बिंदुसाराची चित्रकला
बिंदुसारचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. श्रीमंत व्हावे अशी त्याची खूप इच्छा होती. त्यासाठी करून त्याने दिवसरात्र काबाडकष्ट करून त्याने बरीच संपत्तीही जमवली. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून तो दूर राही. तसेच कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करत नसे. त्यामुळे व्यापार करण्याइतकी संपत्ती त्याच्याजवळ गोळा झाली. सुरुवातीला त्याने लहान प्रमाणांत व्यापार सुरू केला व नंतर प्रगती करत करत मोठ्या प्रमाणांत त्याचा व्यापार सुरू झाला. दहा वर्षांच्या आंत तो करोडपती झाला. बऱ्याच वर्षांचे त्याचे स्वप्न आता पूर्ण झाले होते. त्याला दोन मुलगे व एक मुलगी होती.
बिंदुसारचे जीवन सुखासमाधानाने परिपूर्ण होते व त्याला कसलीही कमतरता नव्हती. त्याने आपल्या मुलीचे लग्न केले व ती तिच्या सासरी सुखाने नांदत होती. दोन्ही मुलांचाही विवाह झाला व ते व्यापारही चांगला करत होते. हे सर्व मिळवण्यासाठी बिंदुसारने काबाडकष्ट केले होते, खूप मेहनत केली होती. पण तरीही स्वस्थ बसून आराम करणे त्याला आवडत नसे. कांही तरी करावे असे त्याचे अशांत मन त्याला सांगे. व्यापार करून तो कंटाळला होता, त्यामुळे ललित कलांचा अभ्यास करण्याचा त्याने निश्चय केला.
कविता लिहावी किंवा ऐकावी तर भाषेचे त्याला फारसे ज्ञान नव्हते. गायला शिकावे तर त्याच्या आवाजात बिलकुल गोडवा नव्हता. त्यामुळे त्याला आता एकच कला दिसू लागली की ज्यांत तो नैपुण्य प्राप्त करू शकेल आणि ती म्हणजे चित्रकला.
एक दिवस त्याने आपल्या खोलीत बसून तऱ्हे-तऱ्हेची चित्रे काढली. पण एकही चित्र त्याला पसंत पडले नाही. त्याला वाटले की कुठलीही कला अवगत करून घेण्यासाठी तिची साधना, मन एकाग्र करणे, तपस्या हे केलेच पाहिजे. एक आठवडाभर तो खूप प्रयत्न करत राहिला. शेवटी एक दिवस त्याच्या मनासारखे चित्र तो काढू शकला. ते चित्र एका सिंहाचे होते व ते पाहून तो अतिशय खूष झाला. त्याचे मन त्याला सांगू लागले की एक दिवस तो यशस्वी चित्रकार होणार व त्याला भरपूर प्रसिद्धी मिळणार.
ते सिंहाचे चित्र पाहात असताना त्याला वाटले - "हे चित्र खरंच आपण फार सुंदर काढलंय, पण कुठल्याही कलाकाराला समाधान मिळतं ते त्याच्या कलेचं गुणगान जेव्हा इतर लोक करतात तेव्हा." त्याला खूप वाटू लागले की घरच्या सर्वांना हे चित्र कसे वाटते ते विचारून त्यांचा अभिप्राय ऐकावा. पण तो जरा संकोची स्वभावाचा होता, त्यामुळे गप्प बसला.
कित्येक दिवस तो आपल्या खोलीतच बसून राहिला. त्याने कुणालाही पत्ता लागू दिला नाही की खोलीत बसून तो काय काम करतोय! त्यामुळे तो खोलीत बसून काय करतोय हे कुणालाही कळू शकले नाही. पण बिंदुसारला पूर्ण कल्पना होती की चित्र दाखवल्यानंतर कांहीजण त्याची खोटी स्तुती करतील, तर कांहीजण त्याला नांवे ठेवतील. त्यांचा खरा अभिप्राय जाणून घ्यायचा असेल तर ते चित्र कशाचे आहे व कोणी काढले आहे हे कुणालाही कळते नाही पाहिजे असे त्याला वाटले.
विचार करून मग त्याने ते चित्र घरांत मध्यभागी ठेवलेल्या टेबलावर ठेवले. जो कोणी त्या चित्राविषयी बरोबर सांगेल त्याला शंभर मोहरा बक्षीस मिळतील असे त्याने जाहीर केले.
