" कमलाने कठोरपणे विचारले.
"मी तर समजत होते की या बिचाऱ्याला मदत करून मी पुण्यच मिळवते आहे. पण माझ्याकडून पाप घडत होतं हे मला आता समजलं. आता याचं प्रायश्चित्त मी कसं करू?" हडळीने दीनवाण्या स्वरात विचारले.
कमलाने हडळीला समजावून सांगितले की तिचा पती तलावात उडी मारून मरायचं नाटक करत होता. आता पुन्हा तो येईल तेव्हा काय करायला हवं हेही कमलाने हडळीला सांगितलं.
या वेळेला तर रमेशने मिळालेले धन पंधरा दिवसांतच संपवून टाकले; आणि एका रात्री पुन्हा तो बाभूळतलावाकडे गेला व तलावात उडी टाकून मरण्याचा प्रयत्न करायचे नाटक त्याने पूर्वीसारखंच केलं.
हडळ किचकिचत हसत सुटली आणि त्याला म्हणाली, "तू अत्यंत आळशी आहेस. पत्नीच्या कष्टावर जगणारा महापापी आहेस. पाण्यात बुडून मरायचं नाटक तू आजवर केलंस, आता याच्यापुढे तुझं रक्षण मी नाही, हे झाड करील. तूही भूत बनून या झाडावर लवकरच राहायला येशील." असं म्हणून ती अंधारात विलीन झाली.
हडळीचे बोलणे ऐकून रमेश भीतीने थरथर कापायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपला नवरा शेतावर कामाला जायला निघाला होता. ते पाहून कमला अगदी खूश झाली आणि तिने मनोमन त्या हडळीबद्दल धन्यवाद दिले.