प्रथम बिंदुसारची पत्नी आली व तिने ते चित्र पाहून "आपल्या नातवाने काढलेल्या वेड्यावाकड्या रेघा दिसताहेत" असे उद्गार काढले. ते ऐकून बिंदुसारला फार वाईट वाटले, पण आपले दुःख त्याने इतरांना दर्शवू दिले नाही. मग त्याचे दोन्ही मुलगे आले व म्हणाले "अशा निरर्थक गोष्टीसाठी वेळ वाया घालवण्याऐवजी व्यापाराकडे जास्त लक्ष दिले व अधिक पैसे कमावले तर बरे होईल." बिंदुसारला ते ऐकून खूप दुःख झाले.
तेवढ्यांत त्याच्या दोन्ही सुना तिथे येऊन पोहोचल्या. मोठी सून टेबलावरचा कागद पाहून म्हणाली - "मला वाटतं कि कुणीतरी यांत कांहीतरी संदेश लिहीला आहे. पण अक्षर खराब आहे, अस्पष्ट आहे व कुठल्यातरी गूढ भाषेत लिहिण्यामुळे कांही समजत नाही." धाकट्या सुनेने नकारात्मक डोके हलवत म्हटले - "तू मोठी आहेस पण तरी तुला काय आहे हे कळले नाही. पण मला वाटले की त्याच्यावर कुठलीही भाषा नाही नि अक्षर नाही." तिला वाटले आपले उत्तर ऐकून सासरा आनंदित होईल. बिंदुसाराची अवस्था मोठी कठीण झाली, विचित्र झाली. धडपणे त्याला हंसता येत नव्हते की रडत येत नव्हते. तो गंभीरपणे म्हणाला, "शंभर मोहरा मिळवण्याची योग्यता माझ्या कुटुंबातल्या कुणातही नाही असे दिसतेय." तितक्यात त्याचे दोन नोकर तिथे आले. त्यातला एक चित्र पाहून म्हणाला - "मला वाटते, या कागदात बिया बांधून पुडीसाठी उपयोग केला असावा व त्यातल्या काही बिया फुटल्यामुळे त्याचा रंग या कागदाला लागला आहे."
दुसरा नोकर हसून म्हणाला, - "तुझ्या मूर्खपणाचं मला हसू येतंय. जर हा कागद पुडी बांधण्यासाठी वापरला असेल तर त्याच्यावर कागद दुमडलेल्या रेघा व घड्या दिसायला हव्या ना, या कागदावर तर तसे कांहीच दिसत नाही."
त्या दोघांचे ते बोलणे ऐकून बिंदुसार थोडा उत्तेजित झाला. त्याने आपल्या दुसऱ्या नोकराला बोलावून म्हटले - "दोघांमध्ये तू थोडा हुशार दिसतोस. तूच सांग, हे शेवटी आहे तरी काय?"
नोकर खूष होऊन म्हणाला - "काय मालक, मला इतके पण सांगता येत नाही का? या कागदावर थोडा वेळ बिया ठेवल्या व नंतर काढून टाकल्या, तेवढेच. त्याची पुडी बांधलेली नाही."
नाराज झालेला बिंदुसार म्हणाला - "राहूं दे, तुझी ही निरर्थक बडबड नको. जा, आपलं काम कर." दोन्ही नोकर तिथून गेल्यावर त्याचा पांच वर्षांचा नातू तेथे आला. तो कागद पाहताच म्हणाला - "आजोबा, आजोबा, कुणीतरी झाडाचं हे चित्र खूप छान काढलंय, मला हे चित्र पाहिजे." चित्र हातांत घेऊन तो हट्ट करू लागला. त्याचे ते बोलणे व हट्ट पाहून बिंदुसारला अतिशय आनंद झाला. आपल्या नातवाला प्रेमाने जवळ घेत तो म्हणाला - "सिंहाला झाड म्हटल्याने काय फरक पडणार आहे? पण या कागदावर एक चित्र काढलंय असं सांगणारा पहिला तूच आहेस. त्यामुळे शंभर मोहरांच्या बक्षीसाचा अधिकार तुझाच आहे." नातवाची पापी घेत तो म्हणाला.
तिथेच उभी असलेली त्याची बायको व सुना खळखळून हसल्या. कारण आता त्यांना खरी गोष्ट कळली होती